टाटा मोटर्समध्ये “ब्लॉक क्‍लोजर’

पिंपरी – नोटबंदी आणि “जीएसटी’च्या अंमलबजावणीनंतर वाहन उद्योगावर आलेले मंदीचे सावट अद्याप हटलेले नाही. नुकत्याच झालेल्या दसरा, दिवाळीचा सणही वाहन उद्योगासाठी फारसा समाधानकारक गेला नाही. परिणामी पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राचा कणा असलेल्या टाटा मोटर्सने आजपासून (गुरुवार) ते 1 डिसेंबरपर्यंत “ब्लॉक क्‍लोजर’ जाहीर केला आहे.

टाटा मोटर्समुळे पिंपरी-चिंचवड शहराला “ऑटो मोबाईल हब’ अशी ओळख प्राप्त झाली आहे. शहरातील सुमारे दोनशे मध्यम तर सुमारे दोन हजार लघु व सुक्ष्म उद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. टाटा मोटर्सने 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत “ब्लॉक क्‍लोजर’ घोषित केला आहे. मेटनन्स विभाग वगळता सर्व विभाग बंद आहेत. “ब्लॉक क्‍लोजर’ तीन दिवसांचा असला तरी रविवारची साप्ताहिक सुट्टी जोडून आल्याने चार दिवस टाटा मोटर्स बंद राहणार आहे. परिणामी त्यावर अवलंबून असणारे उद्योगांचीही चाके मंदावली आहेत. त्यामुळे भोसरी औद्योगिक परिसरात बऱ्यापैकी शुकशुकाट जाणवत होता.

नोटबंदी व वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनंतर गेली वर्षभर वाहन उद्योगावर मंदीचे मळभ गडद झाले होते. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच हे वातावरण काही अंशी सावरल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे टाटा मोटर्सनेही गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात वाढ केली होती. मात्र, यंदाची दसरा, दिवाळी वाहन उद्योगासाठी जेमतेम गेली. मागील दोन वर्षाचा बॅकलॉग भरुन निघेल, अशी वाहन उद्योगांची अपेक्षा फोल ठरली. दसरा, दिवाळीतील परिस्थिती पाहता कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटनेला “ब्लॉक क्‍लोजर’साठी गळ घातली. अखेर कामगार संघटनेने “हिरवा कंदील’ दाखविल्यानंतर तीन दिवसांचा “ब्लॉक क्‍लोजर’ आजपासून सुरू झाला. या कालावधीत वाहन विभागातील विविध “शॉप’ दुरूस्तीकरिता बंद राहणार आहेत. आवश्‍यकतेनुसार कारखान्यातील काही विभाग, तसेच “टिम मेंबर्स’ यांना “ब्लॉक क्‍लोजर’मधून वगळण्यात येईल, असे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे.

वाहन उद्योगावर अद्याप मंदीचे सावट आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात उत्पादन कमी करावे लागले. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वाहनांना मागणी नसते. त्यामुळे “ब्लॉक क्‍लोजर’चा निर्णय घेण्यात आला. वेतन करारामध्ये वर्षातील अठरा दिवस “ब्लॉक क्‍लोजर’ करण्याची मुभा व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. मागील पाच वर्षांची तुलना पाहता या वर्षी पहिल्यांदाच तीन दिवसांचाच “ब्लॉक क्‍लोजर’ घ्यावा लागला आहे.
– समीर धुमाळ, अध्यक्ष, टाटा मोटर्स कामगार संघटना.

नोट बंदी, जीएसटीच्या वातावरणातून उद्योग क्षेत्र अद्याप सावरलेले नाही. टाटा मोटर्सच्या “ब्लॉक क्‍लोजर’मुळे मध्यम, लघु व सुक्ष्म असे सुमारे तीन ते साडेतीन हजार उद्योगही या काळात बंद राहणार आहेत. वीज दरवाढीमुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात उत्पादनाला म्हणावी तशी गती अद्याप प्राप्त झाली नाही. वाहन उद्योगांवर शहरातील बहुसंख्य उद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे वाहन उद्योगावरील मंदीचे सावट कधी हटेल याकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)