टॅंकरच्या पाण्याने वाढविली “संत्र्या’ची गोडी

सततच्या पाणी टंचाईवर मात करत अर्जुन शिंदेंनी फुलविली संत्रा बाग

पाण्याचा कोणताही शाश्‍वत स्त्रोत नाही. आजूबाजूला कोणता तलाव नाही, की ओढा नाही. केवळ एक विहीर. तीही हंगामीच. पाऊस आला तर विहिरीत पाणी येते, नाही तर पिण्याच्या पाण्याचेही वांदे होतात, तर शेतीचे काय? असे असूनही अरणगाव (ता.नगर) येथील शेतकरी अर्जुन शिंदे यांनी सव्वा एकरातील संत्रीची 260 झाडे टॅंकरने पाणी घालून जगविली आणि त्यातून तीन साडेतीन लाखांचे उत्पन्नही मिळविले. 70 हजार रुपयांचे टॅंकरचे पाणी, औषध फवारणी, मशागत, शेणखत असा 50 ते 60 हजारांचा खर्च वगळता दीड ते दोन लाखांचा नफा त्यांनी मिळविला. त्यांना मुलगा विजय, रोहिदास यांचीही साथ मिळत आहे.

दुष्काळी तालुका अशीच नगरची ओळख. दरवर्षी पाऊसही जेमतेमच पडतो. तालुक्‍यातील वाळकी, अरणगाव, सारोळा कासार, अकोळनेर, बाबुर्डी, खंडाळा आदी गावांमधील शेतकऱ्यांचा संत्री फळबागेकडे कल आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर संत्रीचे उत्पादनही होते. त्यामुळे शाश्‍वत उत्पन्नाचे साधन म्हणून या भागातील शेतकरी संत्र्याकडे पाहतात. त्यातूनच अरणगाव येथील शेतकरी अर्जुन शिंदे यांनी सव्वा एकरात संत्रीची लागवड केली. 10 बाय 10 फुटावर संत्रीची रोपे लावली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे संत्री बाग असल्याने त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळत गेले. तसेच संत्रीसाठी या भागातील वातावरणही पोषक आहे. घरी जनावरे असल्याने त्यांनी झाडांसाठी शेणखताचा पर्याय निवडला. या झाडांना चांगली फळधारणा व्हायला किमान पाच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे यामध्ये अंतरपिकही घेता येते. म्हणजे झाडे लावण्यापासून किमान पहिले तीन वर्षे तरी त्यामध्ये आपण इतर आंतरपिके घेऊ शकतो, त्यामुळे त्या हंगामी पिकांचा फायदाही आपल्या होतो, असे शिंदे यांनी सांगितले.

झाडांची लागवड केल्यानंतर त्याकडे वेळोवेळी लक्ष दिले. त्यामुळे झाडांवर रोग पडला नाही. त्याचा फायदा झाडे वाढण्यामध्ये झाला. झाडांची वाढ वेगाने झाली. आम्ही आंबेबार धरतो. या बारमध्ये धरलेले फळ अगदी योग्ये वेळेत विक्रीसाठी उपलब्ध होते. विशेषत: उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिन्यात संत्र्याला अधिक मागणी असते. त्याचवेळी आंबेबारमधील संत्रा येतो. त्या काळात रोगराईही कमी असते. त्यामुळे याचा फायदा संत्र्याच्या वाढीसही होतो. बार निघून गेल्यानंतर पुढील वर्षीच्या बारसाठी सल काढण्याचे काम महत्त्वाचे असते. सल काढणे म्हणजे संत्र्याच्या झाडावरील वाळलेल्या फांद्या, काटक्‍या बाजूला करणे. त्यामुळे नवीन पालवी फुटण्यातील अडचणी दूर होतात, असे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात टॅंकरशिवाय पर्याय नाही…
एक विहीर असून त्यावरच संपूर्ण शेती आहे. पावसाळ्याचे चार महिने व नंतरचे चार महिने असे आठ महिने विहिरीला पाणी चांगले असते. सर्व झाडांना ठिबक केलेले आहे. त्याद्वारेच झाडांना पाणी दिले जाते. गेल्या काही वर्षात पावसाचे सातत्य न राहिल्याने कधी कधी ऐन हिवाळ्यात विहिरीचे पाणी तळ गाठते. त्यामुळे झाडांना अनेकदा टॅंकरद्वारे पाणी द्यावे लागते. टॅंकरच्या पाण्यावरच झाडे जगवावी लागतात. यंदा अगदी सुरुवातीलाच पाऊस आला. मात्र गेल्या वर्षीच ऐन पावसाळ्यातही झाडांना टॅंकरनेच पाणी देण्याच वेळ आली होती. गतसाली जवळपास चार महिने टॅंकरने पाणी द्यावे लागले. त्याचा खर्च 70 हजार रुपये झाला होता. इतर खर्च वेगळाच. पाण्याचा कायमस्वरुपी स्त्रोत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे असलेले पाणीच अगदी काटकसरीने वापरावे लागते, उन्हाळ्यात टॅंकरशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी शिंदे यांनी सांगितले.

परवडण्यासाठी किलोला किमान 30 रुपयांचा भाव हवा
संत्र्याला किमान 30 रुपये किलोला भाव मिळाला तर ते परवडते. उत्पादन खर्च निघून काही पैसे हातात राहतात. आम्हाला यापूर्वी 40 ते 60 रुपये किलोपर्यंत भाव मिळाला आहे. यंदा 35 ते 40 रुपये भाव मिळाला. व्यापारी थेट जागेवरून संत्र्याची खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक खर्च वाचतो. तसेच बाजारात गेल्यावर भाव कमी अधिक होण्याची भीतीही नसते. परंतु आम्हाला जर योग्य भाव वाटला तरच आम्ही व्यापाऱ्यांना जागेवर देतो. अन्यथा, 20 किलोचे कॅरेट भरून नगर, पुण्याच्या बाजारात पाठवितो, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)