टॉम क्‍लान्सी आणि जॅक रायन

संपूर्ण शहर भर गेल्या महिन्याभरापासून ‘जॅक रायन’ या अमेरिकन नेट सेरीजची जोरदार जाहिरातबाजी सुरु आहे. ‘जॅक रायन’चे पोस्टर्स पाहूनच आपण अंदाज लावू शकतो की अॅमेझॉनची ही नेट सिरीज जबरदस्त अॅक्‍शनचे पॅकेज असणार आहे. जर आपण ही टीव्ही सिरीज पाहिली असेल अथवा हिचे पोस्टर्स पहिले असतील तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल ती म्हणजे या नेट सेरीजच्या नावापूर्वी ‘टॉम क्‍लान्सी’ या लेखकाचे नाव आवर्जून लावले जात आहे. कोण आहेत हे ‘टॉम क्‍लान्सी’ आणि जॅक रायनशी त्यांचा नेमका काय संबंध आहे हे जाणून घेऊयात…

थॉमस लिओ क्‍लान्सी उर्फ टॉम क्‍लान्सी हे एक प्रसिद्ध अमेरिकन कादंबरी लेखक होते. क्‍लान्सी यांचा शीत युद्धानंतरचे गुप्तचर विभागाचे कामकाज व सैन्य विज्ञानातील ‘टेक्‍निकल’ बारकावे टिपणाऱ्या कादंबऱ्या लिहण्यामध्ये हातखंडा होता. त्यांनी याच विषयावर लिहिलेल्या ‘द हंट ऑफ रेड ऑक्‍टोबर’, ‘पॅंट्रीऑट गेम्स’, क्‍लिअर अँड प्रेसेंट डेंजर’, ‘द सम ऑफ ऑल डेंजर’ इत्यादी कादंबऱ्या विशेष गाजल्या. पुढे जाऊन त्यांनी लिहलेल्या याच कादंबऱ्यांवर आधारित अनेक चित्रपट देखील बनवण्यात आले आणि प्रेक्षकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद देखील दिला.

-Ads-

क्‍लान्सी यांनी लिहलेल्या या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी जॉन पॅट्रिक रायन उर्फ ‘जॅक रायन’ हे काल्पनिक पात्र रेखाटले होते. अमेरिकन गुप्तचर विभाग सीआयए मध्ये कारकुनाचे काम करणारा हा जॅक रायन आपल्या असामान्य कौशल्याद्वारे कशाप्रकारे देशाला वेळोवेळी वाचवतो हे क्‍लान्सी यांनी लिहलेल्या कादंबऱ्यांमधून वाचायला मिळते.

क्‍लान्सी यांचे ‘जॅक रायन’ हे प्रसिद्ध पात्र वापरून पुढे त्याच्यावर ‘हॉलिवूड’पट बनवण्यात आले. आजपर्यंत याच ‘जॅक रायन’ची भूमिका अनेक तगड्या हॉलिवूड अभिनेत्यांनी साकारली आहे यामध्ये हॅरिसन फोर्ड, ऍलेक बाल्डविन, बेन आफ्लेक, क्रिस फाईन या सुपरस्टार्सचा सामावेश आहे.

अमॅझॉन तर्फे बनवण्यात आलेली ‘जॅक रायन’ ही नेट सिरीज देखील टॉम क्‍लान्सी यांच्याच पात्रावर आधारित असून यावेळी ‘जॅक रायन’चे पात्र साकारण्याची धुरा सुप्रसिद्ध अमेरिकन टीव्ही व चित्रपट अभिनेता जॉन क्रिस्टिन्स्की सांभाळत आहे. टॉम क्‍लान्सी यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. याच स्टारडमचा वापर करून अमॅझॉन प्राईम ओरिजनल प्रोडक्‍शन सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या नेट सेरीजच्या स्वरूपात ‘जॅक रायन’ प्रेक्षकांपुढे मांडत असल्याने याला प्रेक्षक कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

– प्रीती फुलबांधे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)