टाकळी खातगावच्या शेतकऱ्यांचा पेरूबाग लागवडीचा मंत्र (भाग दोन)

शाश्‍वत पाणी स्त्रोत नसलेल्या टाकळी खातगाव (ता.नगर) येथील पाच शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन पेरूबाग लागवडीचा प्रयोग यशस्वीरित्या राबविला आहे. “जी विलास लखनऊ’ वाणाच्या पेरू रोपांची लागवड त्यांनी केली आहे. डाळिंब, संत्रा अशा नियमित होणाऱ्या बागांऐवजी पेरू लागवड करून त्यांनी विचारपूर्वक वेगळी वाट निवडली. विविध ठिकाणी भेट देऊन पेरू विषयी माहिती मिळवून, त्यातील फायद्यातोट्याची गणिते समजून घेऊनच त्यांनी हा पेरूबाग लागवडीचा निर्णय घेतला आहे. त्याचे फायदे त्यांना फळधारणेच्या पहिल्याचवर्षी दिसू लागले आहेत. 

    मृग बहारच सर्वाधिक फायद्याचा… 

पेरूची फळधारणा तीन बहारामध्ये होते. यामध्ये मृग, हस्त, आंबे बहाराचा समावेश आहे. यामध्ये मृग बहारच सर्वाधिक फायद्याचा ठरतो, असे त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण मृग बहार हा मुळातच या परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. मृग बहारासाठी झाडे नेमकी एप्रिल, मे महिन्यातच तावावर (पानगळीसाठी) सोडली जातात. त्यामुळे पाण्याचे “टेन्शन’ नसते. पानगळीचा कालावधी हा जमिनीच्या प्रतीवर ठरतो. खडकाळ, मुरुमाड, माळरानाची जमीन असेल तर महिनाभरात झाडांना चांगला ताव बसतो.

काळी कसदार जमीन असेल तर 45 ते 60 दिवस चांगला ताव बसण्यासाठीचा कालावधी लागतो. त्यानंतर छाटणी केली जाते. पानगळ झाल्यानंतर फळांसाठीचा आवश्‍यक असलेला रस झाडांच्या खोडामध्ये साठतो. त्याचा फायदा पुढे फळांच्या वाढीसाठी होतो. त्यामुळे चांगला ताव बसणे गरजेचे असते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पानगळ झालेली असल्याने पावसाच्या पाण्यावरच झाडांची पुढील वाढ होते. फुटवे येतात मग फूल व कळी येते. मृग बहाराच्या काळात झाडांवर जास्त रोगराईही नसते. त्यामुळे हा बहार फायद्याचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

   दोन वर्षे दुष्काळाचा खोडा… 

तीन ते चार वर्षापूर्वीच पेरू लागवडीचा विचार या शेतकऱ्यांच्या मनात घोळत होता. त्यावेळी सलग दोन ते तीन वर्षे दुष्काळी स्थिती होती. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्‍न होता तर झाडांचे काय? त्यावेळी पाऊस होईल या आशेवर यातील एका शेतकऱ्याने श्रीरामपूर येथील उंदीरगाव येथे रोपांचे बुकींग केले होते. मात्र पाऊसच न झाल्याने त्यांना तो निर्णय दोन वर्षे पुढे ढकलावा लागला. पाचही शेतकऱ्यांचा पेरू लागवड करायचीच असा निर्धार होता. त्यामुळे त्यांनी पेरू लागवड केली.

           पेरू बाग फायद्याची कशी 

जी विलास लखनऊ वाणाचा पेरू हा आपल्या भागाशी “मॅच’ झालेला आहे. हा वाणच आपल्या भागाला अनुकुल असा विकसित झालेला आहे. झाडांची उंची 6 फुटापर्यंत असते. तसेच छाटणीही वेळेवर करणे गरजेचे असते. तशीच  या पेरूंना ग्राहकांकडून मागणीही चांगली असते. त्यामुळे भावही चांगला मिळतो. पहिल्या वर्षीच पेरूच्या एका झाडाला पाच ते सहा किलोपर्यंत पेरू निघतात. चार वर्षानंतर प्रतिझाड 20 किलोपर्यंत पेरू निघतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चार वर्षानंतर यापेक्षा अधिक पेरू एका झाडाला निघतील, ते आपल्या नियोजनावर अवलंबून आहे. योग्य मशागत केल्यास त्यातून अधिक फायदा होत असल्याचे टाकळी खातगावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरासरी एका पेरूचे वजन 200 ते 400 ग्रॅमपर्यंत असते. काही पेरू 500 ग्रॅमपर्यंतही भरू शकतात.

   किटकनाशकांचा खर्च अल्प… 

पेरूच्या झाडांवर पांढरी बुरशी, मावा असे रोग पडतात. मात्र त्याकडे लक्ष असल्यास त्यावर अल्प प्रमाणात किटकनाशकांचा वापर करता येणे सहज शक्‍य होते. यावर किडीचे प्रमाणही कमी राहते. विशेषत: मृग बहार धरत असल्याने किडीचे प्रमाण अत्यल्प असते. तसेच शेताला शेणखत, कंपोस्ट खत अधिक वापरत असल्याने त्याचाही फायदा होत असल्याचे दिसते.

गोरख देवकर 
उपसंपादक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)