टेम्पोल रोझच्या पुणे कार्यालय प्रमुखाच्या पोलीस कोठडीत वाढ : गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण

पुणे, दि. 20 (प्रतिनिधी) – भूखंड नावावर करण्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांना 2 कोटी 13 लाख 55 हजार 673 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा.लि. कंपनीच्या पुणे शाखा कार्यालयाच्या प्रमुखाच्या पोलीस कोठडीत 22 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एम.डब्ल्यू.चांदवाणी यांनी हा आदेश दिला आहे. आरोपीने वैयक्तीक सुमारे 700 गुंतवणूकदारांना 25 कोटी गुंतवण्यास प्रवृत्त केले आहे. त्याचा मुलगा ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास आहे. जामिन मिळाल्यास तो फरार होण्याची शक्‍यता आहे, असा अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडेत वाढ केली.
रमेश जियंदमल अघीचा (वय 57, रा. रहाटणी) असे पोलीस कोठडीत वाढ केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वीच मुख्य सूत्रधार देविदास गोविंदराम सजनानी (वय 67, रा. मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात दीपा देविदास सजनानी, वनिता देविदास सजनानी (दोघेही, रा. मुंबई), मार्क्‍स योहान थोरात (रा. मुरबाड), केशव नारायण इदिया (रा. मुंबई) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना 5 जुलै 2013 ते 19 मार्च 2017 या कालावधीत पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात घडली. भूखंड नावावर करून देण्याचे अमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसंनी अघीचा याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)