#टिपण: राजकारणात नशिबाची साथ हवीच 

शेखर कानेटकर 

राजकारणात पक्षनिष्ठा, त्याग, कर्तृत्व महत्त्वाचे असतेच पण त्या जोडीला सत्ता, पद यांचे ग्रह, नशीब उच्च कोटीचे असेल तर एकापाठोपाठ एक पदेही पदरात पडत जातात. हे ग्रह नाराज असतील तर मात्र पक्षनिष्ठा, कर्तृत्व या बाबी असूनही राजकारण्यांच्या आवडत्या भाषेत “आयुष्यभर, सतरंज्या घालण्या-उचलण्याचे कामच त्यांच्या वाट्याला येते. 

महाराष्ट्रापुरताच विचार केला तर काही नेत्यांना एका पाठोपाठ एक पदे मिळत गेलेली दिसतात. अर्थात, या नेतेमंडळींना केवळ नशिबाने त्यांना ही पदे मिळाली असे म्हणता यावयाचे नाही. त्यांचे कर्तृत्वही मोठे आहे, त्याला उच्च कोटीच्या ग्रहांची साथ मिळाली, असे म्हणता येईल. शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील अशा कितीतरी नेत्यांची नावे या संदर्भात घेता येऊ शकतील. यातील एक विशेष असा की शरद पवार यांनी 51 वर्षांच्या कारकिर्दीत राजकीय निवडणुकीच्या राजकारणात एकही पराभव पाहिला नाही पण बाकीच्या मंडळींना एकदा का होईना पराभवाची चव चाखायला मिळाली आहे.

-Ads-

पवार 1967 साली प्रथम राज्य विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 1990 पर्यंत सलग सहा निवडणुकांत ते आमदार म्हणून निवडून आले. वर्ष 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यावेळी संरक्षणमंत्री असलेल्या पवारांना मुख्यमंत्री म्हणून परत महाराष्ट्रात पाठविले होते. त्यावेळी पवारांनी विधान परिषदेत जाणे पसंत केले होते.

विधानसभेत असताना पवारांनी मुख्यमंत्री (चार वेळा), वेगवेगळ्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी बहुतेक सर्व पदे भूषविली. दिल्लीच्या राजकारणात गेल्यावर 1984 पासून 2009 पर्यंत पवार 7 वेळा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी राज्यसभेत जाणे पसंत केले. केंद्रातही ते सलग दहा वर्षे कृषिमंत्री होते. कॉंग्रेस पक्षाची सत्ता नसताना लोकसेवेतील विरोधी पक्षनेतेपद एवढेच काय एन.डी.ए.च्या राजवटीत कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असलेले आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे उपाध्यक्षपदही पवार यांच्या वाट्याला आले.

आमदार, खासदार, संसदेतील व विधान मंडळातील दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व, मुख्यमंत्रिपद, कॅबिनेट व राज्यमंत्री पद, विरोधी पक्षनेते पद, केंद्रीयमंत्री ही सर्व पदे पवार यांना मिळाली. शिवाय महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद झाली.

देशाचे पंतप्रधान होण्याची पवार यांची महत्त्वाकांक्षा मात्र अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. 2004 मध्ये पवार कॉंग्रेसमध्ये असते तर त्यांना कदाचित संधी मिळाली असती असे काहींचे म्हणणे होते. पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत एक आकडी जागाच मिळत असल्याने त्यांची या पदाची बस चुकत आलेली आहे. पवार लोकसभा, विधानसभेची एकही निवडणूक हरले नसले तरी त्यांचा आयुष्यातील एकच पराभव झाला, तो भारतीय क्रिकेट मंडळाच्या (वी.सी.सी.आय.) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तोही फक्त एकमताने. 51 वर्षे राजकारणात असलेल्या पवारांनी क्रिकेटमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदेही हस्तगत केली, हे विशेष.

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी व शरद पवार यांचे मैत्र जगजाहीर आहे. “जत्रेत चुकलेले जुळे भाऊ’ असे त्यांचे वर्णन काही ज्येष्ठ पत्रकारांनी केले होते. या पवार मित्रालाही सत्तेची भरपूर पदे उपभोगायला मिळाली. मनोहर जोशी यांना नगरसेवक, मुंबईचे महापौर, दोन्ही सभागृहांचे आमदार-खासदार, केंद्रीयमंत्री, लोकसभेचे सभापतिपद आदी पदे मिळाली. पवार 51 वर्षात एकही थेट निवडणूक हरले नाहीत, पण मनोहर जोशी यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव पत्करावा लागला होता. एवढाच काय तो फरक.

सुशीलकुमार शिंदे हेही असेच नशीबवान न्यायालयातील पट्टेवाला, फौजदार या पदांवरून ते थेट राज्याचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इ. प्रमुख पदांपर्यंत पोहोचले. उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची माळही त्यांच्या गळ्यात पडली. शिंदे यांचे नशीब एवढे बळकट की लोकसभा सभागृहाच्या नेतेपदाचा मानही त्यांना मिळून गेला. एरवी पंतप्रधान हा लोकसभेचा सभागृह नेता असतो. पण डॉ. मनमोहन सिंग राज्यसभा सदस्य असल्याने आधी प्रणव मुखर्जी सभागृह नेते झाले. नंतर ते राष्ट्रपती झाल्याने सुशीलकुमारांची वर्णी लागली. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा फटका बसलाच.

विलासराव देशमुख यांनीही जिल्हा पातळीपासून काम सुरू केले. त्यांनाही राज्यात मंत्री, मुख्यमंत्री, पुढे खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून मान मिळाला. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहिलेले शिवराज पाटील केंद्रात गृहमंत्रिपदापर्यंत पोहोचले. मग राज्यपालही झाले. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांना गृहमंत्रिपदी नेमले गेले. (2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही अरुण जेटली अर्थमंत्रिपदाचे मानकरी ठरले, तसे अंतुले यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना लागली होती. देवेगौडा, गुजराल यांनाही पंतप्रधानपदाची लॉटरी लागली होतीच की!

राजकारणात कोणाचे नशीब केव्हा बलवत्तर ठरेल, कोणाला पदामागून पदे मिळण्याचे भाग्य लाभेल हे सांगता येत नाही. ही पदे मिळण्यात कर्तृत्वाचा वाटा असतोच पण नशिबाची साथही लागते. पक्षनिष्ठा, पक्षासाठी केलेला त्याग यापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेला (इलेक्‍टिव्ह मेरिट) फाजील महत्त्व आल्याने जुने कार्यकर्ते नेते मागे पडतात नि नव्या आयारामांची चलती राहाते. राजकारणात बरोबरीने प्रवेश केलेल्या दोन नेत्यांपैकी एक भराभर एकामागून एक पदे पादाक्रांत करीत राहतो आणि दुसरा नुसत्या सतरंज्या उचलतो. टाळ्या वाजविण्याचे आणि जयजयकार करण्याचे कामच त्याच्या हाती राहते.
यालाच राजकारण ऐसे नाव!

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)