टाकळी खातगावच्या शेतकऱ्यांचा पेरू बाग लागवडीचा मंत्र (भाग एक)

शाश्‍वत पाणी स्त्रोत नसलेल्या टाकळी खातगाव (ता.नगर) येथील पाच शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन पेरूबाग लागवडीचा प्रयोग यशस्वीरित्या राबविला आहे. “जी विलास लखनऊ’ वाणाच्या पेरू रोपांची लागवड त्यांनी केली आहे. डाळिंब, संत्रा अशा नियमित होणाऱ्या बागांऐवजी पेरू लागवड करून त्यांनी विचारपूर्वक वेगळी वाट निवडली. विविध ठिकाणी भेट देऊन पेरू विषयी माहिती मिळवून, त्यातील फायद्यातोट्याची गणिते समजून घेऊनच त्यांनी हा पेरूबाग लागवडीचा निर्णय घेतला आहे. त्याचे फायदे त्यांना फळधारणेच्या पहिल्याचवर्षी दिसू लागले आहेत. 

पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेली शेती, जिरायतपट्टा अशीच टाकळी खातगाव भागाची ओळख म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशी स्थिती असली तरी या भागातील शेतकरी खचून न जाणारे आहेत. ते वेगवेगळे प्रयोग करण्यात नेहमीच आघाडीवर असल्याचे दिसते. त्यामुळे या भागात पाण्याचा शाश्‍वत असा स्त्रोत नसतानाही येथील शेतकरी मोठ्या संख्येने फळबाग लागवडीकडे वळलेत. संत्रा, डाळींब, सीताफळीच्या बागा या परिसरात सहज आढळून येतात. शेतकरी अगदी नियोजनपूर्वक अल्प पाण्यावर अशा विविध फळबागा फुलवून शेती करताना दिसतात. प्रयोगशील शेतकरी नारायण यादव भापकर, गीताराम पर्वती नरवडे, अनिल बाजीराव नरवडे, विठ्ठल यशवंत नरवडे, रमेश जगन्नाथ शिंदे यांनीही अशाच्या प्रयोगशीलतेतून पेरूबाग लागवडीचा निर्णय घेतला. पारंपरिक शेती करतानाच त्याला आधुनिकतेची जोड द्यायला हवी, या विचारातूनच त्यांनी पेरूबाग लागवडीचे नियोजन पक्‍के केले.

एकत्र येऊन पेरू लागवडीचाच निर्णय का घेतला याबाबत गीताराम नरवडे, नारायण भापकर म्हणाले, कोणीही एकाने पेरू लागवड करायची म्हटले असते तर फळबाग लागवड झाली असती. त्यानंतर फळही आले असते. मात्र नंतर विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला असता. तसेच इतरही काही अडचणी निर्माण झाल्या असत्या तर त्याही सोडविणे एकट्याला तसे कठीणच गेले असते. त्याऐवजी चार ते पाच जणांनी एकत्र येऊन पेरूबाग लागवड केली तर त्याचा अधिक फायदा होईल, असा विचार आम्ही केला. शिवाय पुढे पेरू अधिक प्रमाणात निघाल्यास एकत्रित तो मोठ्या बाजारपेठेत पाठविणे सहज शक्‍य होईल. पेरूला बाजारपेठ शोधणेही सहज शक्‍य होईल.

याशिवाय गावातूनच कल्याण-विशाखापट्टणम्‌ राष्ट्रीय महामार्ग गेलेला असल्याने त्याच्या बाजूला विविध ठिकाणी स्टॉल लावून फळाची विक्रीही करता येऊ शकते. त्यामुळे अगोदर पेरूची विक्री कशी करायची याचे नियोजन केले आणि नंतरच सर्वांनी मिळून पेरू बाग लागवड करायची असा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय इतर फळबागेसारखी पेरूवर रोगराईही कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यातूनच मग दीड वर्षापूर्वी नारायण यादव भापकर 350, गीताराम पर्वती नरवडे 350, अनिल बाजीराव नरवडे 1000, विठ्ठल यशवंत नरवडे 300, रमेश जगन्नाथ शिंदे 125 अशा “जी विलास लखनऊ’ वाणाच्या पेरू रोपांची 10 बाय 5 फुटांवर त्यांनी लागवड केली. सुरुवातीपासूनच त्यांचे अगदी काटेकोरपणे त्या झाडांवर लक्ष आहे. एकमेकांच्या मार्गदर्शनातून त्यांनी आता या बागांचे नियोजन व्यवस्थित सुरू केले आहे.

गोरख देवकर 
उपसंपादक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)