#टिपण: शिवसेनेच्या स्वबळाची क्षमता किती?

शेखर कानेटकर

विधानसभा निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढविल्या तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळेल की नाही, याबद्दल पूर्वेतिहास काहीही सांगत नाही. त्यामुळे शिवसेना पुन्हा सत्तेसाठी भाजपचीच साथ घेईल किंवा देईल, अशी शक्‍यता व्यक्त केली जाते.

गेल्या काही दिवसांतील हालचाली, दोन्ही बाजूंच्या नेत्यांची वक्‍तव्ये, भाजपने युतीसाठी दाखविलेली उत्सुकता, शिवसेनेच्या विद्यमान खासदारांची चलबिचल आणि एकीकडे भाजप व त्याच्या नेतृत्वाला झोडपून काढत असताना ऐन मोक्‍याच्या वेळी, निर्णायक क्षणी शिवसेनेने भाजपची केलेली पाठराखण पाहता किमान लोकसभा निवडणुकीत तरी शिवसेनेचा स्वबळाचा नारा टिकून राहील की नाही, याबद्दल शंका वाटावी अशीच परिस्थिती आहे.

-Ads-

महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्‍यकता असते. शिवसेनेने 1990 च्या विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत कमाल 73 जागाच जिंकल्या आहेत. अर्थात 1990 ते 2009 पर्यंत सेनेची भाजपबरोबर युती होती. पण 2014 मध्ये स्वबळावर लढवूनही सेनेला 63 जागाच जिंकता आल्या होत्या.

आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढून जागा दुप्पट कशा करणार हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे. राज्य व केंद्र सरकारच्या नेतृत्व, धोरणांवर तोंडसुख घ्यायचे आणि सत्तेला चिकटूनही राहायचे या दुटप्पी धोरणामुळे सेनेबद्दल नाही म्हटले तरी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार किती प्रमाणात विश्‍वास ठेवून एकहाती सत्ता सोपवतील, याबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे.

वर्ष 1989 मध्ये शिवसेना-भाजप युती झाली. 1990 ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जागावाटपात सेनेच्या वाट्याला अधिक मतदारसंघ आले होते. तेव्हा सेना “मोठ्या भावा’च्या भूमिकेत होती. परंतु सेनेचा “स्ट्राईक रेट’ (उभ्या केलेल्या उमेदवारांच्या तुलनेत विजयी उमेदवारांचे प्रमाण) फार प्रभावी राहिलेला दिसत नाही. 1990 मध्ये 183 जागी उमेदवार उभे करूनही सेनेचे 52 च उमेदवार निवडून येऊ शकले होते. 2009 मध्ये पक्षाच्या 169 उमेदवारांपैकी 44 उमेदवारच विजयी होऊ शकले होते.

वर्ष 2014 च्या गेल्या निवडणुकीत सेनेने स्वबळावर प्रथमच निवडणुका लढविल्या. 288 पैकी 286 जागांवर उमेदवार उभे केले खरे पण 63 जागीच पक्षाला विजय मिळू शकला होता. (मते 19.3 टक्के). वर्ष 1995 मध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली तेव्हा पक्षाचे आजवरचे सर्वाधिक 73 उमेदवार विजयी झाले होते. तर 96 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. 1999 मध्ये आमदारांची संख्या सत्ता असूनही चारने कमीच झाली होती.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्‍चात सेनेची घसरण होईल असा काहींचा अंदाज होता; परंतु उद्धव यांनी स्वबळावर लढून राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा (63) जिंकल्या होत्या, हेही लक्षात घ्यायला हवे. वर्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आजवरचे सर्वाधिक अठरा खासदार निवडून आले. ही मोदी लाट व भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीची किमया होती, हे विसरता कामा नये. शिवसेनेने आतापर्यंत 4 (1991), 15 (1996), 6 (1998), 05 (1999), 12 (2004) व 11 (2009) लोकसभा जागा राज्यात जिंकल्या, त्या भाजपबरोबरच्या साथीमुळेच. 2014 ची 18 पर्यंत वाढलेली संख्या ही मोदी लाटेचीच किमया होती. याची जाणीव विद्यमान खासदारांना असल्याने युती कायम ठेवण्याचाच त्यांचा आग्रह असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

भारतीय जनता पक्ष एवढे दिवस “शत प्रतिशत’ची भाषा करीत होता. पण बदलत्या वातावरणाने भाजपनेही आता युतीसाठी उत्सुक असल्याची भाषा सुरू केली आहे. दिल्लीश्‍वर “मातोश्री’वर भेटायला आले किंवा दिल्लीहून फोन आले की सेनेचे नेतृत्व मवाळ होऊन भाजपला मदत करते असे चित्र वारंवार अनुभवायला आले आहे. त्यामुळे तूर्त लोकसभा निवडणुकीत 29 वर्षांचे हे मित्र पुन्हा हातात हात घालणार याचीच शक्‍यता अधिक वाटते. या निवणुकीचा रागरंग पाहूनच बहुधा विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढायचे की युती करून लढायचे, याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा व केंद्र-राज्य सरकारची धोरणे यांच्यावर कडाडून हल्ला करूनही सेनेने संधी असतानाही मोदी सरकारवरील अविश्‍वास ठराव, राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पेट्रोल-डिझेल महागाईविरोधातील ‘भारत बंद’ यावेळी भाजपला सोयीची अशीच भूमिका घेतली होती. स्वबळावर लढायची घोषणा करूनही सेना केंद्र व राज्यातील मंत्रिपदे सोडण्याचे वा सरकारचा पाठिंबा काढून देण्याचे नाव काढत नाही, हे पुरेसे बोलके आहे. यावरून भाजपबरोबर युतीचे संकेत कायम राहतात.

या पार्श्‍वभूमीवर व 2014 चा आणि आधीच्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन सेना अंतिमतः स्वबळावर लढेल की नाही आणि लढली तरी त्यांना खरोखरच एकहाती सत्ता मिळेल की नाही याबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)