टिपण: नाईकांनंतर फडणवीसच! 

शेखर कानेटकर 

स्वच्छ प्रतिमा, पक्षश्रेष्ठींचा भक्कम पाठिंबा याच्या जोडीला पक्षाला राज्यात सर्व पातळीवर यश मिळवून दिल्याने भारतीय जनता पक्षाचे देवेन्द्र फडणवीस यांच्यावर आजपर्यंत अस्थिरतेची टांगती तलवार राहिली नाही. म्हणूनच ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद सांभाळणारे दुसरे आणि तरुण मुख्यमंत्री ठरत आहेत. याआधी ही कामगिरी कॉंग्रेसच्या वसंतराव नाईक यांना साधता आली होती. 

वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद सांभाळणारे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या राजकीय इतिहासात नोंद होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. पाच वर्षांची सलग मुदत (टर्म) पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरणार, हेही उघड दिसते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 58 वर्षांत राज्याला तब्बल 17 मुख्यमंत्री (फडणवीसांसह) लाभले. परंतु, तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता एकाही मुख्यमंत्र्यांना पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करता आलेला नाही. ती कार्यकाल पूर्ण करण्याचे भाग्य फडणवीस यांना मिळण्याची शक्‍यता आहे.

वसंतराव नाईक सलग 11 वर्षे 2 महिने 15 दिवस मुख्यमंत्री होते. त्यानंतर विलासराव देशमुख आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 4 वर्षे 1 महिना 3 दिवस या पदावर होते.

देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्‍टोबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्याला येत्या 31 ऑक्‍टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर 1 महिना 3 दिवसांनी म्हणजे 4 डिसेंबर रोजी ते विलासराव देशमुखांचा दुसऱ्या क्रमांकाचा कार्यकाल मागे टाकतील.

सध्याचे फडणवीस यांचे राजकीय स्थान व वजन पाहता ते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहण्याचीच शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे नाईकांनंतर सर्वाधिक काळ पदावर राहणारे व पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे ते दुसरे नेते ठरतील, असे म्हणता येईल.

स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून असलेला लौकिक फडणवीस यांनी आजपर्यंत कायम ठेवला आहे. त्यांच्यावर आजवर एकही गंभीर स्वरुपाचा आरोप झालेला नाही. गेल्या चार वर्षांत फडणवीस यांनी भजपला राज्यातील सर्व निवडणुकीत (ग्रामीण भागासह) भरघोस यश मिळवून देण्याची कामगिरी बजावली आहे. विरोधक व पक्षांतर्गत विरोधक या दोघांनाही त्यांनी राजकीय कौशल्य वापरून डोईजड होऊ दिलेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असले तरी महाराष्ट्रात भाजपचा चेहरा व सारी भिस्त फडणवीस हेच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सध्या तरी फडणवीस यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी स्थिती आहे.

या सर्व गोष्टींमुळे फडणवीस यांनी पक्षाचे विद्यमान सर्वेसर्वा नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा पूर्ण विश्‍वास कमावला असल्याने त्यांची ती बाजूही चांगली भक्कम आहे. त्यामुळे उरलेला सुमारे वर्षभराचा कालवधी ते पूर्ण करतील, याबद्दल शंका घेण्यास फार वाव नाही. खुद्द फडणवीस यांनी आताचा वर्षाचा कालावधीच काय, पण पुढील निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून त्यांचा आत्मविश्‍वासही दिसून येतो. अर्थात राजकारणात फार पुढचे सांगता येत नाही, हेही तितकेच खरे. मधल्या काळात मराठा आरक्षण आंदोलन फार भडकले तेव्हा फडणवीस यांना बदलणार, त्यांना केंद्रात नेणार अशा वावड्या उठल्या होत्या किंवा उठविल्या गेल्या होत्या. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

भाजप-शिवसेना युतीचे महाराष्ट्रातील हे दुसरे सरकार आहे. वर्ष 1995-1999 या काळातील पहिल्या सरकारमध्ये शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने सेनेचे मनोहर जोशी प्रथम मुख्यमंत्री होते. त्यांनी हे पद 3 वर्षे 10 महिने सांभाळले. पण मध्येच मुख्यमंत्री बदलण्याची कॉंग्रेसची परंपरा शिवसेना नेतृत्वानेही पाळली आणि थोड्या काळासाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपदावर बसविले. पण ते जेमतेम 8 महिनेच मुख्यमंत्री राहिले. वर्ष 1999 मध्ये युतीची सत्ता गेली. 15 वर्षांनी युतीला पुन्हा सत्ता मिळाली तेव्हा भाजपकडे मुख्यमंत्रिपद आले. त्यांनी मात्र फडणवीस यांच्याकडे एकहाती मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले पहिले कॉंग्रेसेतर मुख्यमंत्रीही ठरले आहेत.

फडणवीस यांच्याआधी महाराष्ट्रात तब्बल 16 मुख्यमंत्री झाले. त्यातील 15 तर कॉंग्रेसचे होते. राज्यात आधी एकट्या कॉंग्रेसचे व नंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत होते, तरीही अनेकदा मुख्यमंत्री बदलले गेले. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून केंद्रात घेतले गेले तर केंद्रात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविले गेले असल्याची उदाहरणे आहेत. शरद पवार तीनदा, शंकरराव चव्हाण-वसंतदादा पाटील- विलासराव देशमुख दोनदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान जाले पण पाच वर्षांचा कालावधी सलगपणे पूर्ण करण्याचे भाग्य काही त्यांना लाभले नाही. पण सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे दुसरे मुख्यमंत्री होण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले पहिले नाईक व दुसरे फडणवीस हे दोघेही विदर्भाचे हेही विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)