टोईंगवाल्यांची “उचलेगिरी’ बंद

संग्रहित छायाचित्र

आता गरजेनुसारच होणार कारवाई : वाहतूक विभागाचा निर्णय

पुणे – वाहने उचलताना सीसीटीव्ही बंद, नोंदवही नसणे, वाहनचालकांशी उद्धट वर्तन करणे टोईंग चालकांना महागात पडले असून शहरात सर्रासपणे होणारी टोईंग कारवाई बंद करण्यात आली आहे. यापुढे ज्या ठिकाणी कारवाईची आवश्‍यकता आहे, अशा ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार गाडी सोडण्यात येणार आहे.

टोईंग वाहने उचलताना नागरिकांची होणारी पिळवणूक आणि याविरोधात आलेल्या तक्रारी पाहता हा निर्णय घेतल्याचे वाहतूक विभागाने सांगितले आहे.

शहरात “नो पार्किंग’मध्ये उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पाच टोईंग टेम्पो आहेत. यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात कारवाई केली जाते. मात्र, अनेकदा नो पार्किंगमधील वाहने उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांवर दादागिरी केली जाते. काहीवेळा अशा घटनांमध्ये वाहनचालकांचीही चूक असते. परंतु, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जाते. यामध्ये पारदर्शकता यावी आणि गाडी उचलण्याच्या घटनेचे चित्रिकरण व्हावे, यासाठी शहरातील सर्व टोईंग टेम्पोंना सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच, कारवाईला जाण्याआधी संबंधित वाहतूक निरीक्षकाने सीसीटीव्हीची पाहणी करूनच गाडी सुरू करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र, टोईंगधारकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून घालून दिलेले नियम पाळण्यात येत नव्हते. याविरोधात अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्याने सससकट टोईंग कारवाई बंद करण्यात आली आल्याचे वाहतूक विभागाने सांगितले. तसेच, यापुढे आवश्‍यक त्याठिकाणी मागणीनुसार टेम्पो पुरवले जाणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सरसकट कारवाई बंद असून आवश्‍यक त्या ठिकाणी टेम्पो सोडण्याचे काम केले जात आहे.

दै. “प्रभात’ने उघड केला होता प्रकार
वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही टोईंग टेम्पोधारकांना नियम घालून दिले होते. यात वाहने उचलताना नोंदवही ठेवणे, सीसीटीव्ही कार्यरत ठेवणे अशा नियमांचा समावेश असून त्याकडे कानाडोळा केला जात असे. दरम्यान, साधारण तीन महिन्यांपूर्वी अप्पा बळवंत चौकात पार्किंगमध्ये लावलेली गाडी उचलल्याचे आणि सीसीटीव्ही झाकून कारवाई सुरू असल्याचा प्रकार दै. “प्रभात’ने समोर आणला होता. यानंतर संबंधित गाडीवर एका महिना निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दोन दिवसांपासून शहरातील सर्व टेम्पोकडून वाहने उचलण्याची कामे बंद करण्यात आली आहेत. एखाद्या ठिकाणी कारवाईची गरज असल्यास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास टोईंग टेम्पो पाठवण्यात येतो. मात्र, सरसकट कारवाईचे काम बंद करण्यात आले आहे.
– विजय बाजारे, पोलीस निरीक्षक, प्रशासन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)