ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील अभियंत्याचा मृत्यू

महाळुंगे इंगळे – कंपनीच्या वतीने रांजणगाव येथे सुरु असलेले प्रशिक्षण उरकून चाकण बाजूकडे आपल्या ताब्यातील दुचाकीवर परतीच्या मार्गावर निघालेल्या आकुर्डीतील एल. जी. इलेक्‍ट्रॉनिक कंपनीमधील अभियंत्यांचा अवजड ट्रकची पाठीमागून जोरात ठोस बसल्याने जागीच मृत्यू झाला.
चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील साबळेवाडी (ता. खेड) हद्दीतील धोकादायक वळणावर बुधवारी (दि. 17) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुारास हा अपघात झाला. या घटनेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला असून, संबधित अभियंत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे. प्रशांत भोरीलाल घोर (वय 38, रा. ईएसआय हॉस्पिटल, सिस्टर क्वाटर्स, टाईप 2, रूम नं. 4, सांगवी, पुणे) असे या अभियंत्याचे नाव आहे. प्रशांत याचा मित्र जमील मेहबूब मकानदार (वय 30, रा. सोनवणे वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, ताथवडे, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मकानदार यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी ट्रकचालक सुनील रॉय (वय 46, रा. दार्जिलिंग, पश्‍चिम बंगाल) याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यास अटक केली आहे. प्रशांत हा आकुर्डी पुणे येथील एल. जी. इलेक्‍ट्रॉनिक इंडिया सर्व्हिस सेंटर कंपनी, थरमॅक्‍स चौक येथे गेल्या आठ महिन्यांपासून नोकरीला आहे. एल. जी. इलेक्‍ट्रॉनिक या कंपनीच्या वतीने शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये याच कंपनीच्या दुसऱ्या प्लांटमध्ये गेल्या चार दिवसांपासून सर्व्हिस इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्याकरिता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. बुधवारी (दि. 17) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षण उरकून सर्वजण आपापल्या वाहनाद्वारे परतीच्या मार्गाला निघाले होते.
चाकण – शिक्रापूर रस्त्याने शिक्रापूर बाजूकडून चाकण बाजूकडे प्रशांत घोर हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच 14 डीवाय 1044) निघाला होता. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून ट्रकचालक रॉय हा आपल्या ताब्यातील अवजड ट्रक (एचआर 47 बी 7425) घेऊन शिक्रापूर बाजूकडून चाकणच्या दिशेने भरधाव निघाला असताना साबळेवाडी हद्दीतील नेहमीच्याच धोकादायक वळणावर प्रशांत याच्या दुचाकीस त्या ट्रकची पाठीमागून जोरात घडक बसून हा अपघात झाला. या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने, मारुतराव सूळ व त्यांचे अन्य सहकारी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)