ठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन?

स्थायीसमोर प्रस्ताव : नावासह अन्य डिटेल्सची पाटीही लावावी लागणार

पुणे – रस्त्यांच्या कामावरही ठेकेदाराचा आणि कामाचा तपशील द्यावा, असा प्रस्ताव उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. यामुळे रस्त्याची कामे नीट झाली नाहीत तर संबंधित ठेकेदाराला जबाबदार ठरवले जाणार आहे.

-Ads-

नवे रस्ते करणे, जुने रस्ते दुरुस्ती करणे, डांबरीकरण किंवा कॉंक्रीटीकरण करणे, तसेच फुटपाथ करणे अशी कामे झाल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित कामांसाठी किती रक्‍कम खर्ची पडली. या कामाची वर्क ऑर्डर कधी दिली, त्याने काम कधी पूर्ण केले आणि देखभाल दुरुस्तीची मुदत किती तारखेपर्यंत आहे, संबंधित ठेकेदार/एजन्सीचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक या सगळ्याची माहिती काम झाल्यानंतर फलकावर लावावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ज्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे हे काम झाले त्याचे आणि पथ विभागाच्या अधिकाऱ्याचे नावही त्यावर नमूद करावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. तसेच ही माहिती पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बेवसाईटवर प्रसिद्ध करावी, असेही ठरावात म्हटले आहे.

केवळ कागदी घोडे
गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. अनेक छोटे-मोठे रस्ते आम्ही बनवतो, काही रस्त्यांची दुरुस्ती करतो, फुटपाथही करतो मात्र तो रस्ता कधी केला, त्याचा “वॉरंटी पिरियड’ काय आहे याची काहीच माहिती नसते. त्यामुळे लगेचच रस्ता खराब झाला तर कोणालाच जबाबदार धरले जात नाही. केवळ कागदी घोडे नाचवले जातात. संबंधित कामाचा ठेकेदार ती जबाबदारी घेत नाही. कामावेळी असलेले कनिष्ठ अभियंते आणि अधिकारी यांची बदली झाली असे सांगून हात वर करतात. नगरसेवक केवळ उद्‌घाटनापुरते उत्साही असतात. त्यामुळे पुढे पुन्हा त्या रस्त्यांसाठी अंदाजपत्रकीय तरतूद केली जाते आणि लाखो-कोट्यवधी रुपये पुन्हा खर्च केले जातात. असे होऊ नये यासाठी ही माहिती फलक स्वरुपात नागरिकांच्या समोर सतत राहावी यासाठी हा प्रस्ताव दिल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)