टेक्‍निकल रायटर्स बनायचंय? (भाग एक)

टेक्‍निकल रायटर्स हे क्षेत्र अजूनही अनेकांसाठी अनोळखीच आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे टेक्‍निकल रायटर्स. कुठलंही किचकट तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगणं हेच टेक्‍निकल रायटर्सचं काम असतं. जर तुमची इंग्लिश भाषेशी सलगी असेल आणि तंत्रज्ञानाची आवड असेल, तर हे क्षेत्र उत्तम संधी देणारं आहे.

टेक्‍निकल रायटर्सचं नक्की काम काय असतं, याबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्‍न असतात. याचं मूळ काम सांगायचं झालं, तर एखादी कल्पना किंवा उत्पादन त्याच्या अपेक्षित वाचकवर्गापर्यंत सोप्या आणि समजेल अशा शब्दांमध्ये पोहोचवणं. कुठल्याही उत्पादनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर झाला, की टेक्‍निकल रायटर्सची मदत ही घ्यावीच लागते. याचं कारण म्हणजे, दररोज बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानातले बदल, गुंतागुंत सामान्य ग्राहकांना कळणं जवळजवळ अशक्‍यच असतं. त्यामुळे सध्या तंत्रज्ञानावर आधारित नव्या उत्पादनांना टेक्‍निकल रायटर्सची गरज असते.

तसेच, अनेक कंपन्यांची उत्पादनं बाहेरच्या देशामध्ये तयार होऊन आपल्याकडे येतात. त्यामुळे त्यांच्या “हॅन्डबूक’मध्ये परदेशी भाषेमध्येच सूचना दिलेल्या असतात. अनेकदा त्यांच्या भाषांतराचं कामही टेक्‍निकल रायटर्सना करावं लागतं. एखाद्या गुंतागुंतीच्या उत्पादनाचा वापर कसा करावा याचं मार्गदर्शनही हे टेक्‍निकल रायटर्स करतात. याचा मुख्य निकष असतो, तो “सामान्य लोकांनाही समजेल अशा भाषेमध्ये उत्पादनाची माहिती देणे.’ याचं कारण म्हणजे, एखादी वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान जशाच्या तशा भाषेमध्ये लोकांना सांगितलं, तर ती किचकट भाषा समजण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील आणि तरीही यशाची शक्‍यता कमीच असेल. म्हणूनच लोकांसाठी एखादं उत्पादन तयार करताना त्यांना त्याचा वापरही समजेल, याची काळजी घ्यावी लागते. थोडक्‍यात सांगायचं झालं, तर ज्यांना काहीही तंत्रज्ञान माहित नाही, अशांना वापरलेलं तंत्रज्ञान समजावून सांगणं हेच टेक्‍निकल रायटर्सचं महत्त्वाचं काम आहे.

टेक्‍निकल रायटर्स हे मुख्यत: उत्पादनासंबंधित माहिती लिहिण्याचं काम करतात. उत्पादनांचं “हाऊ टू युज’ पुस्तक, प्रोजेक्‍ट रिपोर्ट, ऑनलाईन हेल्प फाईल्स, इन्स्ट्रक़्शन आणि इन्स्टॉलेशन गाईड्‌स, ग्राफिकल प्रेझेंटेशन्स, उत्पादनांची ब्रोशर्स लिहिणं हे काम टेक्‍निकल रायटर्सचं असतं. तसंच, केवळ वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठीच हे रायटर्स काम करतात असं नाही. आयटी, मेडिकल आणि इंजिनिअरिंग मासिकं यांच्यासाठीही टेक्‍निकल रायटर्स लिहित असतात. समजा, एखादा टेक्‍निकल रायटर इंजिनिअरबरोबर काम करत असेल, तर इंजिनिअरिंग आणि त्याचं डिझायनिंग याबाबत तो सामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. हे एक उदाहरण झालं, पण जिथे जिथे सर्वसामान्यांना न समजणारी तांत्रिक भाषा वापरली जाते, तिथे टेक्‍निकल रायटर्सचं काम असतं.

ज्या उत्पादनाबद्दल टेक्‍निकल रायटर्स सोप्या भाषेमध्ये लिहित आहेत, त्याबद्दल खुद्द त्याला पुरेशी माहिती असणं आवश्‍यक आहे. केवळ लिखाणाची आवड आहे, म्हणून कुणीही टेक्‍निकल रायटर बनू शकत नाही. याचमुळे, जरी हा रायटर तंत्रज्ञानामधला कुणी तज्ज्ञ नसेल, तरीही त्या विषयाची तोंड ओळख असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर, टेक्‍निकल रायटर आहे म्हणजे सगळ्याच तंत्रज्ञानाविषयीस सोप्या भाषेत लिहिणं शक्‍य होत नाही. यासाठी कुठल्यातरी एका क्षेत्रामध्ये आपण प्राविण्य मिळवावं लागतं.

– अनिकेत प्रभुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)