#टिपण : मतदारसंघ, उमेदवारीच्या आगाऊ चर्चा निरर्थकच 

शेखर कानेटकर 

सतराव्या लोकसभेच्या निवडणुका वेळेवर झाल्या तर त्या व्हायला अजून किमान नऊ महिने आहेत. निवडणुका नक्की कधी होतील, हे फक्त मोदी-शहा यांनाच ठाऊक आहे. परंतु त्याबाबतीतील तर्क-वितर्क करण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. एवढेच काय अगदी मतदारसंघाचे व व्यक्तिगत उमेदवारीचे दावे प्रतिदावेही सुरू झालेले पहावयास मिळतात. हे आताच निरर्थक नव्हेत काय? 

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) यांचे मित्र पक्ष एकटे लढणार की स्वतंत्र लढणार, निवडणुकीआधी आघाडी होणार की नंतर पाठिंब्याची प्रक्रिया ठरणार, याचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात चालूच आहे. स्वबळावर लढण्याची त्यांची भूमिका लोकसभेसाठी आहे की, फक्त विधानसभेसाठी आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजप विरोधक आघाडी करून लढणार की, नंतर एकत्र येणार हेही ठरत नाही. विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निकालानंतरच ठरणार, एवढे मात्र स्पष्ट झाले. एनडीएचा पंतप्रधानपदाचा चेहरा मोदीच असतील हे नक्की आहे. असे अस्पष्ट चित्र असले तरी मतदारसंघ व उमेदवारी यासंबंधीचे दावे-प्रतिदावे, बैठका, चर्चा यांनी भलताच वेग घेतलेला दिसतोय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगदी पुण्याचेच उदाहरण घ्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी झाल्यापासून पुण्याची जागा कायम कॉंग्रेसकडेच राहिली आहे. कारण आजपर्यंत झालेल्या 16 लोकसबा निवडणुकांपैकी 10 वेळा शहरात कॉंग्रेसच जिंकत आली आहे. परंतु, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक पुण्याच्या जागेवर हक्क सांगून या
चर्चेला तोंड फोडले.

कॉंग्रेसपेक्षा शहरात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद जास्त आहे, असे अजित पवारांचे म्हणणे आहे. सन 2014 च्या निवडणुकीत पुण्यातील आठ मतदारसंघापैकी एकाही ठिकाणी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही, असे सांगितले. जाते. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तरी एखादा आमदार कुठे निवडून आला? सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 38 नगरसेवक निवडून आले व कॉंग्रेसचे फक्त नऊ जण विजयी झाले. हे खरे असले राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या 51 वरून 38 इतकी खाली आली. इतकेच नव्हे तर, पक्षाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताही गमावली, ही वस्तुस्थिती कशी विसरता येईल? केवळ नगरसेवकांच्या संख्येवर दावा करणे किती सयुक्तिक ठरते?

जागांवर दावा सांगितल्यावर मुद्दा येतो तो प्रबळ उमेदवारांचा. आजमितीला राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्याकडे पक्षाला विजयाजवळ तरी नेऊ शकेल, असा उमेदवार दृष्टिपथात नाही, ही वस्तुस्थिती आहे. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ व सुरेश कलमाडी यांनी कॉंग्रेस पक्षाला प्रत्येकी तीन-तीन विजय पुण्यातून मिळवून दिले. अशा ताकदीचे उमेदवार आता पक्षाकडे नाहीत आणि ती संघटनात्मक ताकदही उरलेली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे प्रबळ उमेदवार आहे, असे दडपून सांगितले आहे, असे वाटते. कारण त्यांच्या अशा “प्रबळ’ उमेदवाराचे नाव पटकन डोळ्यासमोर येत नाही. मध्यंतरी खुद्द शरद पवार यांनी स्वतःसाठी पुण्यात चाचपणी करण्यास सांगितल्याची पुडी सोडून देण्यात आली होती. परंतु, त्यात फारसे तथ्य वाटत नाही. कारण पवार यांनी आता थेट निवडणूक लढवायची नाही, असे जाहीर केले आहे. त्यांनी आता राज्यसभेत राहणेच पसंत केले आहे. दुसरे म्हणजे त्यांचा पहिला करिष्माही आता राहिलेला नाही. एक सभा घेऊन निवडून येण्याचा. सन 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने विश्‍वजित कदम हा तरुण नेता उमेदवार दिला होता. आता विश्‍वजित वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या रिकाम्या झालेल्या मतदारसंघातून बिनविरोध आमदार झाले आहेत. त्यामुळे पुण्यातून पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी ते किती उत्सुक असतील, याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे कोणालाही पुण्याची जागा मिळाली तर नवा, तुल्यबळ उमदवार दोन्ही कॉंग्रेसला शोधावा लागणार आहे.

पूर्वी शिवसेनेत असलेले, नंतर नारायण राणेंबरोबर कॉंग्रेसमध्ये गेलेले, तेथून पुन्हा शिवसेनेत गेलेले विनायक निम्हण पुन्हा कॉंग्रेसमध्ये येण्याच्या बातम्या आहेत. भाजपचे सहयोगी राज्यसभा सदस्या संजय काकडेही कॉंग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या झळकल्याने कॉंग्रेसजनात खळबळ उडाली आहे. नुसती खळबळच नव्हे, तर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही कॉंग्रेसमध्ये प्रवेश आणि उमेदवारी देऊ नका, असा ठरावच केला आहे. आयुष्यभर आम्ही सतरंज्याच उचलायच्या का, असा संतप्त सवाल या मंडळींनी केलाय. अर्थात, बाहेरच्यांना ऐनवेळी पक्षात घेऊन, उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे तंत्र आता नवे राहिलेले नाही. आजचा सत्ताधारी पक्ष त्यात वाक्‌बगार झाला आहे. “पार्टी विथ ए डिफरन्स’चा नवा अवतार.

कॉंग्रेसप्रमाणे भाजपमध्येही उमेदवाराच्या चर्चा, अटकळी दावे चालू आहेत. सन 2014 मध्ये अनिल शिरोळे यांनी 3 लाख 15 हजारांचे विक्रमी मताधिक्‍य पक्षाला पुण्यातून विजय मिळवून दिला. त्यात मोदी लाटेचा वाटा मोठा होता, हा भाग वेगळा. पण शिरोळे हे पुन्हा सन 2019 साठी भाजपकडून दावेदार असणार, हे उघड आहे. पण पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आपण इच्छुक असल्याचे आधीच जाहीर करून टाकले आहे. त्यांचे “सोशल इंजिनियरींग’ही चालू आहे म्हणतात. प्रदीर्घकाळ आमदार राहिलेल्या गिरीश बापटांचीही आता दिल्लीला जायची इच्छा असल्याची चर्चा आहे. पुण्यात समाजवादी, डाव्या पक्षांना सन 1977 पासून निर्णायक स्थान राहिलेले नाही. त्यामुळे त्या आघाडीवर सामसूम दिसते.
लोकसभा निवडणुका कधी होणार, उमेदवार कोण असणार हे भाजपच्या बाबतीत मोदी-शहाच ठरविणार. तर पुण्याची जागा कॉंग्रेसकडेच राहणार की राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाणार हेही राहुल गांधी-शरद पवारच ठरविणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण तरीही मतदारसंघ व उमेदवारांबद्दल चर्चा सुरू आहेत. या चर्चेतून, पतंगबाजीतून माध्यमांना खाद्य मिळते एवढेच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)