टेकड्या व गायरान जमिनी पोखरल्या

दिवसरात्र पोकलेनची “घरघर’ ; मोठ्या प्रमाणात गौण-खनिजांची चोरी

आंबेठाण – खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील औद्योगिक परिसरात तसेच डोंगर, छोट्या टेकड्या व गायरान जमिनी पोखरून प्रचंड प्रमाणात गौण-खनिज चोरी सुरू असून याकडे जाणिवपूर्व दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिसरातील मोकळ्या असलेल्या जागामधील मुरूम चोरी दिवसरात्र सुरू आहे. या मुरूम माफियांना कायद्याचीही भिती राहिली नाही. ही मुरूम चोरी अवैधरीत्या गुंडगिरीच्या जोरावर मोठ्या डंपरच्या साह्याने वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिक करित आहेत.या चोरीमुळे लाखो रूपयांचा शासनाचा महसूल बुडवला जात आहे. मुरूममाफिया लाखो रुपयांची मायागोळा करत आहेत.

औद्योगिककरणामुळे नव्याने उभी राहत असलेली कारखानदारी तसेच जुन्या काळातील घरांच्या जागेकर उभ्या राहणाऱ्या मोठ-मोठ्या इमारतींची पायाभरणी भक्कम व्हावी याकरिता मुरूमाची गरज भासत आहे. हीच संधी हेरून मुरूमचोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मग कमी कष्टात जास्त मोबादला मिळविण्यासाठी डोंगर, टेकड्या तर सोडल्याच नाहीत. तर औद्योगिक परिसरातील मोकळे भूखंडावरही कुठल्याही बाजूला जेसीबी सारखी मोठी यंत्रे पोखरून मुरूम चोरी होत असल्याचे समोर येत आहे. दिवसा मुरूम चोरी करणे तसे अवघडच आहे. यासाठी रात्री गुंडांच्या दहशतीवर गौणखनिज चोरी सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षाने (किंवा तडजोडीने) गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरात कुठल्याही शासकीय परवानगी बिगर किंवा रॉयल्टी न भरता ही मुरूम उपसा जोरात सुरू आहे. मोठ्या जेसीबी मशिन व डंपरच्या साह्याने रात्रभर हजारो ब्रास मुरूम गायब केला जात आहे. निर्ढावलेल्या मुरूम माफिया बिनदिक्कतपणे मोकळ्या व सपाट जागेला अवाढव्य खड्डे पाडले जात असतानाही याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल जात असल्याने हा सिलसिला आव्ह्यातपणे वाढत चालला आहे. या मुरूम उपशांमुळे औद्योगिक परिसरात व शेजारील भामचंद्र डोंगराच्याकडेने मोठाले खड्डे पडलेले दिसत आहेत.भामचंद्र डोंगर ही आध्यात्मिक वारसा असल्याने या डोंगराच्या भोवतालीे अनेक प्रकारचे प्राचिन व दुर्मिळ वृक्षांचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. कित्येक ठिकाणी या डोंगराचा भागच ओसाड झालेला आहे. 20 ते 30 फूट खोल खड्डे मुरूममाफियांनी पाडून यातील गौणखनिज चोरी करण्यात आली आहे.

डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण करून विक्रीसाठी भूखंड तयार करण्यात येत आहेत. विक्री केलेल्या भूखंडावर छोट्या कंपन्या, छोटे बंगले, मोठ्या इमारती उभारण्यात येत आहे.औद्योगिक नवीन कंपन्यांची कामे मोठ्या संख्येने सुरू आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील रस्त्यांची कामेही सुरू असल्याने मजबूतीकरण करण्याकरिता व कंपन्यांचे पायाभरणी भक्कम करण्यासाठी हजारो ब्रास मुरूमाची गरज पडते. एमआयडीसीनेच मोकळ्या भूखंडातील कुठलीही शासकीय परवानगी न घेता किंवा रॉयलटी न भरता जेसीबीच्या साहाय्याने मुरूमाचे उत्खन्न करून पुरवठा केला जात आहे. तरीही ही मुरूम चोरी गुंडगिरीच्या दहशतीवर रात्रीच्या वेळी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकही या गुंडांच्या दहशतीमुळे काहीही करू शकत नाही. या होत असलेल्या मुरूम चोरीला स्थानिक महसूल विभागाने लवकर पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोन्याच्या भावामुळेच डोंगर-टेकडया सपाट
औद्योगिकीकरण वाढल्याने येथील जागेला सोन्याचा भाव आल्याने डोंगर – टेकड्या सपाट करून विक्री करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत जमिनीच्या किमंतीत झालेली प्रचंड वाढ निसर्गाच्या मानगुटीवर बसली आहे. डोंगर पोखरून निर्ढावलेले हे उंदीर जमिनीच्या पोटात शिरले असून, निसर्गाला ओरबडून संपविण्याचा हा प्रकार भविष्यातील मोठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे. गौणखनिज चोरीत मोठा पैसा मिळत असल्याने अनेक मुरूममाफियांचा उदय या परिसरात झाला आहे.

तुझ्या गळा माझ्या गळा

आंबेठाण, बोरदरा व कोरेगाव या गावांच्या गायरान जमिनीतील मुरूम चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेकवेळा समोर आले असूनही महसूल विभागाचे अधिकारी या मुरूमचोरीकडे कानाडोळा करत आहेत. अगदी तलाठ्यांपासून सर्कल पर्यंत या मुरूमचोरीचे हप्ते पोच केले जात आहेत. “तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ याप्रमाणे सर्वजण लाखो रूपयांची माया गोळा करत आहेत. चोरीचा मुरूम विक्रीतून अनेकांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. या संदर्भात अनेकदा आवाज उठवूनही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)