ट्‌वेंटी-ट्‌वेंटी उपवास

नीती अनीती

जुन्या लाटा ओसरतात व नवीन लाटा येतात. मुलाखती घेण्याची लाट आली व पाठोपाठ ट्‌वेंटी-ट्‌वेंटी उपवासाची लाट आली. दोन दिग्गज विरोधक एकाच मंचावर येऊन मुलाखत घेतात वा देतात हा नवा ट्रेंड बाजारात आला व वातावरण ढवळून निघाले. त्रासलेल्या तमाम जनतेसाठी एक नवे व अनोखे मनोरंजनाचे दालन खुले झाले. या नवीन करमणुकीमुळे आयपीएलचा बाजार गडगडला व लोक अशा मॅरॅथॉन मुलाखती चवीने बघू लागले. बघणाऱ्याचे मनोरंजन व मुलाखत देण्या-घेण्याआधी अडगळीत पडलेल्याना अमाप प्रसिद्धी, असा दुहेरी दुग्धशर्करा योग जमून आला व सर्वांचेच चांगभले झाले. अशाच ट्‌वेंटी-ट्‌वेंटी उपोषण लाटेने अस्वस्थ झालेले राळेगणसिद्धीचे सिद्ध पुरूष आता या उपोषणकर्त्यांना कसे थोपवायचे या गहन विचारात पडले व स्वतःचा ब्रॅंड वाचवण्यासाठी या ट्‌वेंटी-ट्‌वेंटी उपोषणकर्त्यांची मुलाखत घेण्यास सरसावले. राज-पवार, संजय-देवेंद्र या बहुचर्चित मुलाखती एवढीच फेमस करण्याचे ठरवून सिद्ध पुरूष तडक बंगलोरला निघाले व उपोषण स्थळी पोहोचले.
‘नमस्कार नरेंद्र भाई, शुरू करें ?’
‘स्वागत है अण्णा जी! आम्ही धन्य झालो. मेरा ये सौभाग्य है की आप के दर्शन हो गये. मेरा जीवन सफल हो गया. राळेगण से मेरा पूराना नाता है…’
‘पुरे नरेंद्र भाई, आवरा थोडंस. मला प्रश्न तर विचारू द्या.’
‘ छे छे अण्णा, तुम्ही तर गुरू द्रोणाचार्य आहात अण्णा. मी उपोषण सुरू केले ते तुमची मूर्ती नजरेसमोर ठेवूनच…’
‘ह्यॅ …. मला काही बोलू देणार आहात की नाही, बोलण्यात तुम्हाला कोणी हरवू शकेल का? मला गुरू द्रोणाचार्य मानता मग 42 पत्रांची उत्तरे का दिली नाहीत? ‘
‘तुम्ही गुरू द्रोण मी एकलव्य, पण अंगठा का मागता माझा? मी अंगठा देणारा नाही तर अंगठा दाखवणारा एकलव्य आहे अण्णा ….’
‘बरं हे काय नवीन? आधी राहूल, नंतर तुम्ही उपोषणाला बसले, प्रयोजन कळेल काय?’
‘आम्ही येण्याआधी योगगुरू म्हणून केवळ रामदेव बाबांना लोक ओळखतं. मग मी काय केलं की जागतिक योग दिवस जूनमध्ये असेल असे घोषित केले, जमेल तेवढे योगासने मी व अमितभाईने करून दाखवले, लय मज्जा आली. आता लोकं बाबांना विसरायला लागले. मला योगगुरू मानायला लागले. मी कुणा एकाची मोनोपोली कधीच सहन करत नाही. अण्णा, आता तुमची पाळी… हो. मी कुणा एकाचे ब्रॅंडिंग होऊ देत नाही, रामदेवबाबाचे विमान आणले की नाही जमिनीवर?’
‘पण त्यांना दुसरा व्यवसाय मिळाला! माझे काय ?
‘तुम्ही मुलाखती घ्यायच्या उपोषणस्थळी जाऊन. उपोषणाला मी जागतिक दर्जा देणार आहे.लवकरच जगातील कुठलीही निवडणुक असो, उपोषण कंप्लसरी राहणार, असे नवे कल्चरच आणणार मी. मग ट्रंप, पुतीन, जिनपिंग, किम जोंग सारे निवडणुका आधी लाक्षणिक उपोषणाला स्वतःच्या कारभाराविरोधात ठेवणार व अण्णा तुम्ही देश विदेशी मुलाखती घेणार, किती दिवस तुम्ही एकटे उपोषण करत बसणार? नवीन पिढीची काही जबाबदारी आहे की नाही?’
नमोवाणी ऐकून अण्णा भारावतात, डोळे पाणावतात व अत्यंत समाधानाने व जड अंतःकरणाने अण्णा बंगलोर पुणे विमानात आसनस्थ होतात.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)