टिपण: भाजप पुण्यातील परंपरा राखणार का?

शेखर कानेटकर

पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत सोळापैकी तीन निवडणुकांत यश मिळविले आहे. 2014 च्या निवडणुकीत पक्षाने आजवरच्या सर्वोच्च मताधिक्‍याचा विक्रमही केला. पण पुढील वर्षी होणाऱ्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा व मताधिक्‍य कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

सध्या पुण्यातील सर्व आठ आमदार व महापालिकेतील 58 नगरसवेक यांचे भरभक्कम पाठबळ भाजपाच्या मागे उभे असले तरी पुणे लोकसभा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भाजपला अथक परिश्रम घ्यावे लागतील.
वर्ष 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती नव्वदच्या दशकात झाली. त्यावेळपासून झालेल्या आठ लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघ भाजपकडेच राहात आला आहे. त्यातील केवळ तीनदाच भाजपला विजय खेचता आलाय. पक्षाचा एकदा विजयी झालेला खासदार पुन्हा निवडून येऊ न शकल्याची पहिल्या दोन खासदारांची उदाहरणे आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या 2019 मधील भविष्याबद्दल उत्सुकता असणे स्वाभाविक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपाचे त्यावेळचे धडाडीचे नेते अण्णा जोशी यांनी भाजपला वर्ष 1991 मध्ये पुण्यातील पहिला विजय मिळवून दिला. आधीच्या वर्ष 1989 च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. वर्ष 1991 मध्ये विजयी होऊनही वर्ष 1996 मध्ये त्यांचे तिकिट अचानकपणे कापले गेले. वर्ष 1999 मध्ये भाजपचे प्रदीप रावत यांना पुणेकरांनी निवडून दिले. पण पाच वर्षांनी त्यांना पराभूतही केले. त्यामुळेच आता वर्ष 2019 मध्ये काय होणार याबद्दल चर्चा सुरु होणे स्वाभाविक आहे. पण त्याबद्दल आताच काही भाकित करणे योग्य होणार नाही.

भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत पुण्यातून मिळालेल्या तीन विजयांपैकी पहिले दोन विजय मिळविण्यास कॉंग्रेसचा अप्रत्यक्ष हातभार लागला होता, हे जगजाहीर आहे. वर्ष 1991 मध्ये आण्णा जोशी यांच्या यशामध्ये कॉंग्रेसमधील एका “पॉवरफुल’ नेत्याचा अप्रत्यक्ष हातभार लागला होता हे उघड गुपित आहे. अण्णा जोशी यांच्या विजयापेक्षा कॉंग्रेस उमेदवार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांना “कात्रजचा घाट’ दाखविण्यासाठी हा “गेम’ झाला. त्यातून फायदा मात्र भाजपला झाला.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन स्वतंत्र उमेदवार उभे असल्याने वर्ष 1999 मध्ये भाजपला फायदा झाला आणि प्रदीप रावत विजयी झाले. कॉंग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल तुपे यांची एकत्रित मते रावत यांच्यापेक्षा एका लाखांहून अधिक होती. वर्ष 2004 मध्ये दोन्ही कॉंग्रेसचे संयुक्‍त उमेदवार सुरेश कलमाडी यांच्यापुढे मात्र रावत यांचा टिकाव लागला नाही.

वर्ष 2014 मध्ये भाजपला पुण्यात तिसरा विजय मिळाला. तो मात्र निर्भेळ म्हणावा लागेल. भाजपचे अनिल शिरोळे 3 लाख 15 हजारांचे (पुण्यातील आजवरचे) विक्रमी मताधिक्‍य घेऊन विजयी झाले. अर्थात त्याला एकमेव कारण म्हणजे “मोदी लाट’ होय. भाजपच्या पुण्यातील पहिल्या दोन विद्यमान खासदारांना “दुसरी टर्म’ मिळाली नाही. आता तिसरा विजय देणाऱ्या शिरोळे यांच्या ताटात काय वाढून ठेवले आहे, ते पहायचे.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात वर्ष 1989 पासून एकूण “निवडणुकीत भाजपने सहा वेगवेगळे उमेदवार दिले. पण एकालाही दोनपेक्षा जास्त संधी दिल्या नाहीत. वर्ष 1984 मध्ये जगन्नाथराव जोशी उमेदवार होते. वर्ष 1981-91 मध्ये अण्णा जोशी, तर वर्ष 1996 मध्ये गिरीश बापट, वर्ष 1998 मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या सुरेश कलमाडींना भाजपने अनपेक्षितपणे पाठिंबा दिला होता; तर वर्ष 1999 व वर्ष 2004 मध्ये प्रदीप रावत उमेदवार राहिले. वर्ष 2014 मध्ये अनिल शिरोळे यांना पक्षाने संधी दिली. शिरोळे हेही एकदा पराभूत झाले आहेत आणि एकदा जिंकले आहेत.

भाजप एखाद्या उमेदवाराला केवळ दोनदा संधी देण्याची परंपरा चालू ठेवणार की, शिरोळे यांना तिसरी संधी देणार हे पाहायचे तिसरी संधी शिरोळे यांना मिळाली तर ते भाजपला पुण्यातील सलग दुसरा विजय मिळवून देतील का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरावे. वर्ष 1952 पासून वर्ष 1977 पर्यंत पहिल्या सहा निवडणुकीत पुणेकरांनी कॉंग्रेस व विरोधकांना आलटून पालटून संधी दिली. वर्ष 1980, 1984, 1989 अशा सलग तीन निवडणुकांत कॉंग्रेसने विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. वर्ष 1991 व वर्ष 1996, वर्ष 1998 मध्ये अनुक्रमे भाजप, कॉंग्रेसला विजय मिळाला. वर्ष 1999 मध्ये भाजपने बाजी जिंकली तर वर्ष 2004, वर्ष 2009 मध्ये पुन्हा कॉंग्रेसने सलग विजय मिळविले. वर्ष 2014 मध्ये पुन्हा भाजपला यश मिळाले. वर्ष 1952 पासूनच्या 16 निवडणुकीत कॉंग्रेसने 10 तर भाजपने तीन विजय मिळविले. तर तीन वेळा समाजवादी विचारांचा विजय झाला. तिसरा विचार पुण्याच्या राजकीय क्षितिजावर क्षीण झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर भाजप वर्ष 2019 मध्ये कोणती भूमिका घेणार याबद्दल उत्सुकता आहे. आजवरची परंपरा मोडणार की “भाकरी फिरवणार’ हा कळीचा मुद्दा असेल, यात शंका नाही. भाकरी फिरवून सलग दुसरा विजय पक्ष मिळवेल का, याबद्दल ही उत्सुकता असेलच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)