ठाणे आले… पण पोलीसच नाहीत

महापालिकेच्या अतिक्रमण पोलीस ठाण्याची स्थिती

पुणे – पालिका हद्दीतील अतिक्रमण कारवाई अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने महापालिकेसाठी 2014 मध्ये स्वतंत्र अतिक्रमण नागरी पोलीस ठाणे मंजूर केले आहे. मात्र, त्यानंतर गेल्या चार वर्षांत यासाठी मंजूर पदांच्या तुलनेत कमी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पोलीस ठाणे आहे; मात्र त्यात बसण्यासाठी पोलीसच नाहीत, अशी स्थिती आहे.

शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची आवश्‍यकता भासते. अशा स्थितीत वेळेवर बंदोबस्त न मिळाल्याने सक्षमपणे कारवाई करता येत नाही. परिणामी, अनेकदा न्यायालयाच्या रोषास तसेच पुणेकरांच्या टीकेचाही सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने राज्य शासनाकडे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. त्यानुसार, त्यास मान्यता देत 158 पदांची निर्मितीही केली. यासाठी कर्मचारी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार होते. त्यासाठी त्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी आवश्‍यक रक्‍कमही महापालिकेकडून पोलीस आयुक्तालयास अदा केली होती. मात्र, त्यानंतरही केवळ 65 कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेस अजूनही पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तांना साकडे घालावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका बाजूला अतिक्रमण विभागासाठी सुमारे 160 सहायक निरिक्षकांची फौज मिळालेली असतानाच, आता दुसऱ्या बाजूला कारवाईसाठी आवश्‍यक असलेले पोलिसांचे मनुष्यबळ नसल्याने कारवाई पुन्हा थंडावल्याचे चित्र आहे.

पोलीस ठाणे रिकामेच
स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या जीएसटी कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिली असून त्यासाठी सुसज्ज कार्यालय बांधण्यात आले आहे. त्यासाठी फर्निचर, फोन तसेच इतर आवश्‍यक सुविधाही देण्यात आलेल्या आहेत. मात्र, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कार्यालयाचा बहुतांश भाग रिकामाच पडून असल्याचे चित्र आहे.

पोलीस ठाण्यासाठी मंजूर असलेली पदे भरून मिळण्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच आवश्‍यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध होईल.

– माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)