#टिपण: मतांच्या टक्‍केवारीपेक्षा जिंकलेल्या जागाच निर्णायक 

शेखर कानेटकर 
वर्ष 2014 सारखेच यश एकट्या भाजपला महाराष्ट्रातील जनता देईल की नाही याबद्दल शंका वाटावी अशीच परिस्थिती सध्या आहे. हे यश मिळवून देण्याचे शिवधनुष्य स्वच्छ प्रतिमा राखणाऱ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पेलावे लागणार आहे. पुढची पाच वर्षेही मुख्यमंत्री राहायचे असेल तर त्यांना एक हाती किल्ला लढवावाच लागेल. 
वर्ष 1975 च्या आणीबाणीनंतर निर्माण झालेला जनता पक्ष दुहेरी सदस्यत्वाच्या वादाचे निमित्त होऊन 28 महिन्यांतच फुटला आणि देशातील पहिले बिगर कॉंग्रेसी सरकारही कोसळले. त्यातून 1980 मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाचा नवा अवतार म्हणून भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला. स्वबळावर सत्ता मिळवायला भाजपला तब्बल 34 वर्षे लागली. पक्षाने लोकसभेत दोन जागांवरून 282 जागांपर्यंत मजल जरूर मारली, पण पक्षाच्या मतांची टक्‍केवारी अजून 31 टक्‍केच आहे.
भाजपच्या जागांचा आलेख वाढता आहे, हे मान्य करावेच लागेल; पण पूर्ण बहुमत (282 जागा) मिळूनही अजून पक्षाच्या विरोधात 69 टक्‍के एवढ्या लोकांनी मतदान केलेले नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. संसदीय राजकारणात पडलेल्या मतांपेक्षा मिळालेल्या एकूण जागांना महत्त्व असते. त्यामुळे भाजपचे यश निश्‍चितच कमी लेखता येणार नाही. वादविवादासाठी ही चर्चा ठीक असली प्रत्यक्ष व्यवहारात शेवटी जिंकलेल्या जागाच निर्णायक ठरत असतात.
पक्षाचा पराभव झाला. पण मतांची टक्‍केवारी वाढली की “जागा कमी झाल्या असल्या’ तरी मते वाढली आहेत आणि मतांची टक्‍केवारी घटली तरी जागा वाढल्या आहेत, असे सोयीचे विश्‍लेषण राजकीय पक्षांतर्फे नेहमीच केले जाते. पण निवडून आलेल्या जागाच शेवटी सत्तेचे गणित जमवितात.
भाजपाची स्थापना वर्ष 1980 मध्ये झाली तरी पक्षाने पहिली निवडणूक लढविली ती वर्ष 1984 मध्ये. नेमकी तेव्हाच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेली सहानुभूतीची लाट असल्याने पक्षाला केवळ 7.74 टक्‍के मते मिळून अवघ्या दोन जागा पदरात मिळाल्या. गेल्या अनेक वर्षात या दोन खासदारांचा संदर्भ दिला जात आहे. हे दोन खासदार कोण होते? त्यामध्ये एक खासदार गुजरातच्या मेहसाणा मतदारसंघांमध्ये ए. के. पटेल हे होते आणि दुसरे खासदार आंध्र प्रदेशातील हणमकोंडा मतदारसंघातून निवडून आलेले सी. जी. रेड्डी हे होते. त्या निवडणुकीत वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे दिग्गजही पराभूत झाले होते. पण तरीही त्यावेळी वाजपेयी-अडवाणींसारखे खमके नेतृत्व असल्याने पक्ष नाउमेद झाला नाही. पुढील 1989 च्या निवडणुकीत 11.30 टक्‍के मते मिळवित पक्ष 85 जागांवर जाऊन पोहोचला.
