“टेल’ भागातील शेतक-यांना आवर्तनाची प्रतिक्षा

आवर्तन सुटूनही अजून पाणी नाही
गोपाळपुर – मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. जवळपास आवर्तन सुटून वीस दिवस होत आले आहे. परंतु अजून पण या धरणाच्या “टेल’ चा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिडेगाव, शिरसगाव, गोपाळपुर, वरखेड येथील शेतकरी मुळा धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे. शेवटी का होईना पण कालव्याचे पाणी येणार का? याचीच चिंता या भागातील शेतक-यांना पडली आहे.
मुळा धरणातून शेती पिकासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. प्रचंड ऊन असल्याने पिके सुकू लागली आहे. पावसाला वेळ असल्याने एक तरी पाणी बसले तरी कसे तरी पिके जगतील ही अपेक्षा शेतकर्यांची असते. गेल्या दोन वर्षापासून मुबलक पाऊस असल्याने धरण भरत आहे. परंतु योग्य नियोजन नसल्याने मागील उन्हाळ्यातही शिरसगाव, गोपाळपुर परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले होते. यावेळेसही आवर्तन सुटुन वीस दिवस होत आले तरी पण पाणी येण्याची कुठलीच आशा दिसत नाही.
या भागाचा वरचा भाग म्हणजे सलाबतपूर हा पण टेलचा भाग म्हणून ओळखला जातो. प्रथम या भागात पाणी येते. नंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी खाली पाणी सोडले जाते. परंतु अजून या भागातच पाणी न आल्याने खाली तरी पाणी कुठून येणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
पाणी आल्यानंतर पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन केले जाते. परंतु पाणी वापर संस्थेवर ठराविक लोकांची मक्तेदारी असल्याने पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. यामुळे बहुतेक शेतक-यांना पाण्यापासून मुकावे लागते. प्रसंगी वादही होतात. पाणी वापर संस्था बरखास्त कराव्या अशी अनेक दिवसापासूनची मागणी असूनही शासन त्या बरखास्त करत नसल्याने शेतकरी या संस्थांना पूर्ण पणे वैतागला आहे.
तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी जाहीरपणे सांगतात. कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही. परंतु योग्य नियोजनाचा अभाव व अधिका-यांवर वचक नसल्याने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी “टेल’ चा भाग पाण्यापासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहे.

प्रचंड प्रमाणात उन्हाळा असल्याने सर्वत्र पाण्याची मागणी वाढली आहे. वरच्या लोकांच्या त्रासामुळे टेलच्या भागातील लोकांसाठी पाणी मिळण्यात अडचणी येत आहे. यामुळे खाली पाणी सोडण्यासाठी उशीर झाला आहे. एक दोन दिवसात सलाबतपूरला सुटल्यानंतर पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये शिरसगाव व परिसरातील शेतकर्यांसाठी पाणी सोडण्यात येईल.
-एच.बी.पवार,(शाखा अधिकारी,)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)