टोईंग वाहने की वसुली पथक?

संग्रहित छायाचित्र

सीसीटीव्ही झाकून वाहने उचलण्याची कारवाई : उद्देशालाच हारताळ

पुणे – नो पार्किंगमधील वाहने उचलताना त्यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी टोईंग वाहनांना सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्ही झाकून सर्रासपणे वाहने उचलण्याची कारवाई सुरू आहे. यामुळे सीसीटीव्ही बसवण्यामागच्या उद्देशालाच हारताळ फासला जात असून नागरिकांची लूट होत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात रास्ता पेठ येथेही सीसीटीव्हीविना कारवाई सुरू असल्याची माहिती दै. “प्रभात’ने समोर आणली होती.

अनेकदा नो पार्किंगमधील वाहने उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांवर दादागिरी केली जाते. काहीवेळा अशा घटनांमध्ये वाहनचालकांचीही चूक असते. परंतु, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जाते. यामध्ये पारदर्शकता यावी आणि गाडी उचलण्याच्या घटनेचे चित्रीकरण व्हावे, यासाठी शहरातील सर्व टोईंग टेम्पोंना सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच, कारवाईला जाण्याआधी संबंधित वाहतूक निरीक्षकाने सीसीटीव्हीची पाहणी करूनच गाडी सुरू करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत वाहतूक पोलिसांना याचा विसर पडला असून यामुळे ठेकेदारांचे फावत आहे.

मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक येथे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनमधून गाड्या उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी एका महिलेची गाडी उचलून टेम्पोत टाकण्यात आली. हे लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ गाडीकडे धाव घेत पार्किंग झोनमधील गाडी का उचलली? असा सवाल करत गाडी सोडण्याची विनंती केली. मात्र, गाडी नो पार्किंगमधून उचलण्यात आली असल्याचे म्हणत टोईंगचालकाने गाडी सोडली नाही. यानंतर वादावादी झाल्याने पोलिसांनी अखेर ती गाडी विनाचलन सोडावी लागली. दरम्यान, हा सर्व प्रकार होत असताना वाहतूक पोलीस मात्र, टेम्पोच्या पुढील सीटवर बसून चलन फाडण्याचे काम करत होते. यामुळे वाहतूक पोलिसांना कोणाचे भले करायचे आहे? असा सवाल उपस्थित होत असून यामधून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचे दिसून आले.

कोणताही दंड न घेता गाडी सोडली
टोईंग कर्मचाऱ्याने संबंधीत महिलेची गाडी टेम्पोत टाकून ती सोडवण्यासाठी फरासखाना वाहतूक विभागात येण्याचे सांगितले. मात्र, गाडी पार्किंग झोनमधून उचलली असल्याचे महिलेचे म्हणणे होते. सीसीटीव्ही झाकला गेला असल्याने हे सिध्द करून दंड लावायला वेळ लागणार असल्याने वाहतूक पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता गाडी सोडून दिली. यामुळे सीसीटीव्ही बसवण्याच्या उद्देशाला हरताळ फासला गेला असून वाहतूक पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टोईंग करताना कर्मचाऱ्यांनी नियम पाळून कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच, अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. यासंदर्भात आपल्याकडे तक्रार आल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– तेजस्वी सातपुते, वाहतूक उपायुक्त


दुकानासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेत मी गाडी लावली होती. मात्र, तरीही ती उचलून नेण्यात आली. यानंतर गाडी घाईमध्ये नजरचूकीने उचलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने शेवटी गाडी सोडून देण्यात आली. मात्र, अशा प्रकारे सर्वसामान्यांना त्रास देणे चुकीचे असून याकडे वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
– गाडी उचलण्यात आलेली महिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)