टेनिसचा अनभिषिक्त सम्राट…

काल संध्याकाळी संपुर्ण सोशल मीडियावर सर्वात जास्त फक्त एकच नाव ट्रेंड करत होतं… ते म्हणजे रॉजर फेडरर… टेनिसचा अनभिषिक्त सम्राट हे नाव रॉजरला अगदी सार्थ ठरतं. कारकिर्दीमधलं १९ वं ग्रँड स्लॅम आणि विम्बल्डनचं ८ वं जेतेपद काल रॉजरने त्याच्या नावावर केलं. विजयी क्षणाच्या वेळी रॉजर भावुक झाला होता. त्याने केलेला नवीन विक्रम इतक्यात कुणीही मोडू शकणार नाही, इतका मोठा असा तो विक्रम आहे. म्हणजे ८ व्यांदा विम्बल्डन जिंकणारा रॉजर पहिलाच खेळाडू ठरलाय. शिवाय फेडरर व्यावसायिक टेनिसला सुरुवात झाल्यानंतरचा सर्वात वयस्कर विम्बल्डन विजेता ठरलाय.

२०१२ मध्ये अँडी मरेला हरवल्यानंतर रॉजरने विम्बल्डनचं ७ वे जेतेपद त्याच्या नावावर केलं होतं. त्यानंतर २०१४ आणि २०१५ साली अंतिम फेरीत पोहोचूनही रॉजरला पराभवाचा सामना करावा लागला होता. म्हणजे २०१२ नंतर ५ वर्षांनी रॉजरने विम्बल्डनमध्ये कमबॅक केलेलं आहे. ३६ वर्षांचा असा हा टेनिसचा अनभिषिक्त सम्राट त्याचं वाढतं वय पाहता पुन्हा विम्बल्डन जिंकेन की नाही अशी चर्चा काही जणांनी  गेल्या काही वर्षांपासून सुरु केली होती. पण फेडररने त्याच्या खेळातूनच त्याच्या टीकाकारांना उत्तर दिलेलं आहे. काल सामना संपल्यानंतर तो एक खूप महत्वाचं वाक्य बोलून गेला, ‘तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं, आणि मी सतत स्वतःवर विश्वास ठेवत आलोय…त्यामुळेच हे यश मी संपादन करू शकलोय..” फेडररचे या विम्बल्डन मधले सगळे सामने बघितले तर एक ३६ वर्षांचा खेळाडू या प्रकारचा दर्जेदार खेळ करतोय यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण केवळ स्वतःवर असणारा विश्वास आणि खेळाप्रती प्रामाणिक, नम्र राहण्याची सवय या गोष्टी रॉजर फेडररचं नाव खूप महान खेळाडूंच्या यादीत याआधीच आलेलं आहे. आमची पिढी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे की रॉजर फेडररचा दर्जेदार खेळ आम्हाला पाहायला मिळतोय.

यावर्षीच्या विम्बल्डन मध्ये रॉजर फेडररने एकही सेट हरलेला नाही. शिवाय अंतिम सामन्यात  एकूण फक्त ८ गेम्स तो हरला. त्यामुळे त्याचं या खेळाप्रती असलेलं डेडिकेशन पाहून एवढंच म्हणावसं वाटतं. हॅट्स ऑफ टू यु रॉजर…
– अमोल कचरे 

 

     

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)