टॅंकरच्या धडकेत मेंडेवाडीच्या तरुणाचा मृत्यू

मंचर-दुचाकी मोटारसायकलवरील तिघांना उडवून अपघात करून पळून जाणाऱ्या दुधाच्या टॅंकरचालकाला युवकांनी पाठलाग करून पकडले. टॅंकरचालकाची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या हवाली केले. टॅंकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण मृत्युशी झुंज देत आहेत. हा अपघात मंचर शिरूर रस्त्यावर मेंगडेवाडी गावानजीक शुक्रवारी पहाटे झाला.
संतोष बाळासाहेब मेंगडे (वय 35, रा. मेंगडेवाडी, ता. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिरूर-पारगांव कारखाना मार्गे मंचरकडे भरधाव वेगाने दुधाचा टॅंकर (एमएच 12 एमव्ही 3435) येत होता. त्यावेळी मोटारसायकलवरून (एमएच 14 डीव्ही 3007) या संतोष बाळासाहेब मेंगडे, कैलास अनंथा मेगडे, किसन गोरक्षनाथ भोर हे तिघे मेंगडेवाडी येथून गवारमळ्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी टॅंकरने दुचाकी मोटारसायकलला धडक दिली. त्यामध्ये संतोष बाळासाहेब मेंगडे, कैलास अनंथा मेगडे, किसन गोरक्षनाथ भोर हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टॅंकरचालक घटनास्थळी न थांबता टॅंकर घेऊन पळुन गेला. अपघात घडतेसमयी मेंगडेवाडीचे काही तरूण तेथे होते. त्यांनी टॅंकरचालकाचा पाठलाग करून अवसरी बुद्रूक गावाच्या हद्दीतील हिंगेवस्ती येथे टॅंकरचालकाला पकडले. तोपर्यंत काही ग्रामस्थांनी अपघातात जखमी झालेल्या तिघांना ताबडतोब खासगी वाहनातून मंचर येथील सिद्धी हॉस्पीटलमध्ये आणले. तेथे डॉक्‍टरांनी तपासले असता संतोष मेगडे हा मयत झाल्याचे सांगितले. सिद्धी हॉस्पीटलमध्ये जखमी कैलास मेंगडे आणि किसन भोर यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. टॅंकरचालक अमोल बाबूराव निरगे (वय 27 रा. खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरूद्ध अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात बाळासाहेब गेणभाऊ मेंगडे यांनी फिर्याद दिली आहे. या अपघाताचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. घाटगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)