टेमघर धरणाची डिसेंबरपासून पुन्हा दुरुस्ती

धरणाच्या भिंतींवर ग्राऊटिंग आणि ड्रिलिंगचा वापर

पुणे – टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला यश आल्यानंतर धरणातील गळती काही प्रमाणात कमी झाली आहे. टेमघर धरण गळतीपासून मुक्त करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केला आहे. त्यानुसार धरणाच्या आतील बाजूच्या भिंतीस सिमेंटचे अस्तरीकरण आणि धरणाच्या बाहेरील भिंतीवर ग्राऊटिंग आणि ड्रिलिंगचा वापर करून छिद्रे बुजविण्याचे काम करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टेमघर धरणाची दुरुस्ती डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी धरण रिकामे असणे आवश्‍यक असल्याने टेमघर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत आहे. सध्या टेमघर धरणात 13 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून धरणात पाणीसाठा करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पाणीसाठा सुरू केल्यावर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच टेमघर धरणातून गळती होत आहे. 2016 साली धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. या पाणी गळतीचे प्रमाण प्रति सेंकद 2 हजार 500 लिटर एवढे होते. त्यामुळे हा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. ही गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने सेवानिवृत्त सचिव रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली होती. या समितीने पाणी गळती रोखण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचविल्या होत्या.

यंदा 80 टक्‍के भरले होते धरण
सध्यस्थितीत टेमघर धरणाच्या दुरुस्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या कामामुळे धरणातील गळती कमी होण्यास मदत झाली आहे.

या धरणाची पावणेचार टीएमसी एवढी क्षमता आहे. गळतीमुळे हे धरण 60 ते 70 टक्के भरून देण्यात येत आहे. दुरुस्तीमुळे या वर्षीही या धरणात कमी साठा ठेवण्यात आला होता. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी हे एक धरण आहे. खडकवासला धरणापेक्षा दुप्पट पाणीसाठा या धरणात होतो. मात्र, गळतीमुळे या धरणात पावसाळ्यात जमा होणारे पाणी खाली सोडावे लागते. गळतीमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. यंदा मात्र धरण 80 टक्के भरण्यात आले होते.

ग्राऊटिंग म्हणजे काय?
धरणातील पाण्याची गळती रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रायमरी आणि सेंकडरी ग्राऊटिंगचे काम करण्यात आले. ग्राऊटिंगचे काम म्हणजे धरणाच्या भिंतीमध्ये सिमेंट, फ्लाय अॅश आणि सिलिका यांचे मिश्रण एका विशिष्ट दाबाने सोडणे. त्यामुळे धरणाच्या भिंतीमधील पोकळ्या भरून आल्या असून भिंतीला मजबुती आल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.

ग्लायटिंग म्हणजे काय?
डिसेंबरपासून करण्यात येणाऱ्या दुरुस्तीमध्ये अॅशट्रिप ट्रीटमेन्ट, टर्चरी ग्राऊटिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्लायटिंग म्हणजेच धरणाच्या पाण्याच्या बाजूच्या भिंतीला फायबर आणि विशिष्ट केमिकलचा लेप देणार असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.

नोव्हेंबरमध्ये रिकामे होणार धरण
शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. वरसगाव, पानशेत आणि टेमघर या तीन धरणांमधून टप्पाटप्याने शहरासाठी खडकवासला धरणात पाणी सोडले जाते. टेमघर धरण दुरुस्तीचे काम करण्यासाठी आधी धरण रिकामे करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्राधान्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. त्यामुळे धरण लवकर रिकामे झाले. मागील वर्षीसुध्दा याच पद्धतीने पहिल्यांदा टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले होते. सध्यस्थितीत टेमघर धरणात अर्धा टीएमसी म्हणजे सुमारे 14 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नोव्हेंबरमध्ये धरण रिकामे केले जाणार आहे.

…म्हणून झाली धरणातून गळती
टेमघर धरणाच्या कामाला 1997 मध्ये सुरूवात झाली होती. 2000 साली या धरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाले होते. फक्त ग्राऊटिंगचे काम करणे शिल्लक होते. मात्र, त्याच वेळी वनविभाग आणि जलसंपदा विभागामध्ये धरणाच्या जागेवरुन वाद होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला परवानगी मिळाली. त्या वेळी ग्राऊटिंगचे काम न करताच धरणामध्ये पाणीसाठा करण्यात आला. परिणामी, काही वर्षांतच या धरणातून गळती होण्यास सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)