टिपण: जागावाटपात नमते कोण घेणार? भाजप की शिवसेना?

शेखर कानेटकर

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की दोघेही स्वबळावर लढणार याचा अंदाज सर्वसामान्य नागरिकांनाच काय पण त्या दोन पक्षांच्या नेत्यांनाच पुरेसा आलेला दिसत नाही. पाच राज्यांच्या निवडणुकीतील पीछेहाटीनंतर भाजप शिवसेनेबरोबर युती करायला उत्सुक आहे, पण शिवसेना नेतृत्वाने अद्याप थांग लागू दिलेला नाही. शेवटच्या घटकेला 2014 सारखी धावपळ नको म्हणून भाजपने आता स्वबळाची पूर्वतयारी केलेली दिसते.

भाजपला खरोखरच युती हवी असेल तर लोकसभेच्या राज्यातील 48 पैकी 24 तर विधानसभेच्या 288 पैकी 155 जागा शिवसेनेला हव्या आहेत, असे सांगितले जाते. पण भाजप जागावाटपाबाबत फार तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नाही, असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोण नमते घेणार हा खरा प्रश्‍न आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीसंबंधी जी सर्व्हेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत, ती पाहता युती न झाल्यास दोन्ही पक्षांना 2014 च्या तुलनेत मोठाच फटका बसणार असे दिसते. भाजपला सद्यस्थितीत ते नको आहे. कारण येत्या निवडणुकीत त्यांना आता एक एक जागा महत्त्वाची आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप लोकसभेच्या राज्यातील 48 जागांचा 24-24 फॉर्म्युला (शिवसेनेला हवा असलेला) किती मान्य करते यावर बरेच अवलंबून आहे.

2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपला 23 तर शिवसेनेला 18 अशा विक्रमी जागा महाराष्ट्रात मिळाल्या होत्या. ही कामगिरी टिकविणे हे दोन्ही पक्षांपुढील आव्हान असेल. गेल्या वेळेप्रमाणे युती नसेल तर हे अवघड आहे असे भाजप नेतृत्वाला उशिरा का होईना उमगले आहे. बहुसंख्य शिवसेना खासदारांमध्येही हीच चलबिचल आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तरी युती हवी हा या खासदारांचा पक्षनेतृत्वाकडे आग्रह आहे. पण शिवसेना नेतृत्वाने अजून तरी प्रतिसाद दिलेला नसल्याने युतीबाबतची अनिश्‍चितता कायम आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फार पूर्वीच करून ठेवली आहे. त्यादृष्टीने त्यांनी राज्यात दौरे करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचा भडिमार अत्यंत तिखट शब्दात चालू ठेवला आहे. “मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावूनही शिवसेनेची टीका थांबलेली नाही.

अर्थात भाजप व मोदींवरील टीका चालू ठेवली म्हणजे शिवसेना शेवटच्या क्षणी भाजपची साथ देणारच नाही, असे ठामपणे म्हणता यावयाचे नाही. कारण एकीकडे ही टीका चालू असताना दुसरीकडे शिवसेनेने मोक्‍याच्या वेळी मोदी सरकारवरील लोकसभेतील अविश्‍वास ठराव, राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, विरोधी पक्षांचा महागाईविरोधी बंद यावेळी भाजपला अनुकूल ठरेल, अशीच भूमिका घेतली हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय विरोधी पक्षांपेक्षा जास्त कडवी टीका करूनही सेनेने केंद्र व राज्यातील मंत्रिपदे शाबूत राखलेली आहेत. ही मंत्रिपदे सोडण्याचे वा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे नावही सेना घेत नाही. अथवा भाजपही सेनेच्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवित नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? त्यामुळे बरेचदा भाजप-सेनेचे हे लुटूपुटूचे भांडण वाटते. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार या दुहेरी धोरणावर किती विश्‍वास ठेवतील हा प्रश्‍न आहेच. तसेही शिवसेनेला लोकसभेपेक्षा विधानसभेतच जास्त रस आहे. पण स्वबळावर सेना राज्यात सत्ता स्थापन करू शकेल का, ही बाब महत्त्वाची ठरावी.

वर्ष 1989 मध्ये भाजप-शिवसेना युती झाल्यापासून 1990 ते 2009 पर्यंत झालेल्या 5 निवडणुकीत शिवसेनेला कमाल 73 जागाच मिळाल्या आहे. तर 2014 मध्ये स्वबळावर 63 जागा मिळाल्या. 145 या बहुमतापासून हा आकडा खूपच दूर नाही का?

वर्ष 1990 ते 2009 पर्यंत शिवसेना-भाजपच्या युतीत शिवसेना राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. सेनेकडे अधिक मतदारसंघ असत. परंतु सेनेचा स्ट्राईक रेट (उभ्या केलेल्या उमेदवारांच्या तुलनेत विजयी उमेदवारांचे प्रमाण) प्रभावी राहिलेला नाही. वर्ष 1990 मध्ये सेनेचे 183 पैकी अवघे 52 उमेदवार विजयी होऊ शकले. तर 2009 मध्ये 169 पैकी 44 जणांनाच विजय मिळवता आला. वर्ष 2014 मध्ये 286 उमेदवार उभे करूनही सेनेच्या पदरात 63 ठिकाणीच यश आले. जागा वाटप करताना भाजप याचा विचार नक्कीच करणार.

पाच राज्यांच्या निकालानंतर बिहारचे लोकसभेचे जागावाटप करताना भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या पाच जागांवर पाणी सोडून नमते घेतले. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातही काही अनुकूल घडेल, अशी आशा शिवसेनेला असेल. पण बिहारप्रमाणे महाराष्ट्रात होणार नसल्याचे संकेत शहा यांनी दिले आहेत. शिवाय महाराष्ट्रातील विधानसभेत भाजपपेक्षा सेनेला जादा जागा देणे भाजपला परवडणारे नाही. सेनेचे अधिक उमेदवार निवडून आले तर ते मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतात. हे भाजप मान्य करेल? अशी ही युतीची ओढाताण चालू आहे. युतीबद्दल भाजपच अधिक उत्सुक दिसतोय. शेवटी नमते कोण घेते यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)