ट्रेकर्स डेस्टिनेशन : कलावंतीण दुर्ग

थंडीची सुरुवात नुकतीच झाली आहे. या थंड वातावरणात कुठेतरी ट्रेकला जावे असा आम्हा मित्रांच्या मनात विचार आला. ठरले…ट्रेकसाठी आम्ही जागा शोधू लागलो आणि आम्हाला कलावंतीण दुर्गाची माहिती मिळाली. मोठे चढण, सर्वात वर एक उभा कातळ आणि गावातील चवदार जेवण असे आम्ही ऐकले होते. या दुर्गाची माहिती नसल्याने आम्ही साद सह्याद्री या ट्रेक ग्रुपकडून जाण्याचे नक्की केले.

कलावंतीण हा कर्जतजवळ रायगड जिल्ह्यातील दुर्ग. या दुर्गाचे मुख्य आकर्षण म्हणजे माथ्यावरीळ सुळका आणि तिथे जाण्यासाठी कोरण्यात आलेल्या दगडी पायऱ्या. कलावंतीण दुर्ग हा प्रबळ गडाचा टेहळणी दुर्ग आहे. या दुर्गाची उंची 2100 फूट असून या दुर्गाला तुंगी असेही म्हंटले जाते. सकाळी आम्ही ग्रुप बरोबर निघालो. जाण्यासाठी अंदाजे 2.30 तास वेळ लागला. पुणे-मुंबई द्रुतग्रती मार्गावरून आम्ही खोपोली फाटा घेत कर्जतला पोहचलो. पुढे थोड्याच वेळात आम्ही दुर्गाच्या पायथ्याला असणाऱ्या ठाकुरवाडी या गावी पोहचलो. गाडी पार्क करून आणि नाष्टा करून आम्ही ट्रेकला सुरुवात केली.

सुरुवातीचा रस्ता तसा सरळ आणि सोपा आहे. साधारणतः 20 मिनिटे चालून झाल्यावर खरा ट्रेक सुरू होतो. मुख्य मार्ग सोडून आपल्याला जंगलाची वाट धरावी लागते. दुर्गावर जाण्यासाठी मध्ये एक छोटे पठार आहे. ते पार करेपर्यंत तास काही त्रास होत नाही. पण पुढे सर्व रस्ता चढणाचा आहे. माती, ठिसूळ दगड आणि मोठी झाडे यातून जाताना तशी मज्जाच येते. रस्त्याच्या कडेला आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर गावकरी पाणी, लिंबू सरबत आणि काकडी घेऊन बसलेले दिसतात. इथून एकेठिकाणी तरी आपण याचा आस्वाद घ्यावा कारण ती चव काही निराळीच आहे.

मुख्य चढण सुरू होताना एक छोटेसे गाव आहे. इथे उत्तम जेवणाची सोय उपलब्ध आहे. जाताना तुम्हाला तुमच्या पसंतीचे जेवण इथे सांगावे लागते. गावातुन पुढे गेल्यावर ठिसूळ दगड आणि झाडे यांनी भरलेला रस्ता आहे. साधारणतः 20 मिनिटे हा भाग पार करण्यासाठी लागतात. पण वरून आधीचे लोक खाली येत असतील, तर वेळ जास्त लागू शकतो. वर गेल्यावर मुख्य कातळ सुरू होतो. याच कातळावर अतिशय सुंदररित्या पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत.

वर जाताना अतिशय सावध राहावे लागते. एकावेळेस एक जण वर व एक जण खाली येवू शकेल इतकीच जागा या पायऱ्यांवर आहे. दोन्ही बाजूला खूप खोल दरी. पण यामुळे एक वेगळीच मजा येथे आपल्याला अनुभवता येते. साधारणतः 10 मिनिटे चढून गेल्यावर समोरच एक कतळी सुळका आहे. त्यावर एक भगवा आपल्याला फडकताना दिसतो. त्या सुळक्‍यावर चढण्यासाठी एक अतिशय अरुंद अशी दगडी फट आहे. यातून वर जाणे तसे जिकीरीचेच. पण वर गेल्यावर तिथून दिसणारा निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. या सुळक्‍यावर समोरच प्रबळ गड दिसतो. इथे अंगावर शहारे आणणारा वारा आणि खोल दरी यामुळे या ट्रेकचे आणि वर येताना केलेल्या मेहनतीचे सार्थक होते.

वर चढून पोटात कावळे ओरडत होते. आम्ही सर्व भराभर खाली गावात आलो. इथे शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही पदार्थ मिळतात. आम्ही मांसाहारावर ताव मारला. तिथली तांदळाची भाकरी, रस्सा आणि भात याची चव आजही माझ्या तोंडाला पाणी आणते. पोटभर जेवून आम्ही जरा आराम केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. साधारणतः 1 तासात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहचलो. गाडी तयारच होती. सर्व गाडीत बसलो आणि पुण्याकडे निघालो. येताना सर्वजण दमलो असल्याने झोपलो होतो.

हा ट्रेक करताना एका गोष्टीचे अतोनात वाईट वाटले ते म्हणजे दुर्गाची अवस्था. दुर्गावर येणाऱ्या पर्यटकांनी येथे ठिकठिकाणी प्लास्टिक टाकले आहे. पाण्याच्या बाटल्या आणि खाण्याच्या पाकिटांचा खच येथे आहे. आपणच आपल्या इतिहासाचा अपमान करत आहोत असे मला वाटले.

धनराज गोखले 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)