#टिपण: शिवसेनेची सूचक दुहेरी भूमिका 

शेखर कानेटकर 
भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही. परंतु, ऐन मोक्‍याच्या वेळी या वाघाची शेळी होते. नरेंद्र मोदी सरकारविरुद्धचा अविश्‍वास ठराव किंवा राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवडणूक यावेळी भाजपला झटका देण्याची संधी शिवसेनेला होती. पण त्यावेळी सेनेने नेमकी शस्त्रे म्यान केली. 
एकीकडे सत्तेला घट्ट चिकटून राहायचे, तर दुसरीकडे ज्या पक्षाच्या आधाराने सत्तेवर आहोत, ज्या सरकारमध्ये आहोत, त्या सरकारच्या धोरणांवर, नेत्यांवर यथेच्छ आगपाखड करायची हे शिवसेनेचे धोरण आता जुने झाले आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करायची, पंतप्रधान, सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर रोज ऊठसूठ शरसंधान करायचे आणि ऐन मोक्‍याच्या वेळी फोन आले की, सरकार पक्षाला अनुकूल भूमिका घ्यायची असा शिवसेनेचा “डबल गेम’ सध्या चालू आहे. यातून शिवसेनेला काय साध्य करायचे आहे, हे समजून घ्यायला हवे.
गगनाला भिडणारी महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ या सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर विरोधी पक्षांनी “भारत बंद’ची हाक दिली होती. पण “आम्ही कायम सर्वसामान्य जनतेबरोबर असतो’, असे सांगणारी शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाली नाही. बहुधा महाराष्ट्र नवनिर्माण सेना “बंद’मध्ये सामील झाल्याने शिवसेना दूर राहिली असावी.
“यापुढे स्वबळावरच निवडणुका लढविणार,’ असे शिवसेनेतर्फे आधीच जाहीर करण्यात आले आहे. सन 2014 ची विधानसभा निवडणूकही शिवसेनेने भाजपबरोबर युती न करताच लढविली होती. असे असूनही सेना केंद्रात व राज्यातील मंत्रिपदे सोडायचे नाव काढत नाही. लोकसभा पोटनिवडणूक, महापालिका निवडणुकाही त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीतच लढविल्या.
स्वतंत्र विदर्भ, नाणार-जैतापूर प्रकल्प, बुलेट ट्रेन, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आदी विषयांवर भाजप व शिवसेनेत टोकाची मते आहेत. तरीही याबाबत कडवट टीका करूनही शिवसेना सत्तेला चिकटून आहे. पूर्वी शिवसेनेचे मंत्री “आम्ही राजीनामे खिशात ठेवूनच हिंडतो’ अशी भाषा जाहीरपणे करीत असत. पण आजअखेर हे राजीनामे खिशातून बाहेर आलेले नाहीत. आता तर राजीनाम्याची भाषाही बंद झाली आहे. संसदेमध्ये अविश्‍वास ठरावाचे वेळी गैरहजर राहून भाजपला अनुकूल अशीच भूमिका घेतली गेली तर राज्यसभेच्या उपाध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारालाच मतदान केले गेले. आधी मारे “या पदाची उमेदवारीही नको, मुका दिला तरी नको’, असे सांगितले गेले होते.
मध्यंतरी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी “मातोश्री’ला भेट दिली. त्यानंतर शिवसेनेच्या भाजप व सरकारवरील टीकेची धार कमी झाल्यासारखी वाटते. एकदम टीका थांबविणे अडचणीचे ठरेल म्हणून सावध पवित्र्यात शिवसेना गेल्यासारखे वाटते. भाजप धुरिणांची भेट झाली किंवा दिल्लीहून फोन येऊन गेला की ताबूत थंडावतात, हे लोकांच्या व भाजप नेत्यांच्या केव्हाच लक्षात आले असणार! भाजपवर टीका करायची, सत्तेतही राहायचे आणि विरोधकांची भूूमिकाही बजवायची या दुटप्पी धोरणाचा शिवसेनेचे कार्यकर्ते व मतदारांनी काय अर्थ घ्यायचा? ही दुहेरी भूमिका सर्वांना संभ्रमात टाकणारीच आहे.
शिवसेनेचा हा “डबलगेम’ चालू असतानाही “आम्ही स्वबळावर महाराष्ट्रात भगवा फडकविणारच,’ असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. भाजपबरोबर युती असताना आणि बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेचे कमाल 73 आमदार निवडून आले होते. सन 2014 मध्ये स्वबळावर लढल्यावर शिवसेनेचे 63 आमदारच विजयी झाले होते. हा आकडा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या गरजेपेक्षा खूप कमी आहे. आता चार वर्षे तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतली गेली असताना, सेनेला स्वबळावर सत्ता खरेच मिळेल का, याबद्दल शंका घेण्यास वाव आहे. मोदी सरकारची धोरणे न पटल्याचे सांगत तेलगू देशमचे मंत्री तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडले. तशी ठोस भूमिका शिवसेनेने घेऊन स्वबळासाठी पार्श्‍वभूमी तयार करायला हवी होती. पण एकीकडे मंत्रिपदाचा लोभ आणि दुसरीकडे टीका या धोरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्यास मदतच होत आहे.
स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या डरकाळ्या फोडल्या जात असल्या तरी या दुहेरी धोरणातून निवडणुकीनंतर भाजपला केंद्र व राज्यात पुन्हा मदत करण्याचा एक पर्याय शिवसेना खुला ठेवते आहे, असे वाटते. ती शक्‍यता नाकारता येत नाही. सन 2014 मध्ये स्वतंत्रपणे लढूनही शिवसेनेने भाजपला थोडा उशिरा का होईना सहकार्याचा हात पुढे केला होताच की! त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. एवढी टीका होऊन, स्वबळाची घोषणा होऊनही भाजपने केंद्र व राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांना हात लावलेला नाही, हेही सूचकच म्हणावे लागेल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)