#टिपण : नेहरू-गांधी घराण्याचा करिष्मा उरलाय कोठे? 

शेखर कानेटकर 

नेहरू-गांधी घराण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच तोंडसुख घेतात. त्यांचे ते डावपेच आहेत. नेहरू-गांधी घराणे आणि पर्यायाने कॉंग्रेसला जास्तीत जास्त बदनाम करून पूर्णतः नामोहरम करण्याचे त्यांचे धोरण असू शकते. पण नेहरू-गांधी घराण्याच्या करिष्म्याचा बहर आता जवळपास पूर्णपणे ओसरला आहे, ही वस्तुस्थिती असताना हा विषय किती काळ चघळायचा, हा खरा प्रश्‍न आहे. 

नेहरू-गांधी घराण्याच्या करिष्म्याला ओहोटी लागलेली असल्याने मोदी यांच्या स्थानाला कोणताही धोका नाही, हे मोदींनी ओळखून घ्यायला हवे आहे. नेहरू-गांधी घराण्यातील पाचवी पिढी मोदी यांना निर्णायक आव्हान देण्याची नजिकच्या काळात तरी शक्‍यता नाही. त्यामुळे त्या विषयावर फार वेळ व शक्ती दवडण्याचे कारण नसावे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 71 वर्षे लोटली. त्यातील तब्बल 37 वर्षे देशाचे पंतप्रधानपद नेहरू-गांधी घराण्याकडे राहिले. परंतु, 1989 पासून गेली 29 वर्षे हे पद या घराण्याकडे येऊ शकलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2004 ते 2014 ही दहा वर्षे यूपीएची सत्ता होती. या काळात कॉंग्रेसचे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. कॉंग्रेस संसदीय पक्षाने नेतेपदी निवड केल्यावरही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद डॉ. सिंग यांच्याकडे दिले. त्या व राहुल यांच्या रिमोट कंट्रोलनेच हे सरकार चालत होते, हे उघड आहे. अधिकृत पद नसले तरी या घराण्याकडेच अप्रत्यक्षपणे सत्ता होती, असे म्हणता येईल. सन 1991 ते 1996 कॉंग्रेसकडे सत्ता होती. पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते. पण या काळात सोनिया-राहुल राजकीय पटलावर फारसे नव्हतेच.

स्वातंत्र्यानंतरच्या 71 वर्षात कॉंग्रेसकडे 54 वर्षे सत्ता राहिली. त्यातील 37 वर्षे पं. नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी या नेहरू-गांधी घराण्यातील तीन पिढ्यांनी पंतप्रधानपद उपभोगले. उरलेल्या 17 वर्षांच्या राजवटीत कॉंग्रेस सरकारांचे नेतृत्व लालबहादूर शास्त्री, पी. व्ही. नरसिंह राव व डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. शास्त्रीजी, राव यांना मुक्‍तपणे-स्वतंत्रपणे कारभार करता आला, पण डॉ. सिंग यांना ते भाग्य लाभले नाही. त्यांना 10 वर्षे सोनिया-राहुल यांच्या प्रभावाखालीच कारभार करावा लागला. पं. नेहरू सलग साडेसोळा वर्षे पंतप्रधानपदावर होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी दोन टप्प्यात साडेपंधरा वर्षे, तर राजीव गांधी यांनी साडेचार वर्षे हे पद सांभाळले. पण 1977 व 1989 च्या निवडणुकीत या दोघांना पराभवही पाहावा लागला. पुढे या माय-लेकांची निर्घृण हत्याही झाली.

इंदिरा गांधी वडिलांबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरल्या. मंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. पण राजीव गांधी यांना प्रशासकीय अनुभव नव्हता; तरी सहानुभूतीच्या लाटेत त्यांना सहज सत्ता मिळाली. सन 1984 नंतर कॉंग्रेस पक्षाला निर्विवाद सत्ताच मिळालेली नाही. सन 1991 व 2004 मध्ये सरकारांचे नेतृत्व कॉंग्रेसने केले. पण ती सत्ता पूर्णतः स्वबळावर नव्हती. इंदिराजी, राजीव व नंतर काही काळ सोनिया गांधी यांचा करिष्मा जरूर होता. पण विशेषतः 2014 पासून तो चांगलाच ओसरला आहे. भरपूर संधी मिळूनही राहुल गांधी यांनी आपले नेतृत्व निर्विवादपणे सिद्ध केलेले नाही, हे खरे आहे. ते मान्यही करावे लागेल.

आधी सरचिटणीस मग उपाध्यक्ष आणि आता पक्षाध्यक्ष झालेल्या राहुल गांधी यांना आजपर्यंत एकही राज्य निर्विवादपणे जिंकता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्टार प्रचारक असतानाही सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 543 पैकी अवघ्या 44 जागा जिंकत आजवरचा नीचांक गाठला. दहा राज्यात तर कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. एकाही राज्यात दोन आकडी जागा मिळाल्या नाहीत. सन 2014 नंतर झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकांत कॉंग्रेसचा पराभवाने पाठलागच केला आहे. या पार्श्‍वभूमीवर अलीकडे झालेल्या गुजरात, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मर्यादित का होईना, यश मिळाले. राहुल गांधी यांचे प्रयत्न व प्रचार कारणी लागला. पण सत्तेत येण्यास तो अजिबातच पुरेसा नाही.

राहुल गांधी यांचे नेतृत्व कॉंग्रेस वगळता इतर भाजप विरोधी पक्ष निर्विवादपणे मान्य करतील असे आजचे चित्र नाही. शरद पवार, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, चंद्राबाबू नायडू, मायावती असे दिग्गज खुलेपणाने त्यांचे नेतृत्व स्वीकारतील असे वाटत नाही. विरोधी पक्षामधील इतर पक्षांपेक्षा कॉंग्रेसने खूपच अधिक जागा जिंकल्या, तरच हे घडू शकेल. कॉंग्रेसच्या नवीन कार्यकारिणीने विरोधी आघाडीचा चेहरा राहुल गांधी राहतील, असे म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याची जाणीव झाल्यावर “इतर कोणीही चालतील’, अशी पडती भूमिका कॉंग्रेसला लगोलग घ्यावी लागली. हा बदलही राहुल यांचे नेतृत्व निर्विवाद नाही, हे दर्शविणारा म्हणावा लागेल.

प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे मोठ्या उंचीचे नेते होते; एक ठोस कार्यक्रम होता. पुढे हे कमी होत गेले आणि मग कॉंग्रेसजनांनी जिंकण्यासाठी “करिष्मा’ असलेले नेहरू-गांधी घराणे पुढे केले. पण आता हे नाणे चलनातून बाद होत चालले आहे, हे निर्विवाद! इतर कोणी नेता आपल्याला सत्तेत नेईल, याची खात्री कॉंग्रेसजनांना बहुधा वाटत नसल्याने ते नेहरू-गांधी घराण्याच्या एकेकाळी असलेल्या मोठ्या करिष्म्याचा आधार घेत असावेत. सन 2014 व त्यानंतरच्या निवडणुकांत राहुल यांना अपयश आल्यावर त्यांची बहीण प्रियांका यांना मैदानात उतरविण्याची मागणी पुढे रेटली गेली होतीच. पण ती काही मान्य झाली नाही. सोनिया गांधी आता आजारी आहे. राहुल यांना आता आत्मविश्‍वास येऊ लागलाय. पण नेहरू-गांधी घराण्याचा “तो’ करिष्मा त्यांना अजून साधता आलेला नाही, एवढे मात्र नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)