टिपण: कॉंग्रेस-भाजपा : एकाच नाण्याच्या दोन बाजू

शेखर कानेटकर

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील भाषणात अलीकडेच मोदी यांनी कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा “लॉलीपॉप’ दाखविला. कॉंग्रेसच्या थापांपासून सावध राहा, असे वक्‍तव्य केले आहे. या वक्‍तव्याची दखल घ्यायला हवी. ती घेत असताना कॉंग्रेस पक्षाचे समर्थन करण्याचा वा त्या पक्षाची बाजू घेण्याचा अजिबातच हेतू नाही. पण कॉंग्रेसबरोबर भाजपकडून तेच केले जात आहे हे सांगण्याचा हेतू आहे. दोन्ही पक्ष आता एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत, हे उघडपणे पाहावयास मिळते.

लॉलीपॉप: यांचे आणि त्यांचे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या सरकारने काय काय विधायक केले हे सांगण्यापेक्षा विरोधी पक्षांवर विशेषत: कॉंग्रेस व गांधी घराण्यावर टीका करण्यावरच अधिक भर असतो. त्यात आता फारसे नावीन्य राहिलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आधी कर्नाटकात आणि आता राजस्थान, मध्य प्रदेशात सत्ता मिळाल्यावर कॉंग्रेसच्या राज्य सरकारांनी तडकाफडकी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आदेश काढले हे खरे आहे. निवडणुकीच्या प्रचारातील शब्द पाळण्यासाठी ही धडपड होती. पण ही कर्जमाफी केली म्हणून एकट्या कॉंग्रेसला दोष देण्यात काय अर्थ आहे?

सत्ता मिळताच उत्तर प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तरी दुसरे काय केले होते? महाराष्ट्रातही भाजप मुख्यमंत्र्यांनी आजवरची “सर्वात मोठी’ कर्जमाफी जाहीर केलीच की! मध्य प्रदेश, राजस्थानच्या नव्या राज्य सरकारांनी कर्जमाफीची घोषणा केल्यावर आसाममधील भाजप सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे कर्जमाफीचा “लॉलीपॉप’ फक्‍त कॉंग्रेसनेच दिला आहे असे म्हणता येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर व इतर अर्थपंडितांनी दिलेला सल्ला दोन्ही पक्षांनी धुडकावून लावला आहे.

कर्नाटकात फक्‍त 800 शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ झाला असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्याची चौकशी जरूर व्हायला पाहिजे. परंतु उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात तरी सगळ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्याच्या तक्रारींची संख्या ही मोठी आहे, हे लक्षात घेतले जाणे गरजेचे आहे पण एका पक्षाच्या सरकारांनाच लक्ष्य केले जात आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच प्रश्‍नाबाबत खरे तर राजकारण व्हायला नको. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला शेतकरी वर्गाची नाराजी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे, हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारतर्फे चार लाख कोटी रुपयांची राष्ट्रव्यापी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. हा “लॉलीपॉप’चाच भाग होत नाही का?

कर्जमाफी हा शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडविण्याचा एकमेव उपाय नाही, हे सर्वांनाच मान्य आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त, किफायतशीर भाव मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे. शेती उत्पादनास दीडपट भाव देण्याची हमी मोदी यांनी निवडणूक प्रचारात दिली होती. पण गेल्या साडेचार वर्षात या दृष्टीने काहीच ठोस झालेले नाही. मध्यंतरी काही घोषणा झाली पण तो “लॉलीपॉप’ च ठरला. शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काहीच पडले नाही.

कॉंग्रेस पक्षाच्या थापांपासून सावध राहण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. तोही राजकीयच म्हणायला हवा. कारण कोणताही राजकीय पक्ष असो भाजप काय किंवा कॉंग्रेस काय व इतर सर्वच पक्षांचे प्रमुख अस्त्र थापा आणि आश्‍वासने हेच असते. जी कधीच पूर्ण होत नाहीत, ती आश्‍वासने (म्हणजे थापा) असे आता समीकरण बनून गेले आहे. त्यामुळे थापांबाबत कोणत्याच एका पक्षाला बोल लावता येण्यासारखी परिस्थिती नाही.

2014 च्या निवडणुकांच्या प्रचारात मोदी यांनी तरी वेगळे काय केले? परदेशातील लाखो कोटी रुपयांचा काळा पैसा भारतात आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, दरवर्षी एक कोटी रोजगार निर्माण करू, भ्रष्टाचार समूळ उखडून टाकू, ना खाऊंगा ना खाने दूंगा असे कितीतरी “लॉलीपॉप’ दाखविले गेले होते. पण आजवर त्या बाबतीत काहीच हाती लागलेले नाही. नोटाबंदी करताना काळा पैसा खणून काढणार, दहशतवाद-नक्षलवाद संपणार, बनावट नोटांना आळा बसणार असा “लॉलीपॉप’ दाखविला गेला, पण तो पचलेला नाही उलट बाधलाच. कर्नाटकात कॉंग्रेस- जेडीएसने मागील दाराने सरकार स्थापन केले असे मोदी सभेत म्हणाले.

कर्नाटकात भाजपने आधी प्रयत्न केलाच पण यश मिळाले नाही. मग माघार घेतली. गोव्यात भाजपने सरकार स्थापन केले ते मुख्य दरवाजाने केले असे म्हणता येईल का? सध्या सर्वच राजकीय पक्षांची अवस्था, चाल-चलन- चारित्र्य एकसारखेच झाले आहे. कोणताही पक्ष” पार्टी विथ ए डिफरन्स’ राहिलेला नाही. एकमेकावर टीका करताना हे पक्ष, त्यांचे नेते स्वत:च्या पायाखाली काय जळते आहे हे पाहात नाहीत. त्यामुळे लॉलीपॉप सारखी वक्‍तव्ये ऐकून-वाचून फार गंभीरपणे लोक ती घेत नाहीत. राफेल बाहेर काढले काय की ऑगस्टा वेस्टलॅंड येणार हे लोकांनी गृहित धरलेले असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)