टिप्पण : लोका सांगे ब्रह्मज्ञान…   

शेखर कानेटकर 

भाजपाचे विद्यमान नेतृत्व दिवंगत नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गोडवे आता गात आहे. पण वाजपेयी हे स्वतः संसदेच्या दोन्ही सभागृहातील चांगल्या वागणुकीबद्दल आग्रही होते. “सभागृहात घोषणाबाजी नको, हौद्यात (वेल) उतरणे नको’, असे ते म्हणत. पण आपल्याच या नेत्यांचे भाजप खासदारांनी त्यांच्या हयातीत तरी किती पालन केले? आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत विरोधकांना संसदेतील चांगल्या वागणुकीबद्दल उपदेश देणे चालू आहे. हे म्हणजे “लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ असाच प्रकार झाला. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर झाले आहे. ते पुढील वर्षीच्या 18 जानेवारीपर्यंत चालेल. एरव्ही हिवाळी अधिवेशन नाताळच्या आधी संपते. परंतु यंदा पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू असल्याने, हे अधिवेशन लांबविण्यात आले आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे सर्वात जास्त प्राधान्य निवडणुका येनकेन प्रकारेण जिंकण्याला असल्याने हे स्वाभाविकच होते. विद्यमान मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचे अधिवेशन असेल.

अधिवेशनाची वेळ जवळ येऊ लागली की पीठासीन अधिकारी लोकसभा सभापती व राज्यसभेचे सभापती अर्थात उपराष्ट्रपती, संसदीय कार्यमंत्री आणि पंतप्रधानही अधिवेशन गोंधळाविना सुरळीत चालावे, विरोधकांनी सहकार्य करावे म्हणून लेख लिहून, मुलाखती देऊन आवाहनाची औपचारिकता पूर्ण करतात. संसदीय कामकाजाचे महत्त्व सांगणारे उपदेशामृत पाजतात. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. गोंधळात कामकाज बरेचदा वाहून जाते, असा अनुभव आहे.

आताही देशाचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यंकय्या नायडू यांनी असेच आवाहन केले आहे. “सर्व पक्षांनी एकत्र येऊन संसदेसाठी व इतर सार्वजनिक वागणुकीसाठी आचारसंहिता तयार करून तिचे पालन करावे. म्हणजे लोकांचा लोकशाहीवरील विश्‍वास उडणार नाही,’ असे नायडू यांनी म्हटले आहे.

राजकीय पक्ष व त्याच्या नेत्यांनी संसदेबरोबर सार्वजनिक जीवनातील वागणुकीबाबत दक्ष असायला हवे, त्यासाठीही आचारसंहिता हवी या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या मताबद्दलही दुमत असण्याचे कारण नाही. पण जास्तीत बेताल वक्‍तव्ये करण्यात आज सर्वात पुढे कोण आहे? भाजप परिवारातील मंडळीच ना? विरोधी मंडळीही कधी कधी पातळी सोडून बोलतात, हे मान्यच. पण यात भाजपची मंडळीच आघाडीवर आहेत. त्यांना नायडू लगाम घालू शकणार आहेत का? खरे तर त्यांनी आधी स्वतःच्या घरातून सुरुवात करायला हवी. मग इतरांना उपदेश करावा. उपराष्ट्रपती असल्याने आता आपल्या कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असे सांगून त्यांनी पळवाट काढू नये.
यात गैर वा टीका करण्यासारखे काहीच नाही.

यापूर्वीही अनेक मान्यवरांनी ही अपेक्षा व्यक्‍त केलीच आहे. त्यामुळे त्यात नवीन असेही काही नाही. प्रश्‍न फक्‍त वेळेचा आहे. नायडू यांचा पूर्वाश्रमीचा पक्ष (भाजप) विरोधी बाकांवर असताना त्यांनी हे आवाहन का केले नाही, असा प्रश्‍न पडतो. सत्तेवर आल्यावर व पीठासीन अधिकारी झाल्यावरच संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याची उबळ त्यांना आली आहे, असे वाटते. आम्ही विरोधी पक्षात असताना संसदेचे कामकाज बंद पाडणार, पण दुसरे पक्ष या बाकांवर बसले की त्यांनी मात्र तसे करायचे नाही, हा कोणता न्याय?

वर्ष 2009 ते 2014 या यूपीए-2 च्या काळात लोकपाल, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावरून संसदेचे कामकाज वारंवार ठप्प झाले. संपूर्ण अधिवेशनच गोंधळात वाहून जाण्याचा इतिहास घडला. या काळातील संसदीय कामकाजाची जी माहिती बाहेर आली आहे, त्यावरून या 5 वर्षांत लोकसभेचे कामकाज फक्त 39 टक्‍के झाले. म्हणजे तब्बल 61 टक्‍के वेळ गोंधळामुळे वाया गेला. राज्यसभेत याच काळात 66 टक्‍के काळ गोंधळच झाला. अवघे 34 टक्‍के वेळ कामकाज झाले. प्रश्‍नोत्तराचा तास तर 60 टक्‍के वायाच गेला.

आता या काळात विरोधी बाकांवर कोण बसत होते? कोण गोंधळ करीत होते, हे नायडू यांना माहीत नव्हते का? त्यावेळी त्यांना अशा आचारसंहितेची आठवण झाली नाही का? गोंधळ करण्यापासून त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांना परावृत्त केले का? या प्रश्‍नांची उत्तरे नकारार्थीच मिळतील. आता सत्तेत आल्यावर त्यांना कामकाज सुरळीत व्हावे, असे वाटते आहे. हे किती न्यायोचित आहे? संसदेत चर्चेलाच प्राधान्य हवे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण न्याय सर्वांनाच एकसारखा मिळायला हवा. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे भाजपचे नेतेच विरोधी पक्षात असताना सांगत असत. पण आता सरकारमध्ये आल्यावर हाच भाजप गोंधळाचे खापर विरोधकांवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या नेहमीच्या दुटप्पीपणाला धरूनच हे झाले.

मोदींना “चायवाला’, “मौत का सौदागर’, “पिंडीवरचा विंचू’, असे म्हणणे जेवढे गैर, चुकीचे आहे तेवढेच मोदी सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्यांना थेट देशद्रोही म्हणणे, पाकिस्तानात जाण्यास सांगणे चुकीचे आहे. “सोनिया गांधी यांनी छटपूजा केली असती, तर त्यांना चांगला, हुशार मुलगा झाला असता’, असे तारे अलीकडेच एका भाजप नेत्याने तोडले. त्याचे काय? एकाही ज्येष्ठ भाजप नेत्याने या नेत्याची कानउघाडणी केल्याचे वाचनात नाही. या वागणुकीचे काय?

संसदेत, सार्वजनिक जीवनातील वागणुकीसाठी आचारसंहिता हवीच पण ती एकतर्फी नसावी. सर्वांना समान न्याय हवा. टाळी एका हाताने वाजत नाही, हे विसरता कामा नये. नायडू म्हणाले तसे लोकांचा लोकशाहीवरील विश्‍वास उडता कामा नयेच. पण सीबीआय, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बॅंकेसंबंधी जे चालू आहे, त्यावरून लोकशाहीवरील लोकांचा विश्‍वास दृढ होतोय असे म्हणता येईल का? याचे उत्तरही मिळायला हवे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)