#टिप्पण: आयारामांचीच होत आहे डोकेदुखी 

शेखर कानेटकर 
इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांमुळे भाजपचे संख्याबळ वाढले आहे. ठिकठिकाणी मिळालेल्या विजयात या नेत्यांचा सहभागही आहे. पण हेच डावपेच, ही सूज कायम राहील असे नाही. पक्षात डोकेदुखी ठरलेल्या, पक्षाची प्रतिमा डागाळणाऱ्या नेत्यांवर, या आयारामांवर कारवाई करण्याचे धाडस पक्ष नेतृत्व का करीत नाही हा स्वाभाविक प्रश्‍न निर्माण होतो. हेच इतर पक्षात झाले असते तर भाजपच्या वाचाळवीरांनी कोण थयथयाट केला असता. पण सध्या मात्र आयारामांबाबत सर्वजण मिठाची गुळणी धरून बसले आहेत. 
येनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्याच या एकमेव उद्दिष्टातून मागील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते यांना पावन करून घेण्याचा सपाटा लावला होता. कोणतीही पार्श्‍वभूमी न पाहता “वाल्याचे वाल्मिकी’ केले गेले. त्यातील काहींमुळे भाजपचा फायदा झाला, पक्षाचे संख्याबळही वाढले. पण यातीलच काहीजण पक्षाला आता चांगलीच डोकेदुखी ठरू लागले आहेत.
सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने इतर पक्षातून पावन करून घेतलेल्या 51 जणांना उमेदवारी दिली. त्यातले 21 जण आमदार म्हणून विजयी झाले पण 30 जणांना मतदारांनी त्यांचे पक्षांतर अमान्य करून घरी बसविले. ज्या आयारामांना विधानसभेत पाठविता आले नाही त्यांना विधान परिषद, राज्यसभेची बक्षिसी दिली गेली. त्यासाठी पक्षासाठी वाहून घेतलेल्या निष्ठावंतांना डावलण्यात आले. नारायण राणे यांना राज्यसभा मिळाली, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पक्षांतरानंतर लगेचच विनासायास विधान परिषदेत प्रवेश मिळाला. माधव भांडारींसारखे निष्ठावंत मात्र दरवेळी नाव चर्चेत येऊन हात चोळत बसले.
आता हेच पावन करून घेतलेले आमदार मात्र “भाजप”ची डोकेदुखी ठरले आहेत. प्रशांत परिचारक, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि आता राम कदमही या माळेतील ताजी उदाहरणे म्हणता येतील. या मंडळींची वक्‍तव्ये व कृतीमुळे सरकार व पक्ष या दोहोंची प्रतिमा डागाळत तर आहेच पण नेतृत्वाला या मंडळींची पाठराखण करताना नको एवढी कसरत करावी लागते आहे. शिवाय या कसरतीमुळे व मौन बाळगणे भाग पडल्याने टीकेचे धनीही व्हावे लागत आहे.
प्रशांत परिचारक यांनी लष्करी जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याची देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यांचे सदस्यत्व काही काळ रद्द करायची नामुष्की ओढवली होती. मनसेतून भाजपत आलेल्या प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबै बॅंक घोटाळ्याबद्दल अत्यंत गंभीर आरोप आहेत. तरीही त्यांना “भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारण्या’ची वल्गना करणाऱ्या भाजप सरकारला पाठीशी घालावे लागते आहे. एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असणारे प्रसाद लाड यांचे पनवेलची प्रकल्पग्रस्तांची जमीन बिल्डरांच्या घशात घातली जाण्याचे प्रकरण ताजे आहे. लाड यांना भाजपत येताच विधान परिषदेची आमदारकी दिली गेलीच पण आरोप झाल्यावर त्यांच्या समर्थनासाठी स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांना किल्ला लढवावा लागला. व्यवहाराला स्थगिती द्यावी लागली.
हे कमी की काय म्हणून, आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात अकलेचे तारे तोडले. हे कदम महाशय मनसेतून भाजपत आले आहेत. दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला मारहाण, पोलीस फौजदाराला मारहाण करण्याचा गुन्हा, हे प्रतापही कदम यांच्या नावावर जमा आहेत. हे कदम पक्षाचे प्रवक्‍तेही आहेत. नोटबंदीनंतर वाहिन्यांवर बोलताना याच कदम महाशयांनी रोख रक्‍कम नाही, त्यामुळे विवाह पुढे ढकलण्याचा अजब सल्ला दिला होता. नितीन गडकरी यांचेकडे तेव्हाच विवाह समारंभ होता. तेव्हा गडकरी यांना हाच सल्ला देणार का, असे विचारले गेल्यावर कदमांची बोलती बंद झाली होती.
ज्यांना पक्षाची शंभर टक्के पार्श्‍वभूमी नाही, पक्षशिस्त कशाची खातात हे ज्यांना ठाऊक नाही, त्यांना पक्षाचे प्रवक्‍ते करण्यातील चूक भाजप नेतृत्वाला आता तरी कळेल, अशी आशा करायला हरकत नाही. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यात या राम कदम यांची कामगिरी शून्य व सर्वात शेवटच्या क्रमांकाची आहे, असा अहवाल एका सामाजिक संघटनेने प्रसिद्ध केला आहे. असे असतानाही “पार्टी विथ ए डिफरन्स’ असे सांगणारा भाजप व 56 इंच छाती असणारे पक्ष नेतृत्व कोणत्याही कारवाईस धजत नाही, याचे आश्‍चर्य वाटते. फक्‍त आयात केलेली नेते मंडळीच वादग्रस्त विधाने करत आहेत, असे नाही. वर्षानुवर्षे पक्षात असलेले नेतेही यात आहेत. त्यावरही एखाददुसरा अपवाद सोडला तर कारवाई झालेले ऐकिवात नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)