#टिपण: दिखाऊ घोषणांचा सुकाळ चालूच! 

शेखर कानेटकर 
सर्वसामान्य जनतेला नुसतीच भुरळ घालणाऱ्या घोषणा करण्याचा 2014 च्या निवडणुकीच्या प्रचारापासून सुरू झालेला सिलसिला अजून चालूच आहे. पेट्रोल-डिझेलचे चढे, विक्रमी दर, रुपयाची दरदिवशी होणारी घसरण, वाढती वित्तीय तूट, राज्यांच्या तिजोरीतील खडखडाट याचा विचार न करता किंवा त्यावर उपाय न शोधता सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी नव्या घोषणांचा पाऊस चालूच ठेवलाहे. 
कोणत्याही पक्षाने यापूर्वी केलेल्या घोषणा प्रत्यक्षात आलेल्या नाहीत, लोक त्याविषयी उघडपणे जाब विचारू लागले आहेत, तरीही अति महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्याचा सपाटा चालूच आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डोळे दिपविणारे संकल्प सोडले जात आहेत. पूर्वानुभव लक्षात घेता या नव्या घोषणांची मतदारांवर किती व कशी भुरळ पडेल, अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे. बुधवारच्या एका दिवसातच अशा तीन घोषणा वाचकांना वाचावयास मिळाल्या. “अंथरूण पाहून हातपाय पसरावेत’ असे म्हणतात, पण सत्ताधाऱ्यांना त्याचे बान नाही, असेच यावरून म्हणावेसे वाटते.
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने “मुंबई ते नागपूर या दरम्यान समृद्धी महामार्ग’ बांधण्याची घोषणा केली आहे. किमान 705 किलोमीटर लांबीचा हा महत्त्वाकांक्षी मार्ग असेल. या महामार्गासाठी जमीन संपादन करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही तर प्रत्यक्ष महामार्गाचे काम दूरच. पण या महामार्गाभोवती संरक्षक भिंत बांधण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करून टाकली आहे.
समृद्धी महामार्ग 705 किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बाजूने भिंत म्हणजे 1410 किलोमीटर लांबीची भिंत झाली. जगातील सर्वात मोठ्या लांबीची म्हणजे 8 हजार 850 किलोमीटर लांबीची भिंत चीनमध्ये आहे. ती जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक मानली जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी भिंत “समृद्धी’ महामार्गाभोवतीची असेल, आणि जगातील हे आठवे आश्‍चर्य ठरेल, असे अर्थमंत्र्यांना वाटते. जागातील द्रतुगती मार्गांभोवती संरक्षक भिंत बांधण्याची पद्धत लोकप्रिय असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
जगात लोकप्रिय आहे म्हणून मागचा पुढचा विचार न करता आपण त्याचे अनुकरण कशासाठी करायचे? ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च येईल. हा पैसा कोठून आणणार याचा विचारही नाही. बुलेट ट्रेन, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एवढेच कशाला अगदी पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल यांच्या घोषणा झाल्या, भूमिपूजनेही पार पडली पण प्रत्यक्ष कामे किती झाली या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थीच मिळते.
महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेच्या दिवशीच केंद्रीय विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी येत्या 10 ते 15 वर्षांत देशात थोडेथोडके नव्हे तब्बल 100 विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे. देशातील विमान प्रवाशांची संख्या वाढते आहे, हे खरे आहे परंतु ही संख्या काही ठराविक शहरांपुरती आहे. या ठिकाणी विमानतळ आहेत. परंतु जेथे वाहतूक वाढते आहे, तेथील विस्तार, क्षमता वाढविणे समजू शकते. पण थेट 100 नवे विमानतळ ही जरा अतिशयोक्तीच वाटते. छोट्या शहरांसाठी “उडान’ ही हवाई वाहतुकीची योजना केंद्र सरकारने जाहीर केली. मोठा गाजावाजा केला गेला पण “उडान’ची आज काय अवस्था आहे. बहुतेक ठिकाणची सेवा आज बंद पडली. तांत्रिक कारणांमुळे किंवा पुरेसे प्रवासी नाहीत म्हणून. असे असले तरी 2-4 विमानतळांची नाही तर थेट 100 विमानतळांची घोषणा?
पुण्यातील मुळा-मुठा नद्यांची नालासदृश अवस्था सर्वांना ठाऊक आहे. पण तरीही पुण्यात जलवाहतुकीचा विचार असल्याचे सांगितले जातेच. याला काय म्हणणार? तिकडे उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही अशी एक घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश सरकार म्हणे नर्सरी ते पदव्युत्तर शिक्षण (केजी टू पीजी) सरकारी संस्थांमधून मोफत देणार आहे. त्याची सुरुवात काही शहरांतून पुढील शैक्षणिक वर्षांपासून केली जायाची आहे. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी कितीजण सरकारी महाविद्यालयात जातात, हा एक प्रश्‍न आहेच.
प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये, दरवर्षी एक कोटी रोजगार अशा भुरळ घालणाऱ्या योजना पूर्वी प्रचारात जाहीर केल्या गेल्या. शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे गाजरही दाखविले गेले. यातील काही प्रत्यक्षात उतरलेले नाही. मग हा “निवडणूक जुमला’ असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या खुद्द राष्ट्रीय अध्यक्षांनीच सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर नव्या घोषणांवर नागरिकांनी कसा विश्‍वास ठेवावा हा प्रश्‍नच आहे. पेट्रोलचे दर, गॅसचे दर वाढताहेत. इतर महागाईही वाढल्याने “अच्छे दिन’ ही प्रत्यक्षात दिसत नाहीत. सत्तेवर येऊन साडेचार वर्षे झाली तरी अपयशाचे खापर जुन्या सरकारवर फोडून नामानिराळे होण्याचे तंत्र वापरले जाते आहे. यशाचे श्रेय आमचे, अपयशाला मात्र जुने सरकार जबाबदार. आम्ही फक्त चमकदार, भुरळ घालणाऱ्या, दिखाऊ घोषणाच करणार असा प्रकार चालू आहे. लोक याला किती काळ भुलणार हा खरा प्रश्‍न आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)