ट्रम्प यांच्या लेखी भारत (अग्रलेख)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे भारत सरकारचे निमंत्रण नाकारले आहे. आपले अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत त्यातून आपल्याला पुरेसा वेळ मिळणे अशक्‍य आहे असे त्यांनी भारताला कळवले असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. अर्थात त्या विषयीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. पण ट्रम्प यांनी हे निमंत्रण नाकारून भारतातील माध्यमांना आणि मोदी समर्थक व विरोधक या सर्वांनाच एक चमचमीत विषय दिला आहे.

भारताची जगात किंमत वाढली आहे असा सातत्याने दावा करणाऱ्या मोदी सरकारला बसलेली ही एक चपराक मानली जाईल तर दुसऱ्या बाजूला मोदी समर्थकांकडून ट्रम्प यांचीच लायकी काढण्याचे प्रयत्न सुरू होतील. अजून या निर्णयाविषयीची अधिकृत घोषणा बाकी असल्याने त्यावर सध्या तरी दोन्ही बाजूंकडून सावधच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यातच भारतातर्फे ट्रम्प यांना हे निमंत्रण दिले गेले आहे. ते मिळाल्याची जाहीर पुष्टी व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्याने तत्काळ दिली होती पण ट्रम्प हे निमंत्रण स्वीकारणार की नाही हे मात्र त्यांनी जाहीर केले नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जगातील वेगाने विकसित होत जाणारा देश म्हणून ज्या देशाची जाहिरात केली जाते त्या देशाचे निमंत्रण ट्रम्प यांनी नाकारले असेल तर त्यालाही काही महत्त्वाची कारणे आहेत. एक तर भारत आणि अमेरिका यांच्यातही सध्या व्यापारयुद्ध सुरू असल्यासारखी स्थिती आहे. अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या मालावर भारतात मोठ्या प्रमाणात कर लागू करून भारत सरकार मोठा पैसा कमावत आहे असा ट्रम्प यांचा आरोप आहे. त्यामुळे भारताने आमच्या मालावरील आयात कर मर्यादित ठेवावा अन्यथा भारताला त्याची किंमत आम्ही मोजायला लावू असा सज्जड इशारा ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्या अनुषंगाने भारत सरकारने काही पावले उचलली असून अमेरिकेच्या प्रशासनाशी भारत सरकार सध्या चर्चा करीत आहे. पण केवळ भारतच नव्हे तर ट्रम्प यांनी सध्या साऱ्या जगाकडे पाठ फिरवून केवळ अमेरिकेचेच भले साधण्याचे धोरण स्वीकारले आहे. ते जागतिक तापमानवाढीच्या संबंधातील पॅरिस करारातून बाहेर पडले आहेत. इराण, रशिया यांच्याबरोबरच्या जुन्या आण्विक करारातूनही त्यांनी अमेरिकेला बाहेर काढले आहे. जगाची धुणी आम्ही आमचा पैसा खर्चून यापुढे धुणार नाही अशी त्यांची एकूण भूमिका आहे.

डब्ल्युटीओ म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेच्या करारातूनही ते बाहेर पडले आहेत. सगळेच महत्वाचे आंतरराष्ट्रीय करार मोडून त्यांनी स्वत:चेच अमेरिका केंद्रीत धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्यांना कोणी लहरी म्हणो, एककल्ली म्हणो किंवा अगदी वेडगळ म्हणो त्यांनी बेधडकपणे अमेरिकेच्या स्वार्थाची भूमिका घेऊन सारे जग हैराण करून ठेवले आहे. जो लाभादायक वाटतो त्याच्याशीच यापुढे अमेरिका मैत्रीचे संबंध ठेवील असा त्यांच्या एकूण कारभाराचा सूर आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भारताने दिलेल्या महत्वाच्या निमंत्रणाला नकार देण्याचाही एक अन्वयार्थ असा लावता येईल की अमेरिकेच्या दृष्टीने भारत आता फार भाव द्यावा इतका महत्त्वाचा देश राहिलेला नसावा. कारण ट्रम्प हे पक्के व्यावसायिक आहेत. कोठून लाभ होईल, कोठे विनाकारण वेळ दवडायचा नाही याविषयीची त्यांची सारी तंत्रे ठरलेली आहेत. याच तंत्रातून त्यांनी जर भारताचे निमंत्रण नाकारले असेल तर मोदी म्हणतात त्याप्रमाणे भारताचा जगात भाव वधारत आहे या उद्‌घोषाला फार अर्थ उरत नाही. ओबामांच्या काळात अमेरिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली होती. त्यावेळी ओबामा हे आवर्जून भारतात आले होते आणि आपल्या भेटीचा नेमका उद्देश विशेष संकेताद्वारे देण्यासाठी त्यांनी आपल्या भारत भेटीची सुरुवात मुंबईपासून केली होती.

आपण भारतात केवळ व्यावसायिक हित जोपासण्यासाठी आलो आहोत असा संदेश त्यांनी या कृतीद्वारे दिला होता व मुंबईतील भेटीत त्यांनी भारतातील अनेक मोठ्या उद्योगांशी अब्जावधी डॉलर्सचे करार पदरात पाडूनच ते पुढे दिल्लीकडे मार्गस्थ झाले होते. नंतर अमेरिकेतील एका जाहीर सभेत त्यांनी जे वक्‍तव्य केले होते ते अधिक महत्त्वाचे आहे. ते म्हणाले होते की, भारतात मी जे करार करून आलो आहे त्यातून अमेरिकेतील किमान 50 हजार बेरोजगार युवकांचे भवितव्य मी सुनिश्‍चित करून आलो आहे. याचा अर्थ भारतीय कंपन्यांशी केलेल्या करारामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत असे त्यांनी मान्य केले होते.

भारतीय उद्योगांमध्ये आता तशी स्थिती राहिलेली नाही हे बहुधा ट्रम्प यांनी ताडले असावे म्हणूनच त्यांना भारताला फार महत्त्व द्यावेसे वाटत नसावे असाही एक अर्थ यातून लावता येईल. अर्थात, या पार्श्‍वभूमीवर मोदींना कमी लेखण्यासाठी ट्रम्प यांचे कारण पुढे करून भारताला कमी लेखण्याचा देशद्रोह तुम्ही का करता असा सवालही मोदी भक्‍तांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. यात मोदी सरकारचा विषय जरी तात्पुरता बाजूला ठेवला तरी ट्रम्प यांच्या लेखी आता भारतात पुरेशी आर्थिक क्षमता राहिलेली नाही असा जो संदेश यातून मिळतो आहे याचा गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)