ठेकेदाराविरुद्ध महावितरणचा दिवाणी दावा

पिंपरी – कोणताही कायदेशीर अधिकार नसताना अशासकीय सदस्य म्हणून महावितरणच्या व्यापारी चिन्हाचा (लोगो) वैयक्तिक वापर केल्याप्रकरणी जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांच्याविरुद्ध महावितरणकडून पुणे येथील दिवाणी न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) दावा दाखल करण्यात आला आहे. तसेच महावितरणचे विद्युत ठेकेदार म्हणून काम करताना अनेक ठिकाणी निकृष्ट काम केल्याचे आढळून आल्याप्रकरणी संतोष सौंदणकर यांची न्यू सिमरन इलेक्‍ट्रीकल ही संस्था पाच वर्षांसाठी महावितरणच्या काळ्या यादीत टाकण्यात आली आहे.

महावितरणमध्ये विद्युत ठेकेदार व जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य असलेले संतोष सौंदणकर यांनी स्वतःच्या लेटरहेडवर अनधिकृतपणे महावितरणच्या व्यापारी चिन्हाचा (लोगो) वापर केल्याचे आढळून आले. महावितरणच्या या व्यापारी चिन्हाचा कुणालाही स्वतःच्या वैयक्तिक लेटरहेडवर वापर करता येत नाही. परंतु, सौंदणकर यांनी या चिन्हाचा अनधिकृतपणे वैयक्तिक वापर केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुणे येथील दिवाणी न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) महावितरणकडून दावा दाखल करण्यात आला आहे. महावितरणमध्ये विद्युत ठेकेदार म्हणून काम करणारे सौंदणकर यांचे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्यपद रद्द करण्याची लेखी मागणी यापूर्वीच समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्याकडे महावितरणकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महावितरण अंतर्गत विद्युत ठेकेदारांकडून करण्यात आलेल्या विविध कामांचे नियमितपणे पर्यवेक्षण व तपासणी केली जाते. यामध्ये निकृष्ट दर्जा व अनियमितता आढळल्यानंतर कारवाई केली जाते. त्याप्रमाणे सौंदणकर संचालित न्यू सिमरन इलेक्‍ट्रीकल फर्मने केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आले. तसेच कामांमध्ये अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत महावितरणकडून नियमाप्रमाणे कारवाई करून सौंदणकर संचालित न्यू सिमरन इलेक्‍ट्रीकल ही संस्था पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आली आहे.

पालक मंत्र्यांकडे तक्रार
संतोष सौंदणकर हे पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य असतानाही प्रामुख्याने महावितरणच्या लोगोचा गैरवापर करणे, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून बदलीचे किंवा इतर बेकायदेशीर कामे करण्यास सांगणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध चुकीचे वृत्त पसरविणे, वरिष्ठांसह मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्याकडे अधिकाऱ्यांच्या वारंवार खोट्या तक्रारी पाठविणे, महावितरणच्या विविध कार्यालयांत जाऊन बेकायदेशीर बैठकी घेणे व अधिकाऱ्यांना दमदाटी करणे आदी अनेक प्रकारचे त्रास महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना होत आहे. या प्रकारांबाबत पालक मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे महावितरणने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)