“टीईटी’ परीक्षा जानेवारीत?

हालचाली सुरू : प्रस्ताव मान्यतेसाठी शासनदरबारी

– डॉ.राजू गुरव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरी करण्यासाठी राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याचे बंधन उमेदवारांना घातले आहे. आतापर्यंत “टीईटी’च्या पाच परीक्षा झाल्या असून आता सहावी परीक्षा येत्या जानेवारीमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या मात्र अपुरी आहे. त्यातच 2012 पासून शिक्षक भरतीच शासनाने बंद ठेवली आहे. भरती बंद असताना शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्याची अट शासनाने घातली आहे. आधी वर्षातून दोनवेळा या परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात वर्षातून एकदाच ही “टीईटी’ परीक्षा घेण्यात येत असते. वर्षातून दोनवेळा “टीईटी’ परीक्षा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून अनेकदा करण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात शासनाकडून सकारात्मक भूमिका अद्याप घेण्यात आलेली दिसत नाही.

पहिल्यांदा “टीईटी’ परीक्षा ही 15 डिसेंबर 2013 रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर 14 डिसेंबर 2014, 16 जानेवारी 2016, 22 जून 2017, 15 जुलै 2018 रोजी परीक्षा झाल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या या पाच परीक्षांसाठी पेपर 1 करीता 11 लाख 1 हजार 366 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील केवळ 32 हजार 226 उमेदवार उत्तीर्ण झाले. पेपर 2 साठी 7 लाख 30 हजार 811 उमेदवार परीक्षेला बसले असून यातील केवळ 37 हजार 480 उमेदवार उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या संख्येचा विचार करता उत्तीर्ण उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी असल्याचे आढळून येते.

अन्यथा नोकरी धोक्‍यात येणार
सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही 31 मार्च 2019 पूर्वी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. या उमेदवारांना दोन-तीनदा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी संधी देण्यात आली होती. आता त्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे. अन्यथा या शिक्षकांची नोकरी धोक्‍यात येण्याची शक्‍यता अधिक आहे. या शिक्षकांना परीक्षेची एक संधी उपलब्ध व्हावी यासाठीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने “टीईटी’ परीक्षा लवकर घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केलेल्या आहेत. जानेवारीमध्ये ही परीक्षा व्हावी याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. जानेवारीत परीक्षा घेतल्यास मार्चपूर्वी त्याचा निकाल लावण्यात यश मिळणार आहे. परीक्षा घेण्यास उशीर झाल्यास त्याचा निकालही लांबणीवर पडण्याचीच शक्‍यता अधिक आहे.

“टीईटी’ परीक्षा येत्या जानेवारीमध्ये घेण्यास शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

– तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)