टीका नकोय विकास खरा, काम करणारा खासदारच बरा

– श्रीकृष्ण पादिर

पुणे – निवडणुका येतात अन्‌ जातात. निवडणुकांवेळी अनेकजण जाहीरनामे सादर करतात, केलेल्या विकासाचे कोणी गोडवे गातात तर अनेकदा उमेदवार आपण काय केले अथवा करणार यापेक्षा विरोधी उमेदवाराने काय केले नाही, जे केले ते कसे चुकीचे आहे, असे पटवून देताना पाहायला मिळतात; मात्र कोणावरही टीकाटिपण्णी करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास कोणी केला, कोण करू शकेल याला नेत्यांनी महत्त्व द्यायला हवे, अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदार व नागरिकांना आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येणाऱ्या 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर शिरूर मतदारसंघापुरता आढावा घ्यायचा म्हटला, तर या मतदारसंघात अनेक विकासकामे झालीत, अनेक प्रगतीपथावर आहेत, काहींना अपेक्षित यश मिळालं नाही. झालेल्या पंचवार्षिक काळात प्रामुख्याने बैलगाडा शर्यत, खेड विमानतळ, खेड-सिन्नर महामार्ग चौपदरीकरण आणि पुणे-नाशिक रेल्वे या मुद्‌द्‌यांवरच विरोधकांनी विद्यमान खासदारांना टार्गेट केले आहे. त्याला उत्तरे देता देता खासदारांचाही तेवढाच घाम गळतोय हे नक्की. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार विलास लांडे यांचे परिवर्तनवादी फ्लेक्‍स मतदारसंघात सर्वत्रच झळकत असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापू लागले आहे. विलास लांडे यांनी जनतेचया मनातील प्रश्‍नांना हात घातला आहे. “शिरूर-नगर रस्त्यावर ट्रॅफिक जाम, कुठे गेले पैसे कुठे केलं काम?’, “पुणे-नाशिक रेल्वे धावणार तरी कधी, प्रवाशांची असुविधा थांबणार तरी कधी?’, “सरकारची मानसिकता किती खुजी, बेरोजगारांना म्हणता तळता का भजी?’, “पुणे-नाशिक रस्त्यावर कायमची कोंडी, पुन्हा मत मागणार कोणत्या तोंडी?’ हे आणि अशा अनेक विषयांवर लावलेले त्यांचे परिवर्तनवादी फ्लेक्‍स सर्वसामान्यांचे, जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आज मतदारसंघाचा आढावा घेतला असता, त्यांनी विचारलेले प्रश्‍न हे वास्तवातले आहेत. या प्रश्‍नांवरच विद्यमान खासदारांना विरोधी उमेदवाराला तोंड द्यावे लागणार आहे.

पुणे-शिरूर रस्त्यावर होणारी कोंडी हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असताना येथील आमदार बाबूराव पाचर्णे यांनी ही कोंडी सोडविण्यासाठी सुमारे 200 कोटींचा निधी दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली. यावर कडी करीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याचे सांगत सुमारे दोन हजार कोटींचा निधी आणल्याचे सांगितले. (त्यावेळी भाजप-सेनेमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य होते.) निधी कोणाचा यापेक्षा समस्या सुटतेय हे इथे महत्त्वाचे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी लवकरच सुटेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिक, मतदार, वाहनचालक अन्‌ प्रवाशांना आहे. एकंदरीत कोण कोणावर टीका करतेय यापेक्षा आम्ही विकास करणाऱ्या व दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार, अशीच भूमिका या निवडणुकीत जनतेची असणार आहे.

विमानतळ विषयावर उठले रान
खेड विमानतळाचा प्रश्‍न 2009, 2014 व यावेळीही 2019च्या निवडणुकीत ऐरणीवर असणार आहे. मागील दोन निवडणुकांत विमानतळाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध, त्याला खासदार आढळरावांनी दिलेला पाठींबा याविषयी अनेकांत (मतदारांसह) मतैक्‍य नव्हते. कोये-पाईट, कहू-कोयाळी, खेड सेझसह चार जागांचा सर्व्हे झाला. मात्र हाती काहीच लागले नाही. येथील जागा भौगोलिकदृष्ट्या योग्य नसल्याचा अहवाल एअरपोर्ट अॅथोरिटीला मिळाला असला तरी हे विमानतळ आढळरावांनीच घालवले, हे आयते कोलीत विरोधकांच्या हाती लागले. याला खासदारांनी अनेक सभांमधून, पुरावे दाखवून हे विमानतळ आपल्यामुळे नव्हे; तर सकारात्मक अहवाल नसल्याने गेले हे पटवून देताना नाकीनऊ येत आहेत. अगदी परवा-परवा तर जुन्नर तालुक्‍यातील ओझरमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतही त्यांनी ही सल बोलून दाखवली. त्यांना मुख्यमंत्र्यांनीही साथ देत हे विमानतळ आढळरावांच्या विरोधामुळे नव्हे; तर चुकीची जागा असल्याने गेले असल्याचे सांगितले.

बाह्यवळणांची कामे रखडली
खेड-सिन्नर महामार्ग चौपदरी व्हावा यासाठी खरे तर खासदार आढळराव पाटील यांनी फार मेहनत घेतली. यामध्ये 138 किलोमीटरपैकी 109 किलोमीटरचे काम पूर्ण झाले; परंतु दुर्दैव असे की, काम अंतिम टप्प्यात असताना नेमका शिरूर लोकसभा मतदारसंघात 29 किलोमीटरचा टप्पा अपूर्ण राहिला. खरे तर याच पट्ट्यात वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या टप्प्यात बाह्यवळणांपैकी खेड, मंचर, कळंब, नारायणगाव व आळेफाटा ही कामे रखडली आहेत. तर खेड घाटाचेही काम प्रलंबित आहे. या कामांचा ठेकेदार संबंधित काम करण्यास अयशस्वी ठरला; शज्ञ) त्याला खासदार आढळराव पाटील हेच कारणीभूत आहेत, अशी आवई विरोधक उठवत आहेत. यावर खासदारांनी लोकसभेत आवाज उठवत भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतिन गडकरी यांचयकडे पाठपुरावा करीत या कामांसाठी लवकरच स्वतंत्र निविदा काढत हा कामे पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हायस्पीड रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार?
खेड विमानतळ गेले म्हणून काय झाले? पुरंदर विमानतळाचे टेकऑफ होण्याआधी पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे धावणार. हा प्रवास दोन तासांत शक्‍य होणार, अशी घोषणाच खासदार आढळराव पाटील यांनी केली आहे. 2022पर्यंत रेल्वे ट्रॅकवर आलेली असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. हा शब्द खरे करून दाखण्याची जबाबदारीही आता त्यांचीच आहे. याचे कारण म्हणजे पुणे-नाशिक रेल्वे होणार, हे आताची पीढि लहान असल्यापासून ऐकत आहे. “आपल्या हयातीत रेल्वे धावली म्हणजे झालं’, असं उपरोधिकपणे बोलायलाही ही पीढि विसरत नाही. या रेल्वे मार्गाचा अनेकदा सर्वे झाला. आधी तळेगाव दाभाडेमार्गे, नंतर देहुरोडमार्गे व आता हडपसर-वाघोली मार्गे रेल्वे होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या प्रकल्पालाही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहेच. हा विरोध मोडून काढत, समजावून सांगत प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा परिसरातील जनतेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)