टोमॅटोचा “चिखल’

पिंपरी – टोमॅटो दहाला दोन किलो…घ्या हो भाऊ…घ्या हो ताई…अशी आरोळी ठोकून विक्रेत्यांच्या घशाला कोरड पडली आहे. पाच रुपये किलो दराने विक्री होवूनही टोमॅटोची विक्रमी आवक वाढल्याने टोमॅटो कचरा कुंडीत फेकून देण्याची वेळ पिंपरीतील फळभाजी विक्रेत्यांवर आली आहे.

पिंपरीतील मुख्य लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईसह चौकाचौकात टेम्पो, हातगाडीवर सर्वत्र टोमॅटोच-टोमॅटो पहायला मिळत आहेत. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने टोमॅटो स्वस्त होवूनही ग्राहक त्याकडे पहायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच विक्रेते देखील हवालदिल झाले आहेत. मागच्या दोन दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली असल्याने त्याचे भाव घसरले असल्याची माहिती भाजी विक्रेते विश्‍वास डोंगरे यांनी दिली आहे.

नारायणगाव येथे टोमॅटोची मोठी बाजारपेठ असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल झाला आहे. तसेच मोशी, पुणे मार्केट, सासवड येथे ही टोमॅटोची आवक जास्त झाल्याने शहरातील बाजारातही त्याची आवक वाढली आहे. त्यामुळे टोमॅटो 4 ते 5 रूपये किलो ठोक भावाने विक्रेत्यांना जाग्यावर मिळत आहेत. यामुळे चांगल्या दर्जाचे टोमॅटोही 8 ते 10 रूपये किलो आहे. तर कमी प्रतीचे टोमॅटो 5 रूपये किलोने विकले जात असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. यातून वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

टोमॅटोची स्वस्ताई का?
मागच्या आठवड्यात 15 ते 20 रूपये किलो असलेला टोमॅटो एकाएकी घसरल्याने विक्रेत्यांसमोर माल विकायचा कसा असा गंभीर प्रश्‍न उभा राहिला असल्याची माहिती विक्रेते अमोल सुर्यवंशी यांनी दिली. गल्लोगल्ली हातगाड्यांवर भाजीपाला विकला जात आहे. घरपोच नागरिकांना भाजीपाला मिळत असल्याने त्यांनी मंडईकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे टोमॅटो दोन-तीन दिवसात विकला न गेल्यास रस्त्यावर फेकण्याशिवाय पर्याय नसतो, असेही विक्रेत्यांनी सांगितले. मागील काही दिवस पाऊस जोरात सुरू असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो काढले नव्हते. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्याने त्यांचे भाव चढे होते. आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो काढायला सुरुवात केली. सगळीकडे हीच परिस्थिती असल्याने टोमॅटोची आवक बाजारात वाढली आहे. परिणामी त्याचे भाव उतरले आहेत. टोमॅटो उशिराने काढला गेल्याने तो अधिक पिकला आहे. परिणामी, हा टोमॅटो जास्त दिवस ठेवता येत नाही. याच वर्षी एप्रिल आणि मे मध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने तेव्हाही टोमॅटोचे दर घसरले होते, त्यामुळे त्याचे दर पूर्ववत व्हायला वेळ लागणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

सध्या 80 ते 100 रूपये किलो कॅरेट टोमॅटोचा भाव मार्केटमध्ये आहे. एवढी मेहनत करूनही योग्य भाव मिळत नसल्यावर आम्ही करायच काय. यातून नफा मिळणं दूरच. भांडवल, मजुरी मिळणेही कठीण झाले आहे. टोमॅटोचे दर इतके खाली येतील, असे वाटले नव्हते. पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचा धोका असताना आता दरही गडगडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
– हनुमंत सोमण, शेतकरी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)