ठग्स ऑफ मल्टिप्लेक्‍स!

पिंपरी – बाहेरील खाद्य पदार्थांना सिनेमागृह चालकांकडून मनाई करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असताना पिंपरी-चिंचवड शहरातील बहुपडदा (मल्टिप्लेक्‍स) सिनेमागृह चालकांनी त्यास केराची टोपली दाखविली आहे. घरुन आणलेले अथवा बाहेरील खाद्य पदार्थ नागरिकांकडून हिसकावून घेतले जात आहे. पाण्याच्या बॉटलसाठी चाळीस रुपये मोजावे लागत असून वाहन पार्किंगच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे उकळून ठगविण्याचे काम सुरु आहे.

शहरात पिंपरी येथे दोन, चिंचवड, आकुर्डी व पिंपळे सौदागर येथे प्रत्येकी एक मल्टिप्लेक्‍स सिनेमागृह आहेत. स्पाईन रस्त्यावरील सिनेमागृह खुले होण्याच्या मार्गावर आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहेत. तसेच बहुचर्चित ठग्स ऑफ हिंदुस्थान व आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हे चित्रपट प्रदर्शित झाल्याने सर्व सिनेमागृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रपट रसिकांची गर्दी होत आहे. त्याचा गैरफायदा उचलत रसिकांना लुटण्याचे काम सुरु आहे. सिनेमागृहात जंकफूड, पॉप कॉर्न अव्वाच्या-सव्वा दराने विकले जात आहेत. एक लिटरच्या पाणी बॉटलसाठी तब्बल चाळीस रुपये मोजावे लागत आहेत.

बाहेरील खाद्य पदार्थ सिनेमागृहात न्यायला मनाई करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. विधान सभेतही त्यावर चर्चा झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याविरोधात सिनेमागृहामध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर काही दिवस चित्रपट रसिकांना खाद्य पदार्थ आत नेता आले. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न झाले आहेत. थिएटरमध्ये सिनेमा पहायला जाताना लहान मुले किंवा वृध्द सोबत असतील, तर घरचे पदार्थ घेऊन जाणे अनिवार्य ठरते. बऱ्याचदा, मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच्या असतात. त्यामुळे, घरगुती पदार्थ घेऊन जाणे, सोयीचे ठरते. मल्टिप्लेक्‍समध्ये ग्राहकांना अनेकदा बाहेरुन आणलेले पदार्थ नेऊ दिले जात नाहीत. पाण्याच्या बाटल्याही सुरक्षा रक्षक बाहेर काढून घेत आहेत. याबाबत वाद घातल्यास बाऊन्सरकरवी संबंधित नागरिकाला बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. सिनेमागृहांच्या मनमानीला चाप लावण्याची मागणी चित्रपट रसिकांकडून होत आहे.

पार्किंगच्या माध्यमातून सर्रास लूट
कमर्शिअल कॉम्प्लेक्‍ससाठी मोफत वाहनतळ उपलब्ध करुन देणे सक्तीचे असताना पिंपरीतील एका नामांकीत सिनेमागृहाकडून दुचाकीसाठी वीस तर चारचाकी वाहनासाठी चाळीस रुपये आकारले जात आहेत. अव्वाच्या-सव्वा पार्किंग शूल्क असल्याने बहुसंख्य नागरिक मुंबई-पुणे महामार्गालगत पदपथावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. पिंपरीतील दुसऱ्या एका सिनेमागृहाचे वाहनतळ अपुऱ्या क्षमतेचे आहे. त्यामुळे येथेही सिनेमागृहाबाहेर वाहने उभी केली जातात. चिंचवड स्टेशन येथे मोफत वाहनतळ उपलब्ध असूनही तेथेही शॉपिंग कॉम्प्लेक्‍स व सिनेमागृहात येणारी शेकडो वाहने उभी करायला पुरेशी जागा नसल्याने नागरिक महामार्गालगतच्या पदपथावरच वाहने उभी करतात. वाहतूक पोलीस याठिकाणी दैनंदिन कारवाई करत असतानाही जागेअभावी नागरिक याच ठिकाणी वाहने उभी करतात.

न्यायालयाच्या आदेशानुसार, मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यास मनाई करणे मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे. हा प्रतिबंध कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करता येते. काही सिनेमागृहांबाबत आपल्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संबंधितांना नोटीस बजावल्या जाणार आहेत. तक्रारी प्राप्त होवू अथवा न होवो अचानकपणे तपासणी करुन अशा सिनेमागृहांवर कारवाई केली जाणार आहे.
– नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)