ट्रान्सपोर्ट हबच्या कामाला मुहूर्त कधी?

संग्रहित छायाचित्र

– गणेख राख

पुणे – एसटी, पीएमपी, रिक्षा आणि आता येणारी मेट्रो यामुळे भविष्यात स्वारगेटचा श्‍वास कोंडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वारगेट येथे भव्य असे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार असून त्याचा आराखडाही तयार झाला आहे. एवढेच काय तर ऑगस्टअखेर त्याचे भूमिपूजन करुन प्रत्यक्ष काम सुरूवात करण्यात येणार होते. मात्र, हा मूहुर्त हुकला असून आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

स्वारगेट येथे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे स्थानक, पीएमपीचे मध्यवर्ती कार्यालय, स्टॅंड तसेच रिक्षा आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे येथील परिसर कायमच कोंडीत सापडलेला असतो. यावर उपायासाठी जेधे चौकात मोठा उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, तरीदेखील कोंडी होण्याचे प्रमाण फारसे कमी झाले नाही. त्यात येथे मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. त्यामुळे ही कोंडी आणखी वाढणार, हे लक्षात घेता इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वारगेट परिसरात उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा संकुलामध्ये नागरिकांना सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये नियोजित मेट्रो स्थानक, एसटी महामंडळाचे बस स्टॅंड, पीएमपी स्थानक, टर्मिनल आदी एकत्र असून भुयारी पादचारी मार्ग, शॉपिंग मॉल, थिएटर, कार्यालये व व्यावसायिक वापरासाठीची इमारत तसेच ओला-उबेर रिक्षा व टॅक्‍सी स्टॅंड आदींची सुविधा असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1,600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर, महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनकडून त्याचे काम केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महामेट्रो आणि महाराष्ट्र रस्ते परिवहन महामंडळाने या प्रकल्प आराखड्याच्या कामाचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी फेब्रुवारीत दिले होते.

प्रत्यक्षात यानंतर अनेक महिने उलटूनही कामात प्रगती झालेली नाही. तर, आमदार माधुरी मिसाळ यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन ट्रान्सपोर्ट हबसाठी स्वारगेट परिसरात महापालिका, एसटी आणि पीएमपी यांची मिळून 17 एकर जागा उपलब्ध झाल्याचे सांगितले. तर उर्वरित जागा ताब्यात घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असुन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑगस्टमध्येच प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले होते. यामुळे अनेक महिन्यांपासून लांबत चाललेल्या प्रकल्पाचे काम आता तरी खऱ्या अर्थाने काम सुरू होईल, असे वाटले होते. मात्र, ऑगस्ट संपूनही आता याला पुन्हा कधी मुहूर्त लागणार, हे पाहवे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)