“टोईंग व्हॅन’ देता का …?

– गाड्या उचलताना वाहतूक पोलिसांची कसरत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक विभागाकडे शहरातील नो-पार्किंगच्या गाड्या उचलण्यासाठी एकही टोईंग व्हॅन व टेम्पो नाही तर दुसऱ्या बाजूला राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या 15 नोव्हेंबरच्या आदेशानुसार पुण्यासाठी नवीन आधुनिक टोईंग व्हॅन लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाबरोबरच पुन्हा एकदा वाहनांत देखील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला डावलण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी पोलीस आयुक्तालयापाठोपाठ स्वतंत्र वाहतूक विभागही तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहरात 10 वाहतूक विभाग तयार करण्यात आले. यामध्ये दिघी, आळंदी, चाकण, तळेगाव, तळवडे अशा नवीन विभागांचा यात समावेश करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी असल्यामुळे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे शहरात लोकसंख्येपाठोपाठ वाहनांचीही संख्या वाढत आहे. त्याचबरोबर शहरात पार्किंग समस्या हा नवीन प्रश्‍न डोके वर काढत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक विभागाकडे एकही टोईंग व्हॅन व टेम्पो नाही; तर दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवड शहराला लागूनच असणाऱ्या पुण्यात 2015 सालापासून सुरु असणाऱ्या टोईंग पद्धती ही जुनी झाली असून त्यासाठी लवकरच नवीन टोईंग वाहने पुण्याला मिळणार आहेत. हा विरोधाभास केवळ वाहतूक विभाग नाही तर पोलीस आयुक्तालयाच्या अनेक बाबतीत दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडे 10 विभागासाठी केवळ 6 जीप एवढीच तुटपुंजी वाहने आहेत. त्यामुळे “नो पार्किंग’ मध्ये किंवा एखाद्या दुकानासमोर जर कोणी गाडी लावलीच तर त्या गाडीला जॅमर लावून गाडीचा मालक ट्रेस करावा लागतो किंवा गाडी मालक गाडीकडे येईपर्यंत वाट पहावी लागते. तसेच शहरात पीएमपीएमल बस देखील नादुरुस्त झाली तर ती आपोआप लॉक होते अशा वेळी पीएमपीएमएल यंत्रणा तेथे येईपर्तंय बस तशीच रस्त्यावर उभी ठेवावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी या ठरलेल्या समस्येला पिंपरी-चिंचवडकरांना तोंड द्यावे लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातही खासगी वाहनांती संख्या दिवसेंदिवस वाढत असून दरडोई एक वाहन अशी परिस्थीती असून शहराची लोकसंख्या ही 22 लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महापालिका व राज्य शासनाने आता तरी शहराच्या व पोलीस प्रशासनाचा विचार करावा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत. पोलीस आयुक्तालयाकडे केवळ इमारती आहेत. मात्र अद्यापही मनुष्यबळ व वाहनांचा तुटवडा जाणवत असताना, पुण्याकरिता टोईंग व्हॅन उपलब्ध करुन देत असतानाच, पिंपरी-चिंचवड पोलीस आतयक्तालयाला डावलले जाते, हेच यावरून दिसून येत आहे.

शहरात आज एकही टोईंग व्हॅन अथवा टेंपो नाही. त्यामुळे दररोज वाहतूक पोलिसांना कारवाई करताना कसरत करावी लागत आहे. त्यासाठी आम्ही महापालिका व शासनाकडे मागणी केली आहे. फक्त टोईंग व्हॅनच नव्हे तर वाहतूक विभागाला अद्याप इतर वाहनांची देखील गरज आहे. केवळ सहा जीपवर सर्व वाहतूक विभाग चालवणे कठीण काम आहे.
– नितीन जाधव, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)