“ट्रू अॅप’च्या प्रशिक्षकाविरोधात तक्रारीची “घंटा’

शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार : प्रशिक्षण देणाऱ्याकडून असंसदीय भाषेचा वापर

नगर – निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अॅपचा सध्या गाजावाजा सुरू आहे. महापालिका निवडणूक निमित्ताने त्याचा प्रचार व प्रसार सुरू आहे. देशातील कोणतीही निवडणूक असो, हे अॅप तिथे पोहचते. निवडणूक आयोगाकडूनही त्याचा आग्रह असतो. याच अॅपचे प्रशिक्षण देणाऱ्याने आज जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अकलेचे तारे तोडले! प्रशिक्षणात अश्‍लील भाषा वापरली आहे. त्यावर लेखी माफीनामा देतो, परंतु तक्रार करू नका, अशी भूमिका घेऊन संबंधिताने सावरासावरीचा प्रयत्न सुरू केला आहे.

-Ads-

या प्रकाराची वार्ता जिल्हाभर पसरली आहे. प्रशासनाच्या मदतीला आता राजकीय पदाधिकारी धावून आले आहेत. या अॅपचा सर्वाधिक त्रास राजकीय महत्त्वाकांक्षी बाळगून असलेल्यांना झाला आहे. ही नामी संधी सापडल्याने याचा बिमोडच करायचाच, अशी भूमिका घेत याविरोधात कारवाईसाठी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना तक्रारीची “घंटा’ वाजविली आहे. महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान होत आहे. काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. या निवडणुकीनंतर लगोलग लोकसभा निवडणुकींची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

देशभर निवडणुकांचे वारे राहणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिका, महसूलमधील प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना, उमेदवारांना आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना “ट्रू वोटर अॅप’चे प्रशिक्षण देण्याचे नियोजन होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्याचे आयोजन करण्यात आले होते. या अॅपचे प्रशिक्षण देणारा मुरधीलर भुतडा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपण किती हुशार आहोत हे सांगताना अकलेचे तारे तोडले आहे. उमेदवारांनी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या अॅपचा वापर न केल्यास त्यांची “घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्याने केले आहे.

निवडणूक प्रचारात उमेदवार व्यस्त आहेत, तर निवडणूक प्रक्रियेच्या तयारीत निवडणूक अधिकारी गुंतले आहेत. आयोगाच्या पत्राचा आधार घेत “ट्रू वोटर अॅप’ न वापरल्यास त्यांची घंटी वाजविण्याची तंबी भुतडा याने दिली. भुतडा यांच्या असंसदीय भाषेच्या वापराबाबत सर्व अधिकारी अवाक झाले आहेत. या प्रशिक्षणाला काही महिला अधिकारी देखील उपस्थित होत्या. या असंसदीय भाषेचा निषेध प्रशिक्षण सभागृहात सुरू झाला. या निषेधामुळे भुतडा याला थंड वातावरणात देखील घाम फुटला. भुतडा याने आपल्या वक्तव्याबाबत तात्काळ जाहीर लेखी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

राजकीय महत्त्वकांक्षा बाळगून असलेले या अॅपविषयी अत्यंत नाराज आहे. प्रशिक्षणातील हा प्रकार राजकीय पदाधिकाऱ्यांपासून लपून राहिला नाही. काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन त्याची विचारणा केली. परंतु अधिकाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रश्‍नांवर मौन बाळगले. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल कराळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत भुतडा याच्या वक्तव्याविषयी राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ही असंसदीय भाषाची दखल घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. या प्रशिक्षणाला काही महिला अधिकारी उपस्थित होत्या. त्याची दखल घेऊन भुतडा याच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, असे तक्रारीत म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान संबंधिताने केलेल्या वक्तव्याविषयी भक्कम पुरावे आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांनी गुन्हा नोंदविला नाही, तर शिवसेना आपल्यापद्धतीने गुन्हा नोंदवून घेईल. संबंधिताने हा प्रकार माफीनामा संपविण्याचा खटाटोप सुरू केला आहे. त्याने प्रशिक्षणात उपस्थित असलेल्या महिलांचा झालेला अनादर भरून येणार नाही.
– अनिल कराळे,
सदस्य, जिल्हा परिषद 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)