टेकड्यांलगतच्या बांधकामांना दिलासा

राज्य शासनाच्या बंदी आदेशाला सर्वोच न्यायालयाची स्थगिती

पुणे – टेकड्यांलगत शंभर फूट बांधकामांना बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील टेकड्यांलगत असलेल्या हजारो बांधकामांना या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे.

-Ads-

खेड-शिवापूर येथे काही वर्षांपूर्वी टेकडी फोड केल्यामुळे त्यातून एक दुर्घटना घडली होती. त्यामध्ये एका महिलेसह मुलीला जीव गमवावा लागला होता. टेकडीफोड संदर्भात राष्ट्रीय हरित लवादापुढे याचिका दाखल झाली होती. यावरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या नगरविकास खात्याला लवादाने नोटीस बजाविली होती. त्यावर बाजू मांडताना नगरविकास खात्याने राज्यातील टेकड्या आणि टेकड्यांलगतच्या शंभर फुटाच्या परिसरात बांधकामांना बंदी घालण्याचा निर्णय घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते.

त्यानुसार राज्य सरकारने त्यानंतर याबाबतचे आदेश लागू केले. या आदेशामुळे शहरात टेकड्यांलगच्या शंभर फुटाच्या परिसरात यापूर्वीच असलेल्या वसाहतींचे पुनर्विकास अडचणीत आले होते. पुणे महापालिकेने टेकड्यांच्या शंभर मीटरच्या परिसरात निवासी झोन असून देखील बांधकाम परवानगीसाठी दाखल झालेले आराखडे या आदेशामुळे नामंजूर केले होते. परिणामी कोथरूड, सहकारनगर, लॉ कॉलेज रस्ता, सिंहगड रस्त्यासह असलेल्या अनेक सोसायट्या देखील अडचणीत आल्या होत्या. हरित लवादाच्या या निर्णयाविरोधात पुणे क्रेडाईने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आदेशास स्थगिती दिली.

दोन्ही आदेशांना स्थगिती
या संदर्भातील आणखी एक याचिका उच्च न्यायालयातही दाखल झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत सरकारनगर विकास विभागाने काढलेल्या आदेश कायम करण्याचा निकाल दिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनापुढे संभ्रम निर्माण झाला होता. तसेच बांधकामांना परवानगी देता येत नव्हती. यासर्व पार्श्‍वभूमीवर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने काढलेल्या आदेश या दोन्ही आदेशांना स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अनेक सोसायटीधारकांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)