ठेकेदाराची मुजोरी; कामगारांना मिळेना मजूरी

अपुर्‍या मजूर पुरवठ्यामुळे जुन्या कोयना पुलाची रखडपट्टी, डेडलाईनवर पाणी
कराड, दि 1 (प्रतिनिधी) -जानेवारीच्या सुरुवातीला येथील जुन्या कोयना पुलाच्या मजबूतीकरणाला प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराकडे डेडलाईसह पुलाचे काम सोपवण्यात आले. कामासाठीच्या मंजूर निधीतून ठेकेदाराकडून आत्तापर्यंत केलेल्या कामाचे पैसेही अदा करण्यात आले आहेत. मात्र, सदर ठेकेदाराने पुलाच्या कामावर असलेल्या कामगारांची वेळेत मजूरी न दिल्यामुळे काही कामगारांनी या कामाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या मुजोरीमुळेच कामगारांना मजूरी मिळत नसल्याने पुलाचे काम कासवाच्या चालीने सुरु आहे.
सध्या जुन्या कोयना पुलावरील पिलर्सच्या सिलिंगसह लोखंडी गज बसवण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर पुलावरील जुन्या लोखंडी प्लेट्स काढण्यात आल्या असून त्याठिकाणी नवीन प्लेट्स बसवण्यासही प्रारंभ करण्यात आला आहे. पिलर्सचे सिलिंग, लोखंडी गज, प्लेट्स बदलण्यासह पुलावर दीड फुट जाडीचे कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे. मात्र, ठेकेदाराकडून कामगारांची मजूरी वेळेत अदा करण्यात आली नसल्याच्या कारणावरुन काही कामगारांनी पुलाचे काम थांबवले आहे. सध्या पुलाच्या कामावर फक्त दोनच मजूर कार्यरत असून अपुर्‍या मजूर पुरवठ्यामुळे जुन्या कोयना पुलाच्या मजबूतीकरणाची अक्षरश: रखडपट्टी झाली आहे.
पुलाच्या दुरुस्तीमध्ये पावसाळ्याचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी पुलाच्या आवश्यक भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी 30 जून पर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. शिवाय पुलाच्या कामात दुचाकी वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पूर्णत: बंद ठेवून काम पूर्ण होऊन जुलैपासून हा पुल दुचाकी वाहतुकीसह हलक्या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सततचा पाऊस, निधीचा अभाव, ठेकेदाराची अडवणूक व कामगारांच्या अपुर्‍या मजूर पुरवठ्यामुळे पुलाच्या कामासाठी घालून दिलेल्या डेडलाईनवर पाणी फिरले आहे.
कोयना नदीवरील जुना पूल वाहतुकीस बंद केल्यामुळे सह्याद्री हॉस्पिटलसह वारुंजी फाटा, विजयनगर, गोटे, मुंढे आदी गावांमधील लोकांना वळसा मारुन कोल्हापूर नाक्यावरुन ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून कोल्हापूर नाक्यावर वाहने वाढल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावून हा पूल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)