टॅटू काढणाऱ्या व्यक्तींना भारतीय वायूसेनेत भरती नाहीच -दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : शरीरावर टॅटू काढणाऱ्या व्यक्तींना भारतीय वायूसेनेत भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही. खांद्यावर पर्मनंट टॅटू काढल्यामुळे वायूसेना अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णयदिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
वायूसेनेत भरती होणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट टॅटू काढण्याची मुभा आहे. आदिवासी बांधवांच्या रीतीभाती किंवा परंपरेत बसणाऱ्या टॅटूंनाच वायूसेनेत परवानगी आहे. मात्र संबंधित उमेदवाराने गोंदवलेला टॅटू या निकषात बसत नसल्याचे जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस रेखा पाटील यांनी सांगितले. वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचं न्यायालयाने नमूद केले. न्यायालयात अर्ज करताना संबंधित उमेदवाराने टॅटूचा फोटोही जमा केला नसल्याचं न्यायालयाने सांगितले.
खांद्याचा आतील भाग, हाताच्या पंज्याचा मागील किंवा पुढील भाग यावरच पर्मनंट टॅटूची परवानगी असल्याचे वायूसेनेच्या वकिलांनी स्पष्ट केले. याशिवाय, आदिवासी बांधवांच्या रीतीभाती किंवा परंपरेत बसणाऱ्या टॅटूंनाच वायूसेनेत परवानगी आहे. उमेदवाराला भरती करण्याच्या निर्णयाचा अधिकार निवड समितीकडे असल्याचेही वकिलांनी सांगितले.
एअरमन पदावरील नियुक्ती रद्द करण्याच्या वायूसेनेच्या निर्णयाला याचिकाकर्त्याने आवाहन दिले होते. नियुक्तीपत्र जारी केल्यानंतर प्रमाणपत्रं देताना आपल्या शरीरावर टॅटू असल्याची माहिती आपण अधिकाऱ्यांना दिली होती, आपण लपवाछपवी केलेली नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला. वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार याचिकाकर्त्याच्या शरीरावरील टॅटू त्या निकषात बसत नाही. त्यामुळे त्याची नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशात कोणतीही गफलत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)