टिपण: पाच वर्षे पूर्ण करणारे मोदी सातवे

शेखर कानेटकर

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत चौदा पंतप्रधान लाभले, परंतु त्यातील निम्मेच म्हणजे सातजणच पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू शकले आहेत, हे विशेष. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकाल पूर्ण करणारे सातवे पंतप्रधान असतील. मध्यंतरीचा काही कालावधी सोडला, तर 1999 नंतर आघाडी सरकारे असली तरी देशाला सलग पाच वर्षे टिकणारा पंतप्रधान मिळण्याचे भाग्य लाभले आहे.

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 मध्ये पदाची सूत्रे घेतली. ते या पदावर सोळाव्या लोकसभेची मुदत संपेपर्यंत राहणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. कार्यकाल पूर्ण करणारे मोदी हे वाजपेयींसारखे दुसरे भाजपायी पंतप्रधान ठरतील. भाजपचा पंतप्रधान असणारी दोन्ही सरकारे पूर्णकाळ टिकली. पण फरक एवढाच की वाजपेयी यांना दीड डझन पक्षांना बरोबर घेऊन कसरत करावी लागली होती तर मोदी यांना पूर्ण बहुमताचे भाग्य लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग या सहा जणांना यापूर्वी पूर्ण कार्यकाल मिळाला. परंतु मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, विश्‍वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल हे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले पण कमनशिबी ठरले. अल्पकाळच त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री राजकीय अस्थिरतेमुळे नव्हे तर आकस्मिक निधनामुळे अल्पकाळच या सर्वोच्च पदावर राहू शकले.

जवाहरलाल नेहरू सर्वाधिक काळ म्हणजे जवळपास सतरा वर्षे सलग पंतप्रधानपदावर राहिले. (15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964). इंदिरा गांधी याही सोळा वर्षे पंतप्रधान होत्या, पण त्या दोन टप्प्यात. प्रथम 19 जानेवारी 1966 ते 24 मार्च 77 अशी अकरा वर्षे त्यांनी हे पद भूषविले. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण 1980 च्या निवडणुकीनंतर त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. 31 ऑक्‍टोबर 1984 रोजी निर्घृण हत्या होईपर्यंत म्हणजे 4 वर्षे 10 महिने त्या या पदावर राहिल्या. नेहरू, गांधी यांच्यानंतर सर्वाधिक (दहा वर्षे) (2014-2014) पंतप्रधान होण्याची संधी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे चालून आली. मूळचे राजकारणी नसलेले ते पहिले पंतप्रधान. राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96), अटलबिहारी वाजपेयी (1999-2004) आणि आता मोदी हे पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे पंतप्रधान ठरतील.

कॉंग्रेसने आजवर देशाला सहा पंतप्रधान दिले. त्यातील तिघे (जवाहरलाल, इंदिरा व राजीव) हे नेहरू-गांधी घराण्याचे होते तर पी. व्ही. नरसिंह राव, लालबहादूर शास्त्री, डॉ. मनमोहन सिंग हे इतर तिघे. यातील शास्त्री यांचा अपवाद वगळता इतर सर्वांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. भाजपच्या वाजपेयी, मोदी यांचेही कार्यकाळ पूर्ण झाले.
तिसऱ्या आघाडीचे (जनता पक्ष/जनता दल) मोरारजी देसाई, चरणसिंग, विश्‍वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, देवेगौडा व गुजराल असे तब्बल सहा पंतप्रधान झाले, पण ते स्थिर सरकार देऊ शकले नाहीत. त्यांची सर्व सरकारे अल्पायुषी ठरली. मोरारजी, चंद्रशेखर, गुजराल, व्ही.पी. सिंग ही सर्व मंडळी तत्पूर्वी कॉंग्रेसमध्ये होती, त्यांना कारभाराचा अनुभवही होता पण त्यांचा टिकाव काही पाच वर्षे लागू शकला नाही. सध्या महागठबंधनची चर्चा सुरू आहे या पार्श्‍वभूमीवर मतदार या पूर्वानुभवाची कदाचित नोंद घेतीलही.

मोरारजी देसाई दोन वर्षे तरी पंतप्रधानपदावर राहिले पण चरणसिंग 6 महिने, चंद्रशेखर 7 महिने तर गुजराल यांना 11 महिनेच या पदाचा टिळा लागला, असे इतिहास सांगतो. आणखी एक विशेष म्हणजे आजवर देशाला सात उपपंतप्रधान मिळाले. पण त्यातल्या एकालाही पाच वर्षांची मुदत पूर्ण करता आली नाही. मोरारजी, चरणसिंह पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले पण त्यांना हे सर्वोच्च पद फलदायी ठरले नाही ही वस्तुस्थिती आहे.

26 मे 2014 रोजी सत्तारूढ झालेले पंतप्रधान मोदी येत्या निवडणुकीनंतर पुन्हा त्या पदावर बहुमताने निवडून येतील की नाही याबद्दल आतापासूनच चर्चा सुरू आहे. 2014 प्रमाणे भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल का? एनडीएला सत्ता मिळाली, (म्हणजे भाजपला पूर्ण बहुमत नाही मिळाले तर) मोदींकडेच नेतृत्व राहील का? असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. पतंगबाजी सुरू आहे. पण तूर्त तरी नरेंद्र मोदी 5 वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे देशाचे सातवे पंतप्रधान ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)