जेजुरी-येथील औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्र.5 मधील विस्तारीकरणाच्या भूसंपादनाला नावळीकर ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून, गुरुवारी (दि. 24) जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना गावच्या हद्दीवरच अडवून गांधीगिरीचा अवलंब करीत गुलाबपुष्प व निवेदन देत मोजणी न करता पाठवणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जेजुरी औद्योगिक वसाहत विस्तारीकरणासाठी टप्पा क्र. 5 मधील नावळी येथील जमीन मोजणीसाठी संबंधित विभागांचे अधिकारी येणार असल्याची माहिती मिळाली. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात येणार होती. त्यांना नोटीसही प्राप्त झाल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. गुरुवारी (दि. 24) सकाळपासूनच नावळीकर ग्रामस्थ गावच्या हद्दीवर सोनवणे वस्तीनजिक अधिकाऱ्यांना विरोध दर्शवण्यासाठी उपस्थित होते. दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, मोजणी विभागाचे उपअधीक्षक रवींद्र पिसे, भूमीअभिलेखचे व्ही. व्ही. कोकरे, सर्व्हेअर सुखदा महामुनी आदी अधिकारी -कर्मचारी नावळीत दाखल झाले. कोळविहिरे -नावळी मार्गावरील सोनवणे वस्तीनजिक ग्रामस्थांबरोबर चर्चा झाली. यावेळी माजी सैनिक भाग्यवान म्हस्के, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर म्हस्के, शांताराम म्हस्के, सुरेश निकम, विठ्ठल गिरमे, शांताराम गिरमे, अशोक म्हस्के, ज्ञानदेव सोनवणे, शामराव सोनवणे आदींसह ग्रामस्थानीं गांधीगिरीचा अवलंब करीत आलेल्या अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प व निवेदन देत मोजणीला विरोध केला. तसेच कितीही मोठी रक्कम अथवा कोणत्याही स्वरूपाचे आमिष दाखवले तरीही एक इंचसुद्धा जमीन औद्योगिक वसाहतीला देणार नाही असे ठणकावून सांगितले.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे पोलीस बंदोबस्ताचे पत्र टपालाद्वारे बुधवारी (दि. 23) जेजुरी पोलीस ठाण्याला मिळाल्याने व तालुक्‍यातील काही गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने जमीन मोजणीसाठी जाणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्यांबरोबर कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता.

  • एमआयडीसीच्या भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांची बाजू महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर मांडणार आहोत. टप्पा क्र. 5मधील 211हेक्‍टरची मोजणी झाली आहे. तद्‌नंतर 460 हेक्‍टरची मोजणी करतानाही शेतकऱ्यांचा विरोध झाला होता. त्यानंतर तिसऱ्या वेळीही मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध आहे.
    -संतोषकुमार देशमुख, प्रादेशिक अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)