टेक्‍निकल रायटर्स बनायचंय? (भाग दोन)

टेक्‍निकल रायटर्स हे क्षेत्र अजूनही अनेकांसाठी अनोळखीच आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे टेक्‍निकल रायटर्स. कुठलंही किचकट तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगणं हेच टेक्‍निकल रायटर्सचं काम असतं. जर तुमची इंग्लिश भाषेशी सलगी असेल आणि तंत्रज्ञानाची आवड असेल, तर हे क्षेत्र उत्तम संधी देणारं आहे.

टेक्‍निकल रायटर बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान याची आवड असली पाहिजे. तसंच, आपल्यात संशोधनाची वृत्ती असणंही आवश्‍यक आहे. याचं कारण म्हणजे, अनेकदा सोप्या भाषेत लिहिण्यासाठी ते तंत्रज्ञान समजून घेणं अवघड असतं. अशा वेळी वेगवेगळ्या पुस्तकांतून, इंटरनेटवरून आणि कधी कधी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन त्यावरून लेख तयार करावे लागतात. त्यामुळे नुसतीच लेखनकला असूनही उपयोग नाही; तर त्याला संशोधक वृत्तीचीही जोड द्यावी लागते.

टेक्‍निकल रायटर म्हणून काम करताना इंग्लिश भाषेशी चांगली सलगी असणं महत्त्वाचं आहे. याचं कारण, बहुतांश उत्पादनांची माहिती ही इंग्लिशमधूनच उपलब्ध असते. तसंच, तंत्रज्ञानविषयक मदतीसाठी जेव्हा आपण शोध घेतो, तेव्हाही बरीचशी माहिती ही इंग्लिशमधूनच असलेली दिसून येते. त्यामुळे या भाषेची तयारी चांगली असणं महत्त्वाचं आहे. तसंच, त्या जोडीला एखादी परकीय भाषाही शिकल्यास आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. लिहायचा मजकूर अगदी सोप्या, समजेल अशा भाषेमध्ये कसा मांडायचा, याची सवय असणंही महत्त्वाचं असतं.

अन्यथा, मजकूर सोप्या भाषेतला असूनही मांडणी चुकल्यामुळे अर्थ लागत नाही. टेक्‍निकल रायटर म्हणून आपण विविध वर्तमानपत्रं, मासिकं, आयटी कंपन्या, जाहिरात एजन्सींमध्ये काम करू शकतो. एका ढोबळ अंदाजानुसार, दर 30 प्रोग्रॅमर्सच्या मागे एक टेक्‍निकल रायटर असतो. आपल्याकडे प्रोग्रॅमर्सची संख्या वाढत चालली असली, तरीही टेक्‍निकल रायटिंगबद्दल फारशी जागृती नाही. “सोसायटी फॉर टेक्‍निकल कम्युनिकेशन’च्या अंदाजानुसार, भारतामध्ये साधारण 1200 ते 1500 टेक्‍निकल रायटर्स आहेत. अमेरिकेमध्ये हीच संख्या लाखांच्या घरात आहे. सर्वसाधारणत: एक टेक्‍निकल रायटर म्हणून काम करायला सुरूवात केल्यावर दरमहा 10 ते 14 हजार पगार मिळू शकतो.

आपल्या अनुभवाच्या आणि क्षमतेच्या जोरावर दोन-तीन वर्षांमध्येच साधारण 35 हजारांच्या घरात पगार मिळू शकतो. एखाद्या कंपनीमध्ये टेक्‍निकल रायटर म्हणून काम करताना सुरूवातीला “टेक्‍निकल कम्युनिकेटर’ म्हणून काम करता येतं. दोन-तीन वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर “सिनियर टेक्‍निकल कम्युनिकेटर’ बनू शकतो. पाच वर्षांच्या अनुभवावर टेक्‍निकल रायटर्सच्या समूहाचं नेतृत्व आपण मिळवू शकतो. साधारण दहा वर्षांचा अनुभव घेऊन आपण “डायरेक्‍टर ऑफ टेक्‍निकल कम्युनिकेशन’ या पदापर्यंत मजल मारू शकतो. या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहे. आपण जितकं जास्त मन लावून काम करू, तसं आपल्याला पुढे जायची संधी उपलब्ध आहे. या निमित्तानं उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधला दुवा होण्याची संधी आपल्याला मिळू शकते.

– अनिकेत प्रभुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)