#टिपण: पुरस्कारांच्या घोषणांमध्ये नियमितता हवी 

शेखर कानेटकर 
अतुलनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्‍तींना “महाराष्ट्र भूषण’ किताब देऊन गौरव करण्याची प्रथा पूर्वीच्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारच्या काळात सुरू झाली. पण आजच्या भाजप-शिवसेना सरकारने गेल्या तीन वर्षात हा पुरस्कारच जाहीर केलेला नाही. अशा प्रकारे धरसोडीचे धोरण राज्यकर्त्यांच्या दृष्टीने हिताचे नसते. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत एक नक्‍की धोरण ठरवणे गरजेचे आहे. 
सन 2015 या वर्षीचा “महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिला गेला होता. त्यानंतर 2018 वर्ष निम्मे-अधिक संपले पण “महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या नव्या मानकऱ्यांची घोषणा अद्याप झालेली नाही. पुरंदरे यांना राज्याचा हा सर्वोच्च सन्मान दिल्यावर प्रचंड वादंग झालेले होते. शेवटी पुरस्कार प्रदान समारंभ राजभवनाच्या बंदिस्त जागेत घ्यावा लागला होता. या सन्मानावरून यापूर्वी एवढा वाद कधीच झाला नव्हता. या अनुभवावरून विद्यमान राज्यकर्त्यांनी या पुरस्काराबद्दल सावध भूमिका घ्यायचे ठरविलेले दिसते.
अर्थात पुरस्कार दरवर्षी जाहीर न करणे, हे काही विद्यमान सरकारच्या कार्यकालात घडले आहे, असे नाही. सन 1998, 2011, 2012, 2013 आणि 2014 या वर्षीही हा पुरस्कार दिला गेला नव्हता. सन 1996 साली पहिला “महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार “अवघ्या महाराष्ट्रा’चे लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जाहीर झाला होता. त्यानंतर गेल्या 22 वर्षात 17 नामवंत व्यक्ती या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. सन 2008 मध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब धर्माधिकारी या दोघांना एकदम हा पुरस्कार देण्यात आला होता.
आजवरच्या “महाराष्ट्र भूषण’ मानकऱ्यांमध्ये साहित्यिक, वैज्ञानिक, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटपटू, गायक-गायिका अशा राज्याच्या विविध क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे. या व्यक्तींच्या कार्याबद्दल शंका घेण्यासारखे नाही. दोनदा वाद झाला, तो राजकारण करण्याच्या प्रवृत्तीमुळे. शिवसेना-भाजपच्या पहिल्या युती सरकारच्या काळात, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना या “महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हा पहिला पुरस्कार द्यायचा विचार होता. परंतु, स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनीच हा विचार हाणून पाडला व पहिला पुरस्कार साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना देण्यास सांगितले. स्वतः ठाकरे यांनी ही बाब अनेकदा प्रकटपणे सांगितली होती.
बाळासाहेब अनेकवेळा “लोकशाही’ ऐवजी “ठोकशाही’चा पुरस्कार करीत असत. पहिल्या पुरस्कार सोहळ्यात पु.लं.नी या “ठोकशाही’वर कडवट टिपणी केली. तेव्हा ठाकरे यांनी, “पु.लं.ना पुरस्कारच द्यायला नको होता’, अशी त्यांच्या खास शैलीतील प्रतिक्रिया दिली होती. त्यावरील वाद बरेच दिवस झाला होता. त्यानंतर वाद झाला तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुरस्काराच्या वेळी. त्यांच्या इतिहासलेखनाबद्दल!
आजवरच्या “महाराष्ट्र भूषण’च्या मानकऱ्यांत एकही राजकारणी व्यक्ती नाही, हे एक विशेष. या 17 मानकऱ्यांत दोन महिला आहेत, त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर- सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी राणी बंग यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
सरकार, महापालिका वेळोवेळी उत्साहाने नामवंत व्यक्तींच्या नावे पुरस्कारांची घोषणा करते. पण पुरस्कार घोषणा व वितरण यात अनेकदा सातत्य नसते. साहित्य, क्रीडा पुरस्कारही बरेचदा दोन-दोन वर्षांनी दिले गेल्याची उदाहरणे आहेत. हे पुरस्कारही अनेकदा “कार्यक्रम उरकला एकदाचा’ अशा रुक्ष पद्धतीने दिले जातात. लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, विंदा करंदीकर, प्रभाकर पणशीकर या व अशा थोर व्यक्तींच्या नावाचे पुरस्कार सरकारतर्फे दिले जातात. त्यातही सातत्य राखण्याची आवश्‍यकता आहे. तरच या व्यक्तींचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे वाटते.
तसेच ज्या व्यक्‍तीला अथवा संस्थेला पुरस्कार द्यावयाचा आहे, त्या व्यक्ति वा संस्थांचे कार्य हे कोणत्याही वादाच्या पलीकडचे आहे, हे पाहायला हवे. त्याचप्रमाणे जे ते पुरस्कार ज्या त्या वर्षातच दिले गेले पाहिजेत.
“महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मानकरी…
प 1996 – पु. ल. देशपांडे, साहित्यिक
प 1997 – लता मंगेशकर, पार्श्‍वगायिका
प 1999 – विजय भटकर, शास्त्रज्ञ
प 2000 – सुनील गावसकर, क्रिकेटपटू
प 2001 – सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू
प 2002 – पं. भीमसेन जोशी, शास्त्रोक्त गायक
प 2003 – डॉ. अभय-राणी बंग, समाजकार्य
प 2004 – बाबा आमटे, समाजकार्य
प 2005 – डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ
प 2006 – रतन टाटा, उद्योजक
प 2007 – रा. कृ. पाटील, समाजकार्य
प 2008 – मंगेश पाडगावकर, कवी;
नानासाहेब धर्माधिकारी, समाजकार्य
प 2009 – सुलोचना काटकर, अभिनेत्री
प 2010 – डॉ. जयंत नारळीकर, शास्त्रज्ञ
प 2011 – डॉ. अनिल काकोडकर, शास्त्रज्ञ
प 2015 – बाबासाहेब पुरंदरे, इतिहास संशोधक

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)