टोन्ड व डबलटोन्ड दुधात भेसळीचे प्रमाण जादा

बंदी आणण्याची डेरे यांची मागणी; सरकारी धोरण भेसळीला कारणीभूत
प्रभात वृत्तसेवा
नगर –पूर्वी दुधाची कमतरता असल्याने टोन्ड दुधाचा वापर केला जात असे; परंतु आता दूध अतिरिक्त होत असल्याने टोन्ड अथवा डबल टोन्ड दुधाची गरज नाही. या टोन्ड आणि डबल टोन्ड दुधात भेसळीचे प्रमाण वाढले आहे. हे भेसळीचे दूध आरोग्यास अपायकारक असल्याने ग्राहकांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेला आहे. तेव्हा त्वरित टोन्ड दुधावर बंदी आणावी, अशी मागणी कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यात दुधाचे उत्पादन सव्वा दोन कोटी लिटर आहे. टोन्ड व डबल टोन्ड दूध कमी केले, तर 30 टक्के म्हणजे 60 लाख लिटर दुध कमी होईल, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, की पावडरसाठी प्रतिदिन 50 लाख लिटर दूध जाते. पावडरनिर्मिती थांबवल्यास 50 लाख लिटर दूध कमी होईल. असे झाले, तर अतिरिक्त दुधाच्या प्रश्‍नातून मार्ग काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यास गाईच्या दुधास 35 रुपये व म्हशीच्या दुधास 45 रुपये भाव देणे शक्‍य होईल. ग्राहकास नैसर्गिक दूध मिळेल. देशातील एकूण दूध उत्पादन 14 कोटी लिटर आहे, असे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्ष दूध विक्री 64 कोटी लिटर आहे. म्हणजे सुमारे 50 कोटी लिटर दूध हे भेसळीचे दूध आहे. त्यात अनेक रसायने, हानिकारक तेल, युरिया वगैरे घालून दूध तयार केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हण्यानुसार असेच चालू राहिले, तर येत्या 2025 सालापर्यंत 87 टक्के लोकांना कॅन्सरसारख्या रोगांना सामोरे जावे लागेल. त्याचप्रमणे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब तसेच मूत्रपिंडाचे आजार होतील.
अन्नसुरक्षा प्राधिकरणाने गाईच्या दुधाच्या गुणप्रतीत 3.5 स्निग्धांशऐवजी 3.2 स्निग्धांश व 8.5 उष्मांकाऐवजी 8.3 उष्मांक अशी सुधारणा केली आहे. टोन्ड दुधापेक्षा कमी गुणप्रतीचे दूध विक्री करण्यासाठी परवानगी दिलेली आहे; परंतु खासगी दूध विक्रेते व दूध उत्पादक हे ग्राहकाचे हित दुर्लक्षित करून स्वतः च्या फायद्यासाठी कमी प्रतीचे दूध पावडर व लोणी वापरून 3.5 स्निग्धांश व 8.5 उष्मांकाचे टोन्ड दूध विक्रीसाठी पाठवित आहेत. राज्यात एकूण दूध विक्रीपैकी 75 टक्के टोन्ड दूध विकले जाते. पावडर वापरून फुल क्रिम मिल्क म्हणून म्हशीच्या दुधाची विक्री होत आहे.त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न अधिकच बिकट होत असून त्याचा प्रत्यक्ष त्रास हा कष्टाने दूध उत्पादित करीत असलेल्या दूध उत्पादकांना होत आहे, असे डेरे यांनी निदर्शनास आणले आहे. दूध उत्पादकांना महागाचे जनावर, त्यासाठी आवश्‍यक असलेला वैरण व महाग पशुखाद्य घ्यावे लागते. त्यामानाने त्याला दुधाचा दर मिळत नाही. चांगल्या प्रतीच्या साडेतीन स्निग्धांश व साडेआठ उष्मांकाच्या दुधाला 20 रुपये प्रति लिटर दर दिला जातो. त्याच दुधात पाणी व कमी प्रतीची पावडर टाकून तयार केलेले टोन्ड दूध 44 रुपये प्रति लिटर या भावाने ग्राहकांना विक्री केले जाते.खासगी दूध व्यावसायिकाकडून वितरकांना हाताशी धरून संगनमताने प्रतिलिटर 24 रुपयांची लूट केली जात आहे. त्यामुळे टोन्ड दुधावर निर्बंध आणण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या सरकार दूध उत्पादकांना 5 रुपये प्रतिलिटर अतिरिक्त दर देत असल्याचे भासविते; परंतु वस्तुस्थिती तशी नाही. दूध भुकटी प्रकल्पवाले संगनमताने शेतकऱ्यांकडून कमी भावात दूध खरेदी करीत आहेत, असे डेरे यांनी नमूद केले आहे.

भेसळीला सरकारचाच वरदहस्त
आजपर्यंत प्रति पॉइंटफॅट व एनएसएफसाठी 30पैसे कमी व अधिक होत होते; परंतु अनुदान सुरू झाल्यापासून साडेआठ उष्माकांच्या खालील दुधास प्रति पॉइंट 1 रुपया व 8.3 पेक्षा कमी उष्मांकासाठी 5 ते 10 रुपये कमी दर दिला जात आहे. पूर्वी दूध भुकटी प्रकल्पावर येणारे दूध 3.5 स्निग्धांश व 8.5 उष्माकांचे लागत होते. तेच दूध आता 3.2 व 8.3 चे लागत आहे. त्यामुळे एकंदरीत दुधात भेसळ करण्यास प्रवृत्त केले जात आहे. दुधाचा दर चांगला मिळावा, म्हणून दूध व्यावसायिकांना कमी प्रतीच्या पावडरचा, युरियाचा, शाम्पू, फॉरमलीन, पामऑईलचा वापर करण्यास भाग पाडत आहे. ही भेसळ रोखण्यासाठी सरकारकडे कोणतीच यंत्रणा नाही, असा आरोप डेरे यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)