वर्ष 1991 च्या निवडणुकीत पक्षाची मते 20.11 टक्‍क्‍यांपर्यंत तर जागा 120 पर्यंत वाढल्या. वर्ष 1996 मध्ये पक्षाची मते फार वाढली नाहीत (20.90) पण जागा मात्र 161 वर गेल्या. वर्ष 1998 व 1999 या लागोपाठच्या निवडणुकीत अनुक्रमे 25.59 व 23.75 टक्‍के मते घेत भाजपाने 182 जागांवर उडी घेतली. वाजपेयी यांचे नेतृत्व “फील गुड-इंडिया शायनिंग’चा प्रचार दणक्‍यात करूनही वर्ष 2004 मध्ये भाजप 138 जागांपर्यंत खाली घसरला. मतेही 22.16 टक्‍क्‍यांवर आली. वर्ष 2009 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून पक्षाची खासदार संख्या 116 इतकी (18.10 टक्‍के) पुन्हा खाली आली.
नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची राळ उठविल्याने वर्ष 2014 मध्ये भाजपला आजवरचे सर्वाधिक यश मिळाले. एकूण 282 जागा व 31.34 टक्‍के मते मिळाली. त्यानंतर एकामागून एक राज्येही पक्षाने जिंकली. मात्र, वर्ष 2014 नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 24 पैकी फक्‍त चारच जागा जिंकता आल्या आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे.
वर्ष 2014 पेक्षा आताचे राजकीय वातावरण निश्‍चितच बदलले आहे. 2014 मध्ये यूपीए सरकारविरुद्धचा रोष व विरोधी मतांची विभागणी भाजपच्या पथ्यावर पडली होती. आता नोटबंदी, इंधन दरवाढ, नुसत्याच घोषणांचा सपाटा, राफेल प्रकरणामुळे वातावरणही तापले आहे. मतविभागणी टाळण्याचे प्रयत्न तरी सुरू आहेत. त्यामुळे भाजपला आगामी निवडणूक सहज साध्य नसेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. आता 282 नव्हे तर 350 जागा जिंकण्याचे अमित शहांचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी व किमान 2014 च्या मतांची टक्केवारी कायम ठेवण्यासाठी मोदी-शहा यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागेल एवढे निश्‍चित. सध्याची 31 टक्‍के ही भाजपची मते विरोधकांची एकजूट झाली तर कमी पडू शकतात. त्यामुळे जास्त जागांबरोबरच टक्‍केवारी वाढविणे भाजपच्या दृष्टीने आवश्‍यक वाटते.
महाराष्ट्रातही 2014 मध्ये भाजप 122 जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला असला तरी त्याला पडलेल्या मतांची 27.4 ही टक्‍केवारी निर्णायक म्हणता येणार नाही. पण भाजपने युती न करता स्वबळावर हे यश मिळविले, हे विशेष. संसदीय राजकारणात मतांच्या टक्‍केवारीपेक्षा निवडून आलेल्या जागा निर्णायक ठरत असतात. भाजपला स्वबळावर हे यश मिळाले ते निव्वळ नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे.
वर्ष 1990 पासून महाराष्ट्रात भाजपने 2009 पर्यंत शिवसेनेबरोबर युती करून विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. पण तोपर्यंत शिवसेनाच जागांच्या बाबतीत वरचढ राहिली. सेनेने जागाही जास्त लढविल्या आणि विजयही अधिक मिळविले. भाजपला 1990 मध्ये 42, 1995 मध्ये 65, 1999 मध्येही 65, 2004 मध्ये 54 तर 2009 मध्ये विधानसभेच्या 46 जागा शिवसेनेच्या साथीत मिळाल्या. पण 2014 मध्ये स्वबळावर भाजपने 120 जागांपर्यंत मजल मारली. शिवाय महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही यशातील सातत्य स्वबळावर कायम ठेवले आहे.
27.4 टक्‍के एवढी कमी मते पडूनही मतविभागणीमुळे भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळविता आल्या होत्या. त्याला मोदी लाटेची साथ मिळाली. आताही शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे शिवाय इंधनाच्या दरातील रोजची वाढ, जीएसटी, नोटबंदी, मराठा व इतर काही समाजाची आरक्षण मागणीची आंदोलने, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व इतर गंभीर समस्या यामुळे आता 2014 सालातील वातावरण राहिलेले नाही, हेच खरे!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)