टेलटॅंकमुळेच टाकळीभान परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌…

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अवर्षणप्रवण पट्ट्यात असलेली श्रीरामपूर तालुक्‍यातील शेती सिंचनाखाली यावी यासाठी ब्रिटिशांच्या राजवटीत प्रयत्न झाले. त्यामुळेच इंग्रज सरकारच्या काळात 1935 साली भंडारदरा धरण बांधण्यास सुरुवात झाली. मात्र, भंडारदरा धरणाची निर्मिती होऊनही टाकळीभान पंचक्रोशीचा काही भाग सिंचनाखाली आला नाही. पिढ्यान्‌पिढ्या निसर्गाच्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या कोरडवाहू पट्ट्यासाठी टाकळीभान टेलटॅंक आधार ठरल्याने पंचक्रोशीतील सुमारे दहा ते बारा गावांची शेती “सुजलाम्‌ सुफलाम्‌’ होऊन शेतकऱ्यांचा राहणीमानाचा स्तर उंचावला गेला आहे. टेलटॅंकमुळेच परिसर बारमाही हिरवा शालू पांघरून आज दिमाखात डोलताना दिसत आहे.

टाकळीभान टेलटॅंक पंचक्रोशीला मिळालेले एक वरदानच आहे. भंडारदरा धरणाचे शेतीसाठी सिंचन सुरू होऊनही टाकळीभानचा काही भाग या सिंचनाच्या पाण्यापासून वंचित होता. अनेक पिढ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या कोरडवाहू शेतकऱ्यांचे दुःख 1972 साली श्रीरामपूर विधानसभेचे लोकप्रतिनिधी स्व. गोविंदराव आदिक यांनी हेरले होते आणि योग्य संधी मिळताच या परिसराचे भाग्य उजळविण्यासाठी 1972 च्या भयानक दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी टेलटॅंकची मुहूर्तमेढ रोवली आणि टाकळीभानच्या माळरानावर टेलटॅंक उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात निधी उपलब्ध नसतानाही आ. आदिकांनी स्वतःच्या हिमतीवर काम नेटाने सुरूच ठेवून एका बाजुला दुष्काळग्रस्तांच्या हाताला काम दिले, तर दुसऱ्या बाजुला जिरायत पट्ट्याला हिरवा शालू मिळवून देण्याचेही काम केले.

टेलटॅंकचे 1972 ला कामाच्या शुभारंभाचे नारळ फोडून सलग चार वर्षांनी काम पूर्णत्वास गेले. 1980 च्या दरम्यान भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून पहिल्यांदा टेलटॅंक भरण्यात आला आणि परिसरातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलले. 97 द.ल.घ.फू. साठवण क्षमता असलेल्या या टेलटॅंकला कालवा आहे. कालव्याच्या माध्यमातून टाकळीभानचा काही भाग व घोगरगाव (नेवासा) येथील शेती सिंचनाखाली आलेली आहे. कालव्याद्वारे सुमारे चार हजार एकराचे सिंचन करून जलसंपदा विभागालाही चांगला महसूल मिळतो. 1980 ते 2018 या 38 वर्षांच्या कालावधीत सहा-सात वर्षांचा अपवाद वगळता टेलटॅंक पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. सिंचनासोबतच परिसरातील सुमारे 10 ते 15 गावांच्या पाणीपातळीत टेलटॅंकमुळे वाढ झाल्याने परिसराने हिरवा शालू पांघरला आहे.

शेतीच्या पाण्यासोबतच परिसरातील टाकळीभान, खिर्डी, वांगी, गुजरवाडी, भोकर, खोकर, कारेगाव, भेर्डापूर या गावांच्या पाणीपुरवठा योजना याच परिसरातून सुरू करून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघालेला आहे. त्याचबरोबर भांडवलदार शेतकऱ्यांनी टेलटॅंक परिसरात गुंठा, दोन गुंठे जमिनी विहिरीसाठी घेऊन भांडवली गुंतवणूक करून सहा ते सात कि.मी. अंतरापर्यंत सायफनद्वारे पाणी नेऊन शेती बारमाही हिरवीगार केली आहे. या सायफनच्या पाण्यामुळे बागायत झालेल्या शेतीच्या पाण्यामुळे आजुबाजुच्या छोट्या शेतकऱ्यांच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरात बारमाही पाणी झाल्याने गेल्या 38 वर्षांत या परिसरातील नागरिकांचा राहणीमानाचा स्तर उंचावलेला आहे. शेती हिरवी झाल्याने उत्पन्नात वाढ झाल्याने राजकीय प्रगल्भता वाढून या परिसरातील पुढारी तालुक्‍याच्या व जिल्ह्याच्या राजकारणावरही दबदबा ठेवून आहेत. एकूणच टाकळीभान पंचक्रोशीच्या प्रगतीसाठी टेलटॅंकचे मोठे योगदान आहे यात तीळमात्र शंका नाही. टेलटॅंकमुळेच परिसरात ग्रीन झोन झाला व परिसर “सुजलाम्‌ सुफलाम्‌’ झाला आहे. हेच परिसराच्या प्रगतीतील पूर्ण सत्य आहे.

 

 

रामेश्‍वर अरगडे 
वार्ताहर, टाकळीभान, ता. श्रीरामपूर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